
पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी निवड झाल्यामुळे वॉर्नरवर अनेक टीकाकारांनी जोरदार टीका केली होती. आज डेव्हिड वॉर्नरने पहिल्या कसोटीत 164 धावांची झंझावाती खेळी करत आपल्या विरोधकांवर सपासप वार करत आपल्या शैलीत उत्तर दिले. त्याच्या घणाघातामुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसअखेर 5 बाद 346 अशी जबरदस्त मजल मारली. दिवसाचा खेळ थांबला तेव्हा मिचेल मार्श (15) आणि अॅलेक्स पॅरी (14) खेळत होते.
आजचा दिवस वॉर्नरचा होता. आपली अखेरची कसोटी मालिका खेळत असलेल्या वॉर्नरने वन डे क्रिकेटला साजेसा खेळ करताना पाकिस्तानी गोलंदाजीला अक्षरशः पह्डून काढले. त्याला निवृत्तीची मालिका दिल्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि वॉर्नरवर चोहोबाजूंनी टीका करण्यात आली होती. आज त्याने सर्वांची बोलती बंद केली. उस्मान ख्वाजासह (41) शतकी सलामी देताना त्याने 126 धावांची भागी रचली. मग त्याने आपले 26 वे शतक 125 व्या चेंडूंवरच साजरे केले. तसेच हे त्याचे पाकिस्तानविरुद्धचे दहावे शतक ठरले.


























































