डेक्कन क्वीनच्या पारदर्शक विस्टाडोम कोचला नवा साज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य रेल्वेने मुंबई ते पुणे धावणाऱया प्रतिष्ठीत ‘डेक्कन एक्स्प्रेस’ला 15 ऑगस्टपासून पारदर्शक ‘विस्टाडोम कोच’ बसविण्याचा निर्णय घेतला होता. हा विस्टाडोम कोच एलएचबी बनावटीऐवजी पारंपरिक आयसीएफचा आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या माटुंगा कार्यशाळेत त्याची रंगरंगोटी करून त्याला नवा साज देण्यात आला आहे.

‘डेक्कन क्वीन’ ट्रेन पारंपरिक आयसीएफच्या कोचची असून तिला एकमेवाद्वितीय अशी ‘डायनिंग कार’ (चालते उपाहारगृह) जोडलेली आहे. या गाडीचे इतर गाडय़ांप्रमाणे आधुनिकीकरण करण्याची रेल्वेची योजना आहे. त्यासाठी एलएचबी डबे जोडण्यात येणार आहेत. परंतु एलएचबी डब्यांना अनुरूप अशी एलएचबी डायनिंग कार बनविण्याचे काम अद्याप सुरू आहे. त्यामुळे तिला सध्या एलएचबी विस्टाडोम कोच ऐवजी आयसीएफचा विस्टाडोम कोच बसविण्यात आला आहे.

डायनिंग कारचे एलएचबीकरण

कोकण मार्गावर दादर-मडगाव जनशताब्दीनंतर मुंबई ते पुणे मार्गावर धावणाऱया डेक्कन एक्स्प्रेसला 26 जूनपासून एलएचबी डब्ब्यांसह पारदर्शक विस्टाडोम कोच जोडण्यात आला आहे. लोणावळा आणि खंडाळा घाटातील निसर्गाचा प्रवाशांना त्यामुळे मनमुरादपणे आनंद लुटता येत आहे. याच मार्गावर धावणाऱया डेक्कन क्वीन या प्रसिद्ध ट्रेनलाही 15 ऑगस्टपासून विस्टाडोम कोच जोडण्यात येत आहे. डेक्कन क्वीनला एलएचबीचे आधुनिक डब्बे बसवायचे आहेत. मात्र, तिचे वैशिष्टय़ असलेली ‘डायनिंग कार’ एलएचबीत रूपांतर करण्याचे अवघड शिवधनुष्य पेलावे लागणार आहे. डेक्कन क्वीनला एलएचबी डायनिंग कार बहाल केल्यावर तिला वेगळी रंगसंगती मिळणार आहे. त्यानंतर तिला एलएचबी विस्टाडोम जोडणेही शक्य होणार आहे. मात्र तोपर्यंत आयसीएफचा विस्टाडोम कोच जोडण्यात आला असून त्याला मध्य रेल्वेने नवीन रंगसंगती दिली आहे.