दापोली आसुद काजरेवाडी येथे नागपंचमी उत्साहात केली साजरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

समृध्द अधिवासाचे प्रतीक, शेतकऱ्यांचा मित्र आणि निसर्ग साखळीत महत्वाचा घटक असलेल्या नागाबद्ल कृतज्ञता व्यक्त करुन दापोली येथील आसुद काजारेवाडीतील महिलांनी वारुळाची पुजा करत सोमवारी मोठ्या उत्साहात नागपंचमी साजरी केली.

दापोली तालुक्यातील सुप्रसिद्ध अशा आसुद गावातील काजरेवाडी येथील सुहासिनी या दरवर्षी नागपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. काजारेवाडी जवळून जाणाऱ्या दापोली हर्णे मार्गावर अगदी हम रस्त्याच्या कडेला दरवर्षी वारुळ उगवतो या ठिकाणी वाडीतील सर्व महिला वर्ग जमा होतात आणि वारुळाची पुजा अर्चा करून पारंपारिक गाणी गात फेर धरतात तसे यावेळीही अगदी प्रतिवर्षी प्रमाणेच नागपंचमीचा आनंदात सण साजरा करण्यात आला. यामध्ये आसुद काजारेवाडीतील मनाली धामणे, स्वप्नाली धामणे, वनिता येद्रे, सुनिता धामणे, रंजना धामणे, कांचन रेवाळे, अपुर्वा रेवाळे, दिशा येद्रे आदि महीलांसह वाडीतील सर्व महिला कुमारिका यात सहभागी झाल्याने या सण उत्सवाची खुपच रंगत वाढली.

श्रावणमास म्हणजे सणांचा मास (महिना) असेही याचे एक वैशिष्ट्य आहे. श्रावणातील पहिला सण ‘नागपंचमी’चा. आपल्या कुटुंबाची नागभयापासून सदासर्वकाळ मुक्तता व्हावी, तसेच नागदेवतेचा कृपाशीर्वाद प्राप्त व्हावा, यासाठी प्रतिवर्षी श्रावण शुक्ल पक्ष पंचमीला म्हणजेच नागपंचमीला नागपूजन केले जाते. सर्पयज्ञ करणार्‍या जनमेजय राजाला आस्तिक नावाच्या ऋषींनी प्रसन्न करून घेतले. जनमेजयाने ‘वर मागा’, असे म्हटल्यावर सर्पयज्ञ थांबवण्याचा वर त्यांनी मागून घेतला. जनमेजयाने सर्पयज्ञ थांबवला, तो दिवस पंचमीचा होता. श्रीकृष्णाने यमुनेच्या डोहातील कालिया नागाचे मर्दन केले. तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. ‘नागांतील श्रेष्ठ जो ‘अनंत’ तोच मी’, अशी गीतेत श्रीकृष्ण आपली विभूती सांगतात, अशी एक कथा आहे.

अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया अशा नऊ जातींच्या नागांची आराधना करतात. त्यामुळे सर्पभय उरत नाही आणि विषबाधा होत नाही, असे मानले जाते. नागपंचमीच्या दिवशी काहीही चिरू नये, कापू नये, फोडणी देऊ नये, चुलीवर तवा ठेवू नये आदी संकेत पाळले जाते. अशाप्रकारे महत्व असलेल्या नागपंचमीचा सण दापोलीत सर्वच ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.