दारिद्रय नष्ट का होत नाही?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दाजी पणशीकर

दारिद्रय़, गरिबी, अन्नान्नदशा, आपत्ती, संकटग्रस्तता, भुकेकंगाल अवस्था ही सर्व अंधाराची पिलावळ असते. जगातील अंधार जसा कधी संपत नाही, तशीच ही त्याची पिलावळही कधी नष्ट होत नाही! अंधार कर्म करण्यासाठी प्रकाश वाढवणे शक्य असले तरी त्यामुळे अंधाराची निर्मिती कधी थांबत नसते. तो जसा नित्य असतो,  सदैव, सर्वत्र व सार्वकालिक असतो तसेच दारिद्रय़ही सार्वत्रिक व सार्वकालिकच असते. असलेले जास्तीचे दारिद्रय़ कमी करणे प्रयत्नाने शक्य असले तरी ते पूर्णपणे नष्ट होत नसते.

जगातील गरिबी, दारिद्रय़ कधी संपत का नाही? असा प्रश्न अनेकांना अनेकदा पडत असेल, परंतु या प्रश्नाचे नेमके उत्तर मात्र कोणाकडे नसते. का संपत नसते दारिद्रय़?

कारण दारिद्रय़, गरिबी या गोष्टी संपण्यासाठी जन्मलेल्याच नसतात. दारिद्रय़ हे सूर्य-चंद्रासारखे नित्यनूतन व सनातन असते. ते विश्वोत्पत्तीच्या आद्य क्षणी निर्माण झालेले असते. त्यामुळे विश्वाच्या अस्तित्वाच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्याचे आयुष्य प्रदीर्घ असते. अंधाराला जसा अंत नसतो तसा तो दारिद्रय़ालाही अंत नसतो. दारिद्रय़ हे तसे अजरामर असते. ते अजिंक्य असते. काळावर मात करण्याचे अपार सामर्थ्य फक्त दारिद्रय़ाकडेच असते. त्याच्याशी दोन हात करून त्याला संपवणे आजवर कुणालाच जमलेले नाही हे सत्य आहे.

याचे कारण दारिद्रय़, गरिबी, अन्नान्नदशा, आपत्ती, संकटग्रस्तता, भुकेकंगाल अवस्था ही सर्व अंधाराची पिलावळ असते. जगातील अंधार जसा कधी संपत नाही, तशीच ही त्याची पिलावळही कधी नष्ट होत नाही! अंधार कर्म करण्यासाठी प्रकाश वाढवणे शक्य असले तरी त्यामुळे अंधाराची निर्मिती कधी थांबत नसते. तो जसा नित्य असतो,  सदैव, सर्वत्र व सार्वकालिक असतो तसेच दारिद्रय़ही सार्वत्रिक व सार्वकालिकच असते. असलेले जास्तीचे दारिद्रय़ कमी करणे प्रयत्नाने शक्य असले तरी ते पूर्णपणे नष्ट होत नसते. एकीकडे दारिदय़ नष्ट झाले तरी ते दुसरीकडे दुप्पट वेगाने उगवते व तेथे ते वाढतेही! दारिद्रय़ाचे संपूर्ण उच्चाटन आजवर झालेले नाही व ते फारसे कोणालाही जमलेले दिसत नाही आणि दारिद्रय़-गरिबीचा आजवरचा जागतिक इतिहास बघितला तर ते नष्ट करणे यानंतर कुणाला शक्य होईल असे वाटत नाही.

दारिद्रय़ म्हणजे तरी नेमके काय असते? केवळ पैशांचा अभाव म्हणजे दारिद्रय़ हा झाला वाच्यार्थ किंवा शब्दार्थ, पण तेवढाच त्याचा अर्थ नव्हे! दारिद्रय़ हे सर्वांगाने असते. ते सर्वांगीण व सर्वंकष असते. त्याला आव्हान देण्याची क्षमता कोणात नसते. कारण ते दशदिशांत व्यापून उरलेले व वैधिक स्तरावर पोचलेले निरंकुश असे दारिद्रय़ असते.

