डेक्कन नदीपात्रात मगर दिसल्याची अफवा, पोलीस नियंत्रण कक्षाला तरूणाने केला फोन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

पुणे शहरातील डेक्कन नदीपात्रातील भिडे फुलाजवळ मगर दिसल्याचा फोन तरूणाने पोलीस नियंत्रण कक्षाला केला होता. त्यामुळे डेक्कन पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेउन खातरजमा केली. मात्र, पाण्यातील कचऱ्यात अडकलेली प्लास्टिकची बाटली मगर सदृश्य दिसल्याचे आढळून आल्यानंतर पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

नदीपात्रात मगरीची अफवा पसरल्यामुळे शेकडो नागरिकांनी परिसरात गर्दी केली होती. भिडे पुलावरून जाणाऱ्या काही नागरिकांना आज दुपारच्या सुमारास नदीपात्रात मगर सदृश्य असल्याचे जाणवले. त्यामुळे एका तरूणाने पुणे पोलिस नियत्रंण कक्षाला फोन करून माहिती दिली. त्यानुसार डेक्कन पोलिसांनी येथे धाव घेत मगरीचा शोध घेण्याचा शोध सुरू केला. परिसराती नागरिकांना पोलिसांनी मगर कुठे दिसली अशी विचारणा केली.

त्यावेळी नागरिकांनी पोलिसांना एक ठिकाण दाखवले. पोलिसांनी तेथे बारकाईने पाहणी केल्यानंतर पाण्यातील कचऱ्यामध्ये प्लास्टिकची बाटली अडकली होती. पाण्याच्या प्रवाहाबरोबर बाटली हलत असल्याचे दिसून आले. त्यामुळे नागरिकांना मगरीचा भास झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांनी पोलिस नियंत्रण कक्षाला फोन केल्याचे सांगितले. मगर आल्याच्या अफवेने भिडे पुलावर नागरिकांनी गर्दी केली होती.

नदीपात्रातील पूलावरून प्रवास करणाऱ्या प्रत्येकाकडून गर्दी झाल्याची विचारणा केली जात होती. त्यानंतर नदीपात्रात मगर असल्याचे ऐकताच खाली उतरून पाहण्यासाठी धडपड अनेकांकडून केल्याचे दिसून आले.