Death threat to Rahul Gandhi राहुल गांधींना बॉम्बने उडवून देण्याची धमकी, आरोपीला इंदूरमधून अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला इंदूर पोलिसांनी अटक केली आहे. दयासिंग उर्फ ऐशीलाल झाम (Dayasingh alias Aishilal Jham) असे 60 वर्षीय आरोपीचे नाव आहे. गेल्या वर्षी भारत जोडो यात्रेदरम्यान (Bharat Jodo Yatra) ही धमकी देण्यात आली होती.

राहुल गांधी यांनी गेल्या वर्षी काँग्रेसला नवसंजीवनी मिळवून देण्यासाठी देशभरात भारत जोडो यात्रा काढली होती. या यात्रेला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. ही यात्रा मध्य प्रदेशमध्ये दाखल होण्यापूर्वी राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. एका पत्राद्वारे ही धमकी देण्यात आली होती.

इंदूरमधील एका मिठाईच्या दुकानाबाहेर हे पत्र मिळाले होते. भारत जोडो यात्रा इंदूरमध्ये दाखल होताच राहुल गांधी यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी पत्र पाठवणाऱ्याने दिली होती. त्यानंतर अज्ञात आरोपीविरोधात भादवी कलम 507 अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला होता.

या प्रकरणी 24 नोव्हेंबर रोजी दयासिंग उर्फ ऐशीलाल झाम यांना अटक करण्यात होती. 29 नोव्हेंबरला ते जामिनावर बाहेर आले होते. त्यानंतर त्यांच्यावर रासुका लावण्यात आला होता. तेव्हापासून ते फरार होते. मधल्या काळात त्यांनी देशातील विविध शहरांमध्ये आणि गुरुद्वारांमध्ये आसरा मिळवला होता.

गुरुवारी रेल्वेने पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांना अटक केली. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निमिश अग्रवाल यांनी झामला यांच्या अटकेबाबत माहिती दिली. आरोपीने राहुल गांधी यांना पत्र पाठवण्यामागील कारण स्पष्ट झालेले नाही. त्याचा तपास सुरू असल्याचे अग्रवाल म्हणाले.

काय होतं पत्रात?

मिठाईच्या दुकानाबाहेर मिळालेल्या पत्रावर वाहे गुरू लिहिण्यात आले होते. त्याखाली 1984मध्ये झालेल्या शीखविरोधी दंगलीचा उल्लेख करण्यात आला होता. या अत्याचाराविरोधात कोणत्याही पक्षाने आवाज उठवला नाही, असेही या पत्रात नमूद करण्यात आले होते. तसेच काँग्रेस नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याबाबत आपत्तीजनक शब्दांचा वापर करण्यात आला होता आणि राहुल गांधांनी बॉम्बने उडवून देऊ अशी धमकी देण्यात आली होती.