
सामना प्रतिनिधी । कल्याण
6 जुलै 2006 ची रात्र.. भिवंडीच्या कोटरगेट मशिदीसमोर पोलीस ठाणे नको, अशी बोंब ठोकत रझा अकादमीच्या धर्मांधांनी बांधकामावरच तुफान हल्ला चढवला आणि भिवंडीत दंगल उसळली. आपले कर्तव्य बजावणारे बहाद्दर पोलीस बाळासाहेब गांगुर्डे आणि रमेश जगताप यांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली. या काळ्याकुट्ट दुर्दैवी घटनेस 12 वर्षांचा काळ लोटला तरी पोलीस चौकीची साधी वीटही रचली गेली नाही. हे गणराया, सरकारला सुबुद्धी दे, असे साकडे घालणारा देखावा विजय तरुण मित्र मंडळाने उभारला आहे. विशेष म्हणजे शहीद पोलिसांच्या नातेवाईकांना पत्रकार परिषदेत येण्यापासून पोलिसांनी रोखल्याने तीक्र संताप व्यक्त होत आहे.
भिवंडीतील कोटरगेट पोलीस चौकीची दंगल सरकारी यंत्रणा विसरली असली तरी देशभक्त नागरिक शहीदांचे बलिदान अजून विसरलेले नाहीत. विजय तरुण मित्र मंडळाचे अध्यक्ष व शिवसेना महानगरप्रमुख विजय साळवी यांनी पुढाकार घेऊन या विषयावर रामबागेत ‘कडक’ देखावा उभारला आणि या विषयाला पुन्हा एकदा वाचा फुटली. वास्तविक या घटनेत शहिद झालेले गांगुर्डे व जगताप यांना अजूनही न्याय मिळालेला नाही. याबाबत म्हणणे मांडण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांना पत्रकार परिषदेसाठी बोलावले होते, पण पोलिसांनी त्यांना समज देत रोखले असल्याचा आरोप विजय साळवी यांनी केला आहे.
मेजर महाडिक यांच्या कुटुंबीयांस मदत
सीमेवर आपल्या प्राणांचे बलिदान देणारे मेजर प्रसाद महाडिक यांच्या कुटुंबीयांना विजय तरुण मित्र मंडळाच्या वतीने 50 हजार रुपयांची मदत करण्यात आली. तसेच मेजर महाडिक यांच्या वीरपत्नी गौरी महाडिक यांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी शहरप्रमुख विश्वनाथ भोईर, नगरसेवक दशरथ घाडीगावकर, नगरसेविका वीणा जाधव, शीतल भंडारी, सार्वजनिक वाचनालयाचे सरचिटणीस भिकू बारस्कर आदी उपस्थित होते. माझ्या पतीने देशासाठी सर्वोच्च त्याग केला असून मीदेखील सैन्यात भरती होणार असल्याचे यावेळी गौरी महाडिक म्हणाल्या.
























































