नगदवाडीने पावसासाठी जपली दशावतारी खेळाची परंपरा

32

सामना प्रतिनिधी, कोपरगाव

कोपरगाव तालुक्यातील नगदवाडीत पावसाच्या आगमनासाठी आखाडीचा म्हणजेच दशावतारी खेळाचा प्रयोग करण्याचा निर्णय घेऊन नगदवाडी ने जपली दशावतारी खेळाची परंपरा. यावेळच्या दशावतारीत रावण व नृसिंह अवतारास सर्वाधिक बोली लावण्यात आली. दशावताराला जवळपास चारशे ते पाचशे वर्षांपासूनची जुनी परंपरा आहे. भगवान विष्णूने दुःखाचे निवारण करण्यासाठी दहा अवतार घेतले अशी आख्यायिका आहे. तीच दशावतारी नाट्य मंडळी नाट्यरूपाने प्रेक्षकांचे मनोरंजन करतात.

दहा अवतार सादर करताना पूर्वरंग आणि उत्तररंग असे दोन भाग दशावतारात पाहावयास मिळतात. पूर्वरंगात मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कलकी इ. पण दशावतारी मंडळी आठच अवतार सादर करतात. उत्तररंगात रामायण, महाभारत, पुराणातील पौराणिक आख्याने सादर करतात. परमेश्वराची कृपा होऊन चांगला पाऊस पडण्यासाठी व त्याची महती गायन, वादन, नृत्य आणि अभिनय याद्वारे लोकरंजनासाठीच दशावतार खेळला जातो. पूर्वी आखाडी करण्यासाठी केवळ 20 ते 30 हजार रुपये खर्च यायचा परंतु आता तोच खर्च अडीच ते तीन लाखांवर वर गेला आहे. आखाडी म्हटलं की तमाशाचा कार्यक्रम ठेवावाच लागतो. कारण पूर्वीची मराठी म्हण आहे वाजतील चाळ तर होईल गाळ. तमाशा आला, सोंग बांधणारे कारागीर आले. गावातील प्रतिष्ठित तेवढ्याच जोमाने आखाडीच्या तयारीला लागले. गेल्या पंधरा वीस वर्षापासून आधुनिक जगात वावरत असताना या गोष्टीकडे थोडेसे लक्ष कमी झाले होते मात्र नगदवाडीतील तरुणांनी पुन्हा एकदा आखाडी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याला तेवढ्यात पद्धतीने प्रतिसाद मिळाला. आखाडीला दोन हजारापासून पाच हजार रुपयेपर्यंत वर्गणी जमा झाली. आणि मग सुरू झाला नगदवाडीत दशावतारी खेळ. गणपती, सरस्वती, मच्छ, कच्छ, नंदी, खंडेराव, एकादशी, तीळ, संक्रांति सूर्य-चंद्र, सुंद-उपसुंद आदी अवतारी खेळ चौथ्या दिवसापर्यंत रंगात येतात. मग रात्र थोडी आणि सोंगे फार अशी स्थिती निर्माण होते. पाचव्या दिवशी ”अरे काळकंठा… हलुलुलु महाराज आज्ञा महाराज ..आपल्या राज्यामध्ये व्यवस्था कशी आहे.. आपल्या आज्ञेप्रमाणे व्यवस्थित आहे महाराज.” राम रावण युद्ध प्रसंगाचेवेळी रावणाची सभा भरते त्यावेळी आपल्या सेनापतींना रावण राज्याची व्यवस्थेविषयी अनेक प्रश्न करतो त्याचे संपूर्ण याचे संपूर्ण प्रश्न उत्तर यावेळी नाट्यरूपात करण्यात येते.

कणखर आवाज असलेल्या पुरुषालाच रावणाचे पार्ट देण्यात येते. इंद्रजीत व रावण यांचा अंतिम संहार करण्यासाठी राम-लक्ष्मण आदी भूमिका घेतली जातात. रावणाच्या भूमिकेला अतिमहत्त्व दिले जाते त्यामुळे रावणाच्या सोंगाला मोठी बोली लागते. सहाव्या दिवशी वेताळ वीरभद्र तर सातव्या दिवशी आखाडीचा शेवट असतो त्यादिवशी संपूर्ण दशावतारी खेळ गणपती पासून तर नरसिंहावतार पर्यंत नाचवली जाते. नरसिंह अवताराचा विशेष महत्त्व दिले जाते. नरसिंहाची भूमिका जो व्यक्ती करतो त्याला दिवसभर उपवास करावा लागतो. प्रल्हादाचा पिता हिरण्यकश्यपू याचा वध करण्यासाठी नरसिंहाला अवतार घ्यावा लागतो. नरसिंहाच्या भूमिकेला विशेष महत्त्व शेवटच्या दिवशी दिले जाते. पहाटे पाच नंतर हे अवतारी सोंग काढण्यात येते. आणि आखाडीचा शेवट होतो. संगीता महाडिक पुणेकर यांचा तमाशाचा कार्यक्रम या निमित्ताने आठ दिवस नगरवाडीत चालतो . उद्या सोमवारी नगदवाडी आखाडीचा शेवट आहे. शेवट गोड करण्यासाठी नगदवाडी आखाडी कमिटी विशेष प्रयत्न करीत आहे. दशावतारी खेळ नगदवाडी परिसरात चालू असल्याने वरूणराजाने बरसात करून शेतकऱ्यांना समृद्ध करावे एवढीच अपेक्षा जाणत्या शेतकऱ्यांना लागली आहे. या आखाडीवर कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ही बारकाईने लक्ष असून काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून त्यांनी कार्यकर्त्यांना सूचना केलेली आहे. आखाडीचे सूत्रसंचालन अर्जुन जावळे व विनायक जावळे करीत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या