पैशाचे दारिद्रय़ हे सर्वत्र दिसणारे लौकिक दारिद्रय़ होय, पण त्याशिवायही या दारिद्रय़ाचे अनेक प्रकार आहेत. विदेचे, शिक्षणाचे, संस्कारांचे, शिष्टाचाराचे, नम्रतेचे, सौंदर्याचे, समृद्धीचे, धनधान्याचे, जमीनजुमल्याचे, मांगल्याचे असे अनेक दारिद्रय़ घराघरातून ठासून भरलेले असते. कलाकौशल्याचे दारिद्रय़ तर यत्रतत्र पाहावयास मिळते. सात्त्विक संस्कारांचा अभाव, सदाचरणाचा अभाव हे भयावह दारिद्रय़च असते. माणूस श्रीमंत झाला म्हणजे दारिद्रय़ संपत नसते. उलट श्रीमंतीसह उद्दामपणा, उन्मत्तपणा, नीच वृत्ती, क्रौर्य, निर्दयत्व यांचा उद्रेक होणे हे एक प्रकारचे संस्कारहीनतेचे दारिद्रय़च होय!

गरीब व गरिबी सर्व जगभर पसरलेली आहे. फाटक्या कपडय़ांतले भिकारी मंदिराबाहेर हात पसरून भीक मागतात, तर इस्त्र्ााrच्या कपडय़ांतील पांढरेशुभ्र ‘भक्त’ हार-पेढय़ांचे ताट पुढे करून देवाकडे हात पसरून भीकच मागत असतात. मंदिराबाहेर याचक असतात व मंदिरात देवाकडे गेलेलेही याचकच असतात! फरक इतकाच की, बाहेरच्याला दुःख बोचत असते, तर आतल्या ‘भक्ता’ला सुख बोचत असते. दोन्हीकडे असतात गरीब, दरिद्री व भिकारीच! दोनहीकडे मागणी याचना आणि भिकेची प्रक्रिया यातच काय तो फरक असतो; बाकी उभयत्र असतात ते हात पसरणारे दरिद्री याचकच! यासाठी कोणताही उपाय नाही.

अंधार सनातन व सार्वत्रिक असला तरी त्याला कसलेही आकारमान नसते. दरिद्री, गरीब, भिकारी, भुकेकंगाल, दुर्दैवी, अभावग्रस्त, पिचलेला, नाडलेला, निराशात्रस्त मनुष्य म्हणजे ते अंधाराचे आकारमानात असलेले प्रकट रूप होय. अंधार दिसतो, दाखवताही येतो, पण तो बोलत नाही, परंतु अंधाराचे अपत्य असलेला गरिबी भिकारी मात्र हात पसरून बोलू शकतो. अंधार हा वज्रलेप असतो, गरिबी ही टवटवीत असते. अंधारावर कशाचा परिणाम होत नाही. दारिद्रय़ही अभंग व दुर्घट असते. अंधाराला सीमा नसते, गरिबीही असीम असते.

दारिद्रय़ किंवा गरिबीला जात-पात नसते! तिला धर्म-संप्रदाय व पंथ यांची बाधा नसते. दारिद्रय़ कोणावरही आक्रमण करू शकते. गरिबीकडे लहान-थोर, विद्वान-अविद्वान, स्त्र्ााr-पुरुष, ब्रह्मचारी-गृहस्थ, सुंदर-कुरूप, नेता-कार्यकर्ता, उद्योगी-निरुद्योगी, साक्षर-निरक्षर असा कसलाही भेदभाव नसतो. एखाद्या बहरलेल्या वृक्षास कीड लागून तो दिसामासाला वाळून जाऊन नंतर मुळासकट उघडून पडावा, तसे गरिबीची कीड लागून आजवर अनेकानेक घराणी निर्वंश होऊन संपली आहेत.  श्रीमंतीमुळे एखाद्या कुटुंबाचा उत्कर्ष होऊन ते घराणे दोन-तीन पिढय़ांत कीर्तिमान झाले की, त्याची सर्वच चर्चा होते; परंतु गरिबीचे चटके बसून एखादे घराणे संपून मातीमोल होऊन जाते, त्याची कोणी मोठय़ाने वाच्यता करीत नाही. दारिद्रय़ाचा स्पर्श म्हणजे सर्वनाशाची निश्चिती! दारिद्रय़ म्हणजे अपकर्ष व अपयशाची हमी. दारिद्रय़ म्हणजे सर्व प्रकारचे आपद्विपत्तींचे मूळ उगमस्थान.

