
दशावतार म्हणजे कोकणच्या मातीचा उत्स्फूर्त आविष्कार. कोकणी माणसाचा सांस्कृतिक ठेवा. दिवाळीनंतर कोकणातील जत्रांना सुरुवात होते. दशावताराचा पेटारा उघडला जातो आणि नाटकं सादर होतात. कोरोनामुळे गेल्या वर्षी दशावतारी नाटकं सादर झाली नाहीत. कलावंतांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले. मात्र या काळात व्हर्च्युअल दशावताराचा प्रयोग करण्यात आला. ‘परिवर्तन दशावतराचे’ या उक्रमांतर्गत 30 नाटकांचे शूटिंग करण्यात आले. आता ही नाटकं एकदिवसाआड यू–टय़ूबवर अपलोड करण्यात येत आहेत. त्यामुळे देश–विदेशातील कलाप्रेमींना अस्सल मातीतील कलेचा आनंद घेता येत आहे.
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात 200 कलावंतांना घेऊन 30 दशावतारी नाटकांचे शूटिंग मालवण येथे करण्यात आले. ही मूळ संकल्पना दत्तप्रसाद शेणई, रुपेश नेवगी यांची आहे. त्यासाठी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतील अशी कथानकं निकडली. दिवसाला दोन नाटकांचे शूटिंग करण्यात आले. कोणत्याही एका मंडळातील कलावंत न घेता विविध मंडळांतील कलावंतांची मोट बांधण्यात आली. अनेक दिग्गजांनाही बोलावण्यात आले होते. मात्र ज्यांना शक्य झाले ते आले, तर काहींनी मानधनाची अपेक्षा न ठेवता काम करण्याची तयारी दर्शवली. आतापर्यंत महावीर बर्बरीक, गोकर्ण महाबळेश्वर, अंगविरहित नर, आर्य चाणक्य अशी नाटकं यू-टय़ूबकर अपलोड झाली आहेत. प्रत्येक नाटक किमान साडेतीन तासांचे असल्याची माहिती प्रथमेश सामंत यांनी दिली.
कलावंतांना मदतीचा हात
30 दशावतारी नाटकांचा खजिना रसिकांना ‘दशावतार कलेचे आम्ही पूजक’ या यू-टय़ूब चॅनेलकर नाममात्र शुल्कात बघता येईल. एका नाटकासाठी फक्त 20 रुपये भरावे लागणार आहेत. 59 रुपयांच्या पॅकेजमध्ये तीन नाटकं बघता येतात. गुगल पे केल्यानंतर मेंबरशिपशिवायही लिंकद्वारे नाटक बघता येते. यातून जमा होणारी रक्कम कलावंतांच्या मदतीसाठी वापरली जाणार आहे. सुरुवातीला 200 कलावंतांनी मानधन न घेता शूटिंग केले होते. त्यांना आता या रकमेतून मानधन देण्याचा प्रयत्न आहे.
नेमका उद्देश काय…
आपल्याकडे काही अपवाद वगळले तर कलावंतांचे डॉक्युमेंटेशन फारसे होत नाही. पण अशा उपक्रमांतून लहानमोठय़ा सर्वच दशावतारी कलावंतांची आठवण जतन केली जाईल. ज्या लोकांनी कधीही दशावतार बघितला नाही, त्यांच्यात व्हर्च्युअल दशावतार बघून आवड निर्माण होऊन ते रंगमंचीय आविष्काराकडे वळावेत, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. यू-टय़ूब व्हिडियोंच्या माध्यमातून कामानिमित्त गावाबाहेर गेलेल्यांना या कलेला आनंद घेता येत आहे. दशावतार म्हणजे देवळातच अशी चौकट होती. तीही मोडून बाहेर पडणे, हा उपक्रमाचा उद्देश असल्याचे प्रथमेश सामंत यांनी सांगितले.

























































