
लेकीची ऑनलाइन ड्रेस खरेदीची हौस पित्याला 14 लाखाला पडल्याची बाब उघडकीस आली आहे. चितळसर मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या 17 वर्षीय मुलीने वडिलांच्या मोबाईलवरून ऑनलाइन ड्रेस खरेदी केला मात्र डिलिव्हरी न मिळाल्याने तिने कस्टमर केअरला संपर्क केला. तिने ड्रेसबाबत विचारणा केली असता भामट्याने मदत करण्याच्या बहाण्याने ओटीपी मागवून लाखोंचा चुना लावला.
डिलिव्हरी न मिळाल्याने मुलीने गूगलवर सर्च करून कस्टमर केअरचा नंबर मिळवला. त्या नंबरवर संपर्क केला असता अजय नामक भामट्याने तिला डिलिव्हरीसाठी ऑनलाइन प्रोसेस करावी लागेल असे सांगून व्हिडीओ कॉल केला. त्याने वडिलांच्या मोबाईलवर आलेला ओटीपी मागितला. तसेच मोबाईलची स्क्रीन शेअर करण्यास सांगून 13 लाख 80 हजार 320 रुपयांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक केली. याबाबत माहिती मिळताच मुलीच्या वडिलांनी क्रेडिट कार्डची लिमिट तपासली असता भामट्याने त्याच्या खात्यातून अॅमेझॉन पे बंगळुरू येथे चार ट्रान्झेक्शन झाल्याचे दिसून आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मुलीच्या वडिलांनी तत्काळ सायबर हेल्पलाइनवर तक्रार नोंद केली. याप्रकरणी चितळसर मानपाडा पोलिसांनी भामट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.



























































