
कोपरगाव तालुक्यातील डाऊच बुद्रुक शिवारात एक मृतदेह आढळला आहे. याबाबतची माहिती कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला मिळताच सहाय्यक फौजदार शैलेंद्र ससाणे यांनी घटनास्थळी जाऊन भेट देऊन पाहणी केली.
शुक्रवारी 4 सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास डाऊच बु. येथील गोदावरी नदीच्या पाण्यात हा मृतदेह आढळून आला. त्यानंतर पोलिसांना याबाबत डाऊच बु. पोलीस पाटील आण्णासाहेब विश्वनाथ कांबळे यांनी शहर पोलीस स्टेशनला खबर दिली. माहिती कळल्यानंतर पोलिसांनी तिथे जाऊन पाहणी केली. त्यावेळी हा मृतदेह पुरुषाचा असून त्याचे वय 35 ते 40 वर्षे असण्याची शक्यता आहे. कुकडी नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये हा मृतदेह वाहून आला असावा, असा अंदाज असून त्या दिशेने तपास सुरू आहे. या व्यक्तिचा दोन दिवसापूर्वी मृत्यू झाला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
याबाबत पोलिसांचा शोधाशोध सुरू आहे. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून शवविच्छेदन करण्यात आले आहे, अशी माहिती सहाय्यक फौजदार शैलेंद्र ससाणे यांनी दिली. सदरहू या मयत अनोळखी इसमाच्या नातेवाईकांनी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनची संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.


























































