
प्रचंड उकाडय़ाने हैराण होत असतानाच एखाद्या चील्ड एसी असलेल्या थंडगार खोलीत प्रवेश केल्यास स्वर्गसुखाचा आनंद मिळतो. पण एसीतून लगेचच उन्हात जाणे हे स्वर्गसुख यमाच्या दारात नेऊ शकते. कारण एसीतून उठून लगेच ऊन अंगावर घेतल्यास ब्रेन हॅमरेजचा धोका असल्याचे समोर आले आहे. ब्रह्मानंद नारायण मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अवघ्या 72 तासांत ब्रेन हॅमरेजचे असे तब्बल 29 रुग्ण समोर आले आहेत.
झारखंडच्या जमशेदपूरमध्ये उष्णतेची लाट असून मोठय़ा संख्येने उष्माघाताचे आणि ब्रेन हॅमरेजचे रुग्ण सापडत आहेत. बीएनएच रुग्णालयात दाखल झालेल्या ब्रेन हॅमरेजच्या 29 पैकी 17 रुग्णांचे वय 50 ते 60 च्या आसपास असून त्या सर्वांना उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास असल्याचे उघड झाले आहे. एसीतून उठून उन्हात गेल्यानंतर 15 मिनिटांनी अनेकांना ब्रेन हॅमरेजचा त्रास जाणवू लागला. यातील 29 पैकी 3 रुग्ण 70 वर्षांचे असून त्यांना एसीची अजिबात सवय नाही. तर 26 रुग्ण 50 ते 60 वयोगटातील आहेत. सध्या प्रचंड उकाडा असून अशा स्थितीत एसीतून उठून लगेचच उन्हात जाऊ नका किंवा उन्हातून लगेच एसीत बसू नका, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
ही आहेत लक्षणे
चेहरा, हात किंवा एक पाय सुन्न होतो, त्याला मुंग्या येतात. अशा परिस्थितीत मेंदू काम करत नाही. डोळ्यांनी दिसणेही कमी होते. प्रचंड डोके दुखते, उलटय़ा सुरू होतात, जिवाची घालमेल होते, शरीराचा पुठलाही भाग आखडून जातो त्या भागात वेदना जाणवत नाहीत.
नेमके काय होते?
कडक उन्हात असताना मेंदूच्या रक्तवाहिन्या प्रसरण पावतात. अशा परिस्थितीत आपण अचानक एसीत गेलो तर त्या रक्तवाहिन्या आपुंचन पावतात. त्यामुळे चक्कर येणे किंवा ब्रेन स्ट्रोकचा धोका संभवतो. मेंदूला रक्तप्रवाह कमी प्रमाणात होतो त्यामुळे ब्रेन हॅमरेज होऊ शकते. उन्हातून आल्यानंतर लगेचच थंड पाण्याने आंघोळ करणेही संयुक्तिक नाही, अशी माहिती शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी दिली. दरम्यान, एसीतून बाहेर गेल्यानंतर तापमान अचानक वाढते, अशावेळी डोळ्यांना प्रचंड त्रास जाणवू शकतो आणि ब्रेन हॅमरेजचाही धोका संभवतो, असे फिजिशियन डॉ. बलराम झा यांनी सांगितले.