दापोली, मंडणगडातील वादळग्रस्तांना उर्वरित मदतही तातडीने देणार, अनिल परब यांची माहिती

निसर्ग चक्रीवादळात दापोली आणि मंडणगडातील खंडित झालेला वीजपुरवठा आम्ही युद्धपातळीवर सुरू केला. ज्या गावातील वीजपुरवठा अद्याप खंडित आहे त्याठिकाणी दुरुस्तीसाठी तंत्रज्ञांची गरज आहे. पुढील चार-पाच दिवसांत त्या गावातील वीजपुरवठा सुरू होईल. जिह्यात निसर्ग चक्रीवादळातील नुकसान भरपाईचा 116 कोटी 98 लाखांचा निधी प्राप्त झाला असून उर्वरित निधी जिह्याला मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

निसर्ग चक्रीवादळातील नुकसान भरपाईचे रत्नागिरी जिह्यात 85 टक्के वाटप पूर्ण झाले आहे. फळबागायती आणि शेतीसाठी 15 कोटी रुपयांपैकी 46 लाख रुपयांचे वाटप झाले आहे. सामाईक शेतीमुळे मुंबईत राहत असलेल्या हिस्सेदारांचे हमीपत्र मिळाल्यानंतर उर्वरित रकमेचे वाटप होईल, असे पालकमंत्री अनिल परब यांनी सांगितले. हमीपत्राऐवजी संमतीपत्र देऊन नुकसान भरपाई देण्यासंदर्भात आमचे प्रयत्न सुरू आहेत.

आपत्तीग्रस्त कोकणवासीयांना झालेल्या नुकसानाची जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी NDRF च्या निकषांमध्ये आवश्यक ते बदल करण्यात आले आहेत. मात्र याविषयीची चुकीची माहिती पसरवून लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचे आणि राजकारण करण्याचे काम काहीजण करत असल्याचा आरोप परब यांनी केला.

शेल्टर हाऊस उभारणी करणार -उदय सामंत
भविष्यात अशा प्रकारची परिस्थिती उद्भवल्यास आपत्ती नियोजनासाठी ‘शेल्टर हाऊस’ची उभारणी करण्याचा सरकारचा विचार आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्हय़ांमध्ये फळबागायतदारांना सर्वाधिक फायदा मिळवून देण्याकरिता 1992 ची ‘रोजगार हमी योजना’ लागू करणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिली

आपली प्रतिक्रिया द्या