आपल्या हिंदुस्थानी परंपरेत दानाला-दातृत्वाला फार महत्त्व असते. दानशूराची कीर्ती सतत वाखाणली जाते. आपल्या संस्कृतीतच नव्हे, तर जगभरातील सर्व राष्ट्रीय संस्कृतीत दातृत्वाचा नेहमी गौरव केला जातो. त्याच्या अनेक कारणांपैकी एक कारण म्हणजे जगभरात पसरलेली गरिबी-दारिद्रय़ हे असले पाहिजे असे आमचे मत आहे. दारिद्रय़ व गरिबीच नष्ट झाली तर दानशूरांना विचारतो कोण? गरीब व गरजवंत हे दोन वर्ग समाजातून नष्ट झाले किंवा ते प्रयत्नपूर्वक केले तर मग दान तरी कोणाला करणार आणि मग ते दान घेणार तरी कोण? याचक नावाची संस्थाच अस्तित्वात नसेल तर मग दातृत्वाचे, दानधर्माचे प्रयोजनच काय उरले? सर्व समाजातील सर्व घटक, सर्व चतुर्थ श्रेणी   मजूर-कामगार व अत्यंत गरीब व भिकारी वर्ग समृद्ध किंवा पोटापुरता मिळवता व सुखी झाला तर मग दानाची, दातृत्वाची, दानशूरांची गरजच राहणार नाही. मग समाजात अनाथालये, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, गरीबांसाठी रुग्णालये, विनामूल्य शिक्षण संस्था काढाव्याच लागणार नाहीत. मग शैक्षणिक ‘फी’ माफ करावी लागणार नाही. गरीब-गरिबीचे समूळ उच्चाटन झाल्यामुळे दहावीनंतर पुढच्या शिक्षणासाठी वृत्तपत्रांतून अशा गरीब विद्यार्थ्यांसाठी ‘अर्थसहाय्य करावे’ अशी वार्षिक मोहीमही मग उघडावी लागणार नाही.

पण असे ‘सौभाग्यसुंदर’ चित्र आपल्या समाजात यापूर्वी एकदा तरी निर्माण झालेले कधी कोणी ऐकले आहे काय?

नाही! असे आश्वासक चित्र समाजात सत्वर निर्माण व्हावे असे समाजधुरिणांना व थोर विचारवंतांना नेहमी वाटत असले तरी ते फार असंभव अशा आकाशपुष्पासारखे अशक्य असते. कारण दारिद्रय़ व गरिबी ही सनातन, नित्यनूतन व चिरंजीव असते हेच होय!

दारिद्रय़ जगभर पसरलेले

दारिद्रय़ हे सर्व जगात असते, ते सर्व जगभर पसरलेले असते. ते वेदकाळात होते. रामायण, महाभारत काळातही होते. तसेच ते पुराणकाळात, मध्ययुगात, मोगलाईत, ब्रिटिश काळात व गेल्या दोन-तीन शतकांतील वाढत्या यंत्रयुगातही विस्तारलेले दिसते आहे. प्राचीन काळातील राजे-महाराजे किंवा आधुनिक काळातले राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान, मुख्यमंत्री, पुढारी, नेते हे सर्व गरिबी हटविण्यासाठीच प्रतिज्ञाबद्ध असतात. प्रत्येक वर्तमानातील नेता ‘जनतेला दारिद्रय़ाच्या कैचीतून सुटका करण्यासाठी आपण सत्ता ग्रहण करीत असल्याची’ प्रतिज्ञा उच्चारतो. याचा अर्थच त्याच्या पूर्वीच्या सत्ताधाऱयांना गरिबीचे उच्चाटन करता आलेले नसते हाच असतो. पण प्रयत्नांची शर्थ करूनही गरिबी हटत का नाही? ‘प्रयत्नांची शर्थ करून गरिबी हटविता येऊ शकेल’ असा भ्रम नेत्यांना असतो, हे ते कारण होय!