धक्कादायक! पाण्याच्या व्हॉल्व्हमध्ये सापडली डुकरांची मृत पिल्ले

1291

निफाड नगर पंचायतीच्या उदासीनतेमुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उगाव रोड येथील संत जनार्दन स्वामीनगरातील पिण्याचे पाणी सोडणाऱ्या व्हॉल्वमध्ये डुकराची 7 ते 8 मृत पिले रविवारी सापडली. शहरात डेंग्यू रुग्णांची संख्या वाढलेली असतानाही निफाड नगर पंचायत आरोग्य व स्वच्छता व्यवस्थेकडे दुर्लक्ष करीत असून रुग्णांची संख्या वाढल्यावर प्रशासनाला जाग येणार का, असा प्रश्न पडला आहे.

निफाड शहरात डुकरांनी अक्षरशः हैदोस घातला असून शहरातील प्रत्येक गल्ली, कॉलनीमध्ये डुकरांच्या झुंडीच्या झुंडी फिरतात. या डुकरांचा बंदोबस्त न केल्याने उघडय़ा गटारी, सार्वजनिक कचराकुंडीमध्ये डुकरांचा दिवसभर राबता असतो.उगाव रोडलगत असणाऱया कॉलनीमध्ये निफाड नगर पंचायतीचा पाणी सोडण्याचा व्हॉल्व आहे. त्यामध्ये रविवारी रात्री डुकराची पिले पडलेली दिसली. नागरिकांनी फोन केल्यानंतर सोमवारी सकाळी ही पिले घंटागाडीत नेण्यात आली. या व्हॉल्वमधून या परिसराला पाणी सोडले जाते. हा व्हॉल्व लीक असल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले. नगर पंचायतीचे प्रशासकीय अधिकारी यांचे शहरातील आरोग्य, स्वच्छता व्यवस्थेकडे सपशेल दुर्लक्ष होत आहे.

आता ज्या ठिकाणी व्हॉल्व आहे तिथे पूर्वी खड्डा होता. त्या खड्डय़ात लोक पडायचे म्हणून नागरिकांच्या मागणीनंतर तिथे सिमेंट काँक्रीटचा चेंबर बनवण्यात आला. तो जमिनीपासून उंच करावा अशी मागणी आहे. शिवाय त्याला जाळी टाकली नाही. त्यामुळे कुत्रे, डुकरे त्यात पडतात. पावसाचे पाणी व्हॉल्वमधून थेट पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइनमध्ये जाते. त्यामुळे शहरात साथीचे रोग वाढतील की काय अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या