
मनोज मोघे । नागपूर
शिवसेनेचे अंधेरी पूर्वचे आमदार रमेश लटके यांच्या नागपुरातील आमदार निवासातील रुममध्ये विनोद अग्रवाल (५५) मृतावस्थेत आढळून आले. अनेक महिन्यापासून आजारी असलेले अग्रवाल यांना महिनाभरापूर्वीच आमदार लटके यांनी नियुक्त केले होते.
विनोद गुलाबचंद अग्रवाल यांचा मृतदेह आमदार निवासात मंगळवारी सकाळी आढळून आला. अंधेरी पूर्वचे आमदार रमेश लटके यांच्याकडे काही महिन्यांपूर्वीच ते सहाय्यक म्हणून कामाला लागले होते. विनोद अग्रवाल मूळचे अकोला जिल्ह्यातील अकोट येथील रहिवाशी आहेत. बुधवारपासून पावसाळी अधिवेशन सुरू होत असल्याने ते रविवारी नागपुरात पोहोचले होते. सोमवारी रात्री ते आमदार निवासातील दुसऱ्या क्रमाकांच्या रुम क्रमांक ४६ मध्ये थांबले होते. मंगळवारी सकाळी लटके यांचे स्वीय सहाय्यक संदीप बरकडे रुमवर गेल्यानंतर त्यांनी रूमचा दरवाजा ठोकला असता विनोद अग्रवाल यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे दरवाजा तोडून रुममध्ये प्रवेश केल्यानंतर ते बेडवर पडलेले आढळून आले. आमदार निवासात असलेल्या वैद्यकीय मदत केंद्रातील डॉक्टरांनी त्यांना तपासल्यानंतर मृत घोषित केले. लगेच ही माहिती सीताबर्डी पोलीस ठाण्याला देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात पाठविण्यात आला. विनोद अग्रवाल यांच्या नातेवाईकांना या घटनेची माहिती दिली असून ते नागपुरात पोहोचल्यानंतर मृतदेह त्यांच्याकडे सोपविण्यात येईल, असे सीताबर्डी पोलिसांनी सांगितले.
विनोद अग्रवाल हे ज्योती कलानी यांच्याकडे स्वीय सहाय्यक होते. मात्र सततच्या आजारपणामुळे त्याना नोकरी सोडावी लागली होती. त्यानंतरही अनेक महिने त्यांनी नोकरीसाठी प्रयत्न केल्यानंतरही त्यांना नोकरी मिळाली नव्हती. त्यामुळे त्यांनी आपल्याकडे विनंती केल्यानंतर त्यांना सहाय्यक म्हणून नियुक्ती देण्यात आली. त्यांच्या अकाली मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबियांना झालेल्या दुःखात आम्ही त्यांच्या सोबत आहोत अशी प्रतिक्रिया आमदार रमेश लटके यांनी दिली.

























































