…म्हणून साडीवर घेतला लतादीदींचा ऑटोग्राफ, आशा भोसले यांनी जागवल्या आठवणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

झी टीव्हीवरील डान्स रियालिटी शो ‘डीआयडी लिटल मास्टर्स’चा यंदाच्या आठवड्यातील विशेष भागात स्पर्धक आपल्या अफलातून नृत्यांमधून गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना आदरांजली वाहणार आहेत. या भागात त्यांची धाकटी बहीण आणि ज्येष्ठ गायिका आशा भोसले हजेरी लावणार आहेत. सूत्रसंचालक जय भानुशालीने आशाताईंना विचारलं की, त्यांनी कधी कोणाचा ऑटोग्राफ घेतला आहे का, त्यावर त्यांनी एक गुपित सांगितले. दीदीच्या मृत्यूच्या काही महिने अगोदर मी तिच्या एका जुन्या साडीच्या पदरावर तिचा ऑटोग्राफ घेतला होता, अशी आठवण आशाताईंनी यावेळी सांगितली.

आशाताई म्हणाल्या, ‘मी माझ्या आयुष्यात पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि इतर अनेक महान लोकांची भेट घेतली आहे, परंतु मी त्यांच्याकडे कधी त्यांची ऑटोग्राफ मागितला नव्हता. माझ्याकडे केवळ एका व्यक्तीचा ऑटोग्राफ आहे आणि ती व्यक्ती म्हणजे लतादीदी. पाच-सहा महिन्यांपूर्वी लतादीदी आजारी होती, तेव्हा तिने मला तिच्या खोलीत बोलावलं. ती मला म्हणाली, ‘माझ्याकडून तुला जे काही हवंय ते माग’ ते ऐकून मला धक्का बसला, पण काही वेळानंतर मी तिला तिच्या एका जुन्या साडीवर ऑटोग्राफ देण्यास सांगितला. मी ती साडी आज माझ्याबरोबर आणली आहे. कारण माझ्या जीवनातील ती सर्वात अनमोल वस्तू आहे. मी तिचा या साडीच्या पदरावर ऑटोग्राफ घेतला. कारण जेव्हा मी ती साडी नेसेन, तेव्हा सर्वांना तिचा  ऑटोग्राफ पाहता येईल!’ या वेळी लतादीदींच्या आठवणीत आशाताई भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.