
ती आली, तिनं पाहिले, तिनं जिंकून घेतले सारं…‘दख्खणची राणी’ ठरली स्टार… अशीच काही अवस्था मुंबई ते पुणे धावणार्या रेल्वेच्या पहिल्या डिलक्स ट्रेन ‘डेक्कन क्वीन’ची आहे. ‘डेक्कन क्वीन’ला 92 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने तिच्या नव्या ‘एलएचबी रूपाचं’ दर्शन सर्वांना झालं. 22 जूनपासून तिच्या नव्या रूपात ती प्रवाशांच्या सेवेला येणार असून वातानुकूलित ‘डायनिंग कार’ मधून रोजचा मुंबई ते पुणे प्रवास करणार्या प्रवाशांना आवडीचे कटलेट सँडविच, ऑम्लेट सँडविच आणि साबुदाणा वड्याची लज्जत घेता येणार आहे.
डेक्कन क्वीन ही महाराजा एक्स्प्रेस, डेक्कन ओडिसीसारख्या पंचतारांकित ट्रेनचा अपवाद वगळ्यास धावते उपहारगृह (डायनिंग कार) असलेली एकमेव ट्रेन आहे. या ट्रेनला एलएचबी तंत्रज्ञानाचे डबे जोडल्याने ती आता अधिक सुरक्षित झाली आहे. या गाडीत एकावेळी 32 प्रवाशांना नाश्ता करण्याची सोय आहे. शिवाय आता नव्या एलएचबी रूपात तिची प्रवाशांची क्षमता पारंपारिक रूपातील 1232 प्रवासी क्षमतेऐवजी आता 1417 ती प्रवासी क्षमतेने धावणार असून तिची प्रवासी क्षमता 15 टक्क्यांनी वाढणार आहे.
विस्टाडोम कोच नव्या वैशिष्ट्यांनी सज्ज
1 जून 1930 रोजी ब्रिटींशांच्या काळात मुंबई ते पुणे या दोन महानगरांना जोडणारी ही डिलक्स ट्रेन सुरू झाली. 15 ऑगस्ट 2021 पासून या गाडीला पारदर्शक छताचा विस्टाडोम कोच जोडला आहे. आता नवा पारदर्शक छताचा ‘एलएचबी विस्टाडोम’ कोच विविध अँगलने फिरणार्या आरामदायी व आकर्षक रंगसंगतीच्या खुर्च्यांनी सज्ज झाला आहे. यावेळी केक कापून रेल फॅननी डेक्कन क्वीनचा वाढदिवस साजरा केला.





























































