बूस्टर डोसवर दोन आठवडय़ांत निर्णय, पुढील आठवडय़ात बैठक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र सरकारचे एक पॅनेल देशात बूस्टर डोस आणि मुलांसाठी लस यावरील धोरण दोन आठवडय़ांत निश्चित  करण्याची शक्यता आहे. किरकोळ आजारांना बळी पडणाऱया मुलांसाठी लसीकरण प्रक्रिया जानेवारीपासून सुरू होऊ शकते. तसेच पुढील आठवडय़ात सरकारचा उच्च सल्लागार गट मुलांच्या लसीकरणासह अनेक महत्त्वाच्या मुद्दय़ांवर चर्चा करणार असल्याचेदेखील सूत्रांचे म्हणणे आहे.

लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाची (NTAGI) पुढील आठवडय़ात बैठक होणार आहे. या बैठकीत कोविड-19 लसीचे अतिरिक्त डोस म्हणजेच बूस्टर डोस देण्यावरही सर्वसमावेशक कृती आराखडा तयार केला जाऊ शकतो. आजाराने ग्रस्त बालकांचे लसीकरण जानेवारीमध्ये सुरू होऊ शकते. मार्चपर्यंत इतर सर्व मुलांसाठी लसीकरण सुरू होऊ शकते. सरकार सध्या हर घर दस्तक मोहिमेद्वारे लस सर्वांना देण्याची तयारी करीत आहे.

मुलांचे लसीकरकरण सुरू करा – टोपे

लहान मुलांच्या लसीकरणाला परवानगी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. शाळा सुरू झाल्याने मुलांचे लसीकरण तातडीने होणे गरजेचे असल्याचे टोपे यांनी म्हटले आहे.