कर्जबाजारी तरुणाची गळफास घेउैन आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
suicide

सामना ऑनलाईन, संभाजीनगर

गावाकडील लोकांकडून व्यापारासाठी उसने पैसे आणले. त्यातील काही पैसे फेडलेही. मात्र, मुलांची फीस भरू शकत नसल्याची खंत व्यक्त करत एका 30 वर्षीय कर्जबाजारी तरुणाने राहत्या घरी गळफास घेउैन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना गारखेडा परिसरातील हुसेन कॉलनीत घडली. पुंडलिकनगर पोलिसांनी चिठ्ठी जप्त करून तपासाला सुरुवात केली आहे.

गारखेडा परिसरातील हुसेन कॉलनीत राहणारा जगदीश संतोष जव्हेरी (30) हा तरुण व्यापारी होता. पित्राचा कार्यक्रम असल्याने जगदीश याने पत्नी व दोन मुलींना अक्कलकुआ गावाला पाठवले होते. तो घरात एकटाच होता. सोमवारी दुपारी त्याने राहत्या घरी फेटय़ाने गळफास घेतला. सायंकाळी जगदीशचे मित्र घरी गेले असता, दार आतून बंद होते. मित्र व घरमालकांनी दार वाजवले, मात्र आतून प्रतिसाद मिळत नसल्याने घरमालकाने खिडकीतून हात घालून दार उघडले असता जगदीश हा लटकलेला दिसला. तात्काळ त्यास खाली उतरवून या प्रकरणाची महिती पुंडलिकनगर पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पुंडलिकनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यास घाटीत दाखल केले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. पोलिसांनी घटनास्थळावरून एक चिठ्ठी जप्त केली आहे. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे हेडकॉन्स्टेबल बाबुराव पांढरे यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपासाला सुरुवात केली आहे.