हिंदुस्थानात पहिल्यांदाच डे-नाइट कसोटीचा धमाका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानला मायदेशातच नव्हे तर परदेशातही घवघवीत यश मिळवून माजी कर्णधार सौरभ गांगुली याने बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर रूढ होताच मंगळवारी ऐतिहासिक निर्णय घेतला. क्रिकेट जगतातील बहुतांशी देशांनी ‘डे–नाइट’ कसोटीला ग्रीन सिग्नल दाखवल्यानंतरही हिंदुस्थान यापासून दूर होता. मात्र कसोटी क्रिकेटला नवसंजीवनी मिळावी यासाठी सौरभ गांगुलीने विद्यमान कर्णधार विराट कोहलीशी चर्चा करून 

‘डे–नाइट’ कसोटीच्या आयोजनाबद्दल पाऊल उचलले. त्यानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डालाही ‘डे–नाइट’ कसोटीसाठी त्याने राजी केले. यामुळे आता 22 ते 26 नोव्हेंबर या कालावधी कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर हिंदुस्थान–बांगलादेश यांच्यामध्ये ‘डे–नाइट’ कसोटी रंगणार आहे. हिंदुस्थानातील ही पहिलीच ‘डे–नाइट’ कसोटी असेल. तसेच टीम इंडिया व बांगलादेशही पहिल्यांदाच ‘डे–नाइट’ कसोटी खेळणार आहे.

11 कसोटी… आठ देश.. अन् चार वर्षे

गुलाबी चेंडूने ‘डे–नाइट’ कसोटी खेळवण्यात येते. या गुलाबी चेंडूचा दर्जा तसेच यामुळे खेळताना होणार परिणाम यामुळे टीम इंडियाने याला सातत्याने विरोध केला. मात्र सौरभ गांगुलीने बीसीसीआयमध्ये कार्यरत होताच ‘डे–नाइट’ कसोटीला हिरवा कंदील दाखवला. याआधी 27 नोव्हेंबर 2015 रोजी ऑस्ट्रेलिया –न्यूझीलंड यांच्यामध्ये ऍडलेड येथे पहिला ‘डे–नाइट’ कसोटी सामना खेळण्यात आला होता. आतापर्यंत आठ देशांनी ‘डे–नाइट’ कसोटी खेळली आहे. तसेच 11 ‘डे–नाइट’ कसोटींचा थरार तमाम क्रिकेटप्रेमींनी अनुभवला आहे. तब्बल चार वर्षांनंतर हिंदुस्थान व बांगलादेशचा संघ ‘डे–नाइट’ कसोटी खेळणार आहे.

दिग्गजांचा होणार गौरव

कोलकात्यात होणाऱ्या या कसोटीत क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल व बीसीसीआय यांच्या वतीने दिग्गज खेळाडूंचा गौरव करण्यात येणार आहे. यामध्ये अभिनव बिंद्रा, पी. व्ही. सिंधू, मेरी कोम यांचा समावेश आहे.

गुलाबी चेंडूच्या दर्जाविषयी चिंता

बीसीसीआयकडून ‘डे–नाइट’ कसोटीला हिरवा कंदील दाखवण्यात आला असला तरी पुढील आव्हानासाठी त्यांना सज्ज राहावे लागणार आहे. गुलाबी चेंडूच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्हं आहेत. हिंदुस्थानातील वातावरण व खेळपट्टय़ांवर त्याचा निभाव लागणार का, हाही एक प्रश्नच. त्यामुळे आता बीसीसीआय पहिल्यावहिल्या ऐतिहासिक कसोटीआधी कशा प्रकारे सज्ज होतेय हे पाहणे रंजक ठरणार आहे.

दरवर्षी होणार कसोटी

ब्रेस्ट कॅन्सरच्या जनजागृतीसाठी ऑस्ट्रेलियात दरवर्षी पिंक कसोटीचे आयोजन करण्यात येते. अगदी त्याचप्रमाणे कोलकात्यातही दरवर्षी ‘डे–नाइट’ कसोटीचे आयोजन करण्यात येणार आहे. सौरभ गांगुलीकडून यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

द्रविडशी करणार चर्चा

सौरभ गांगुली बुधवारी राष्ट्रीय क्रिकेट ऍकॅडमीचा प्रमुख राहुल द्रविडशी चर्चा करणार आहे. यामध्ये हिंदुस्थानी क्रिकेटच्या भविष्याबद्दल योजना आखण्यात येतील. तसेच युवा खेळाडूंबद्दल महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करून त्याबद्दल निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे. सौरभ गांगुलीने प्रथम श्रेणी क्रिकेटपटूंबाबतही आपले मत व्यक्त करताना म्हटले की, या खेळाडूंशी करार करून त्यांना आर्थिक स्थिरता देण्याचा प्रयत्न असणार आहे.