शिक्षक होण्यासाठी ‘बीएड’च करावे लागणार! आता ‘डीएड’ बंद; ‘स्पेशलायझेशन’द्वारे विषय निवडण्याचे स्वातंत्र्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

2030 पर्यंत महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये शिक्षण विभाग स्थापन करण्याची शिफारस राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात करण्यात आली आहे. या विभागामार्फत शिक्षणशास्त्र पदवी (बी.एड.), शिक्षणशास्त्र निष्णात पदवी (एम.एड.) आणि शिक्षणशास्त्रातील विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी देणारे अभ्यासक्रम तयार केले जाणार आहेत. त्यामुळे बारावीनंतरचा दोन वर्षांचा डी.एड. अभ्यासक्रम बंद होण्याची शक्यता असून डॉक्टर, इंजिनीअरिंगच्या अभ्यासक्रमाप्रमाