‘डीडीएलजे’ची पंचविशी – लंडनच्या लिसेस्टर स्क्वेअरमध्ये फुलणार राज–सिमरनची प्रेमकहाणी

हिंदी चित्रपटसृष्टीत मैलाचा दगड ठरलेल्या ‘शोले’नंतर सर्वात लोकप्रिय ठरलेल्या ‘डीडीएलजे’ अर्थात ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या चित्रपटाने आज पंचविशी पूर्ण केली आहे. हा चित्रपट 20 ऑक्टोबर 1995 साली प्रदर्शित झाला होता. इतक्या वर्षानंतरही शाहरुख आणि काजोलने साकारलेल्या राज आणि सिमरनच्या प्रेमकहाणीची जादू जगभरातील प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे. राज आणि सिमरनची ही प्रेमकहाणी आता लंडनच्या प्रसिद्ध लिसेस्टर स्क्वेअरमध्ये फुलणार आहे. ‘डीडीएलजे’च्या पंचविशीनिमित्त येथे शाहरुख आणि काजोलचा कांस्य पुतळा उभारण्यात येणार आहे.

बॉलीवूडमध्ये लोकप्रियतेचे आणि कमाईचे उच्चांक मोडणाऱ्य़ा या चित्रपटाच्या पंचविशीचे सेलिब्रेशन आता सातासमुद्रापार लंडनमध्ये साजरे होणार आहे. हार्ट ऑफ लंडन बिझनेस अलायंसचे मार्प विलियम्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, लिसेस्टर स्क्वेअरमध्ये सीन इन द स्क्वेअर म्हणून राज आणि सिमरन यांचे पुतळे उभारण्यात येणार असून या चित्रपटातील एक दृश्य रिक्रिएट केले जाईल.

डीडीएलजे चित्रपटाचे आणि मुंबई सेंट्रलच्या मराठा मंदिर थिएटरचे वेगळेच नाते आहे. हा चित्रपट या थिएटरमध्ये सलग 24 वर्षे म्हणजे 1274 आठवडे चालला. अजूनही मॅटिनी शोवेळी हाऊसफुल्लचे बोर्ड झळकतात. लॉकडाऊनमुळे मार्चपासून थिएटर बंद आहे. त्यामुळे मराठा मंदिरमधील या चित्रपटाची पंचविशी हुकली आहे.

आतापर्यंत लिसेस्टर स्क्वेअरमध्ये हॉलीवूडच्या चित्रपटांचा सन्मान करण्यात आला आहे. ‘मिस्टर बीन’,  ‘हॅरी पॉटर’, ‘बॅटमॅन’, ‘बग्स बन्नी’, ‘सिंगिंग इन द रेन’, ‘वंडर वुमन’ आदींचे पुतळे उभारण्यात आले आहेत. डीडीएलजेला हा मान मिळाल्याने बॉलीवूडची मान अभिमानाने उंचावणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या