
सामना प्रतिनिधी, मुंबई
माता मृत्यूदर कमी करण्यात महाराष्ट्राने देशात दुसरा क्रमांक पटकावला आहे. या कामगिरीबद्दल केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांच्या हस्ते महाराष्ट्राला पुरस्काराने गौरविण्यात आले. नवी दिल्लीत आयोजित सोहळय़ात राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
माता मृत्यूदर कमी करण्यात केरळ देशात प्रथम असून त्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक आहे, तर तिसऱ्या क्रमांकावर तामीळनाडू राज्य आहे. जागतिक आरोग्य संघटनेने हिंदुस्थानला २०३० पर्यंत माता मृत्यूदर कमी करून ७० वर आणण्याचे उद्दिष्ट दिले होते. महाराष्ट्राने २०१८ मध्येच हे उद्दिष्ट साध्य करत माता मृत्यूदर ६८ वरून ६१ वर आणण्यात यश मिळविले आहे. यासाठी मनापासून प्रयत्न केलेल्या आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, वैद्यकीय अधिकारी यांचे डॉ. दीपक सावंत यांनी अभिनंदन केले तसेच माता मृत्यूदर अजून कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे डॉ. सावंत यांनी यावेळी सांगितले.
हिंदुस्थानातील ३८टक्के मृत्यू रक्तस्रावामुळे
हिंदुस्थानातील ३८ टक्के माता मृत्यू हे प्रसूतीनंतरच्या रक्तस्रावामुळे होतात असे अभ्यासाअंती सिद्ध झाले आहे. या रक्तस्राव प्रक्रियेला वैद्यकीय परिभाषेत पीपीएल असे म्हटले जाते. फेरिंग फार्मास्युटिकल्स आणि एमएसडी फॉर मदर्स यांच्या सहकार्याने जागतिक आरोग्य संघटनेने चॅम्पियन क्लिनिकल ट्रायलचे निष्कर्ष जाहीर केले आहेत. दरवर्षी १.४० कोटी महिला पीपीएचग्रस्त असल्याचे आढळून आले आणि त्यातील ७० हजार माता मृत्युमुखी पडतात. हा मृत्यूदर रोखण्यासाठी कार्बेटोसिनचे जगभरात वाटप करणे आवश्यक असल्याचे फेरिंगचे प्रा. क्लॉस दुर्गा यांनी सांगितले.
























































