
‘महारथी कर्ण’मधील कर्ण, ‘शिर्डी माझे पंढरपूर’मधील साईबाबा, ‘संगीत सौभद्र’मधील कृष्ण, ‘वेडा चंदन’मधील चंदन, वीर बब्रुवान, अभिमन्यू अशा एकाहून एक सरस कलाकृती साकारून तमाम कोकणवासीयांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱया सुधीर कलिंगण या दशावतारी कलाकाराने आज अचानक एक्झिट घेतली. जिल्ह्यातील नेरूर गावचे सुपुत्र असलेल्या सुधीर यांचे सोमवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. गोवा येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. राजमुकुट परिधान करीत दशावताराच्या साजात शोकाकुल वातावरणात नेरूर येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
तब्बल 45 वर्षे त्यांनी दशावतारात नि:स्वार्थीपणे सेवा केली. दशावतारी लोककलेचे ते गाढे अभ्यासक होते. त्यांच्या निधनाने दशावतारी लोकलेची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सून व नातवंडे तसेच भाऊ, वहिनी, पुतणे असा मोठा परिवार आहे. दशावतार क्षेत्रातील प्रसिद्ध लोककलाकार बाबी कलिंगण यांचा वारसा त्यांचे सुपुत्र सुधीर कलिंगण यांनी पुढे चालू ठेवला होता. वडिलांच्या दशावतारी नाटय़ कंपनीत त्यांनी लहानपणापासूनच बालकलाकार म्हणून पदार्पण केले. दशावतारी क्षेत्राचा गाढा अभ्यास असलेले ज्येष्ठ दशावतारी कलावंत यशवंतकाका तेंडोलकर हे सुधीर कलिंगण यांना गुरू म्हणून लाभले. संस्कृत विषयाचा त्यांना मोठा अभ्यास होता. सोळा वर्षांपूर्वी त्यांनी श्री कलेश्वर दशावतारी नाटय़ मंडळाची स्थापना केली. कोकणची दशावतार लोककला सातासमुद्रापार नेण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. कोकणच्या दशावतारातील लोकराजा म्हणून त्यांनी नावलौकिक मिळविला होता.
या पुरस्कारांनी गौरवले
ठाणे महापौर पुरस्कार, सिंधुरत्न कलाभूषण पुरस्कार, कोकण गौरव पुरस्कार, कोकणरत्न पुरस्कार, ठाणे जीवनगौरव पुरस्कार, लोकसेवा पुरस्कार या विविध राज्य व कोकणस्तरीय पुरस्कारांनी त्यांचा आतापर्यंत सन्मान झाला आहे. तब्बल 21 वेळा राजपात्र प्रथम क्रमांक विजेते दशावतारी क्षेत्रातील अभिनयसम्राट म्हणून त्यांची ओळख होती. मुंबई-ठाणे येथील महोत्सवातही त्यांनी नाटय़प्रयोग सादर केले आहेत.
सकाळी एसटी चालक, रात्री राजा!
दशावतारातील लोकराजा तसेच नटसम्राट, दशावतारसम्राट म्हणून ते परिचित होते. अलीकडेच त्यांची सांस्कृतिक संचलनालय मुंबई लोककला अनुदान शिफारस समितीच्या सदस्यपदी निवड झाली होती. सिंधुदुर्ग जिल्हा दशावतारी चालक-मालक संघाचे सहसचिव पद ते सांभाळत होते. एस.टी. महामंडळात कुडाळ आगारात त्यांनी 23 वर्षे चालक म्हणून सेवा बजावली. रात्री दशावतारी नाटय़ प्रयोगांचे सादरीकरण करून दुसऱ्या दिवशी सकाळी ते एस.टी.चे सारथ्य करायचे.
या भूमिका चोख बजावल्या
सुधीर कलिंगण यांची अनेक नाटके व त्यांच्या भूमिका गाजल्या आहेत. यात प्रमुख राजाच्या भूमिकेसह ‘नल-दमयंती’मधील नल राजा, ‘शिर्डी माझे पंढरपूर’मधील साईबाबा, ‘वेडा चंदन’मधील चंदन, ‘वृंदा जलधर’मधील विष्णू, ‘हार गिळला खुंटीने’मधील राजा विक्रम, ‘हरिश्चंद्र तारामती’मधील राजा हरिश्चंद्र, ‘महारथी कर्ण’मधील कर्ण, ‘संगीत सौभद्र’मधील कृष्णाची लक्षवेधी भूमिका साकारली होती.



























































