तो मृतदेह शवविच्छेदनासाठी मिरजला, मृत्यूचे गूढ वाढले!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । देवगड

सौंदाळे – बावूळवाडी येथून बेपत्ता झालेल्या अनंत महादेव निकम (६०) यांचा नुसत्या हाडांचा मृतदेह तब्बल एक महिन्यानंतर हिंदळे येथे सापडला. ५ जून रोजी सकाळी ९ वा. च्या सुमारास घरी काहीही न सांगता अनंत निकम निघून गेले होते. अनंत निकम हे हिंदळे येथे एका काजूच्या बागेची राखण करण्यासाठी कामाला होते.

३ जुलै रोजी सकाळी १० वा.च्या सुमारास शोधाशोध केली असता काजूच्या बागेतच वसंत निकम यांना अनंत निकम यांची मानवी शरीराचे हाडे निदर्शनास आली. त्यांनी तात्काळ नातेवाईक व पोलिसांना या बाबतची माहिती दिली असता अनंत निकम यांनी घातलेले कपडे व चप्पल यावरून सदर मानवी हाडे अनंत निकम यांचीच असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान या घटनेची नोंद देवगड पोलिस स्थानकात करण्यात येवून देवगड पोलिसांमार्फत अधिक तपास सुरू होता. या तपासात सदर मृतदेह शवविच्छेदन करून ताब्यात घेण्यास नातेवाईक तयार होते. परंतु त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होवू न शकल्याने अधिक तपासाकरीता सदर मृतदेह सिलबंद करून देवगड पोलिसांनीं मिरज येथे शवविच्छेदनाकरीता रवाना केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक जी. व्ही. वारंग यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक एम.एम.पानसरे करीत आहेत.