वसमत आणि औंढा तालुक्यात दुष्काळ जाहीर करा – आमदार मुंदडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । वसमत

औंढा नागनाथ आणि वसमत या दोन तालुक्यातील भुगर्भातील पाणी पातळी एक ते पाच मीटरने खाली गेली असुन पावसाअभावी पीके वाळुन गेल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे वसमत व औंढा हे दोन्ही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करावेत, अशी आग्रही मागणी शिवसेनेचे माजी सहकारमंत्री तथा आमदार डॉ. जयप्रकाश मुंदडा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज २३ ऑक्टोबर रोजी मुंबई येथे भेटुन निवेदनाव्दारे केली आहे.

हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी, सेनगाव आणि हिंगोली या तीन तालुक्यांचा समावेश संभाव्य दुष्काळी तालुक्यात करण्यात आला असुन पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी या तीन तालुक्यात दौरा केला. मात्र, वसमत आणि औंढा या दोन तालुक्यात पालकमंत्री फिरकले नाहीत. महसुल प्रशासनाने काढलेल्या पीक आणेवारीचा आधार घेतला जात असला तरीही वसमत व औंढा या तालुक्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती पावसाअभावी बिकट झाली आहे. या पाश्र्वभुमीवर शिवसेनेचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ. जयप्रकाश मुंदडा यांनी आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली. मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात आमदार मुंदडा यांनी म्हंटले आहे की, वसमत व औंढा या दोन तालुक्यातील भुगर्भातील पाणी पातळी जवळपास १ ते ५ मीटरने खाली गेली आहे. पावसाअभावी सर्व पीके जवळजवळ वाळुन गेली आहेत. तसेच शेतकऱ्यांचे खुप नुकसान झाले आहे. या परिस्थितीचा विचार करुन हे दोन्ही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करावेत, अशी मागणी मुंदडा यांनी केली.