
येत्या घटस्थापनेपासून महाराष्ट्रातील सर्व धार्मिक स्थळे उघडण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याने वारकरी भाविक अन पंढरीतील व्यापाऱ्यांमध्ये चैतन्याचे वातावरण पसरले आहे. दरम्यान मंदिर समितीने दर्शन मंडप आणि मंदिराची साफसफाई हाती घेतली असून युद्धपातळीवर हे काम सुरु आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 5 एप्रिल 2021 पासून पंढरपूरचे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले होते. या दरम्यान आलेल्या यात्रा देखील प्रातिनिधिक स्वरुपात साजऱ्या केल्या गेल्या. मंदिरे उघडा यासाठी वारकरी भाविकांतून मागणी होत होती याची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येत्या 7 ऑक्टोबर पासून काही अटी नियम घालून मंदिर उघडण्यास संमती दिली आहे. दरम्यान मंदिर व्यवस्थापनाला भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्याची विशेष सूचना दिल्या आहेत. मंदिर उघडण्याने कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे. दर्शनाबाबत शासनांकडून अद्याप सविस्तर खुलासा आला नसल्याने दर्शन पदस्पर्श करुन असणार की मुखदर्शन यावर निर्णय झालेला नाही.
याबाबत मंदिर समिती एक बैठक घेऊन यावर निर्णय घेणार असल्याचे समजते आहे. लॉकडाऊनमुळे श्री विठ्ठल मंदिर पहिल्यांदा मार्च 2020 मध्ये कुलूप बंद झाले होते. पहिली लाट काहीशी ओसरल्यानंतर मुखदर्शन सुरु करण्यात आले होते मात्र पुन्हा दुसरी लाट सुरु झाल्याने मंदिर पुन्हा बंद करण्यात आले. त्यामुळे मंदिर गेल्या 6 महिन्यापासून बंद होते. वारकरी भाविकांना श्री विठुमाऊलीचे कसलेच दर्शन नसल्याने भाविकांत नाराजीचा सुरु होता. मंदिर बंद असल्याने पंढरपूरची बाजारपेठ ठप्प झाली होती. आता पुन्हा मंदिर सुरु होण्याच्या हालचाली सुरु झाल्याने भाविक आणि खास करुन व्यापारी वर्गात चैतन्याचे वातावरण आहे. मंदिर उघडण्याचा निर्णय झाल्यानंतर पंढरपूर मधील शिवसैनिकांनी पेढे वाटून आपला आनंद व्यक्त केला.
स्वच्छता मोहीम जोमाने…
गेल्या दीड वर्षांपासून मंदिर बंद आहे या बंद कालावधीत मंदिरातील नित्य उपचार व पूजाअर्चा सुरु आहेत मात्र दर्शन मंडप आणि मंदिराचा इतर भाग आता वापरात येणार आहे त्यामुळे समितीने संपूर्ण स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे.
बालाजी पुदलवाड – व्यवस्थापक, श्री विठ्ठल मंदिर समिती पंढरपूर




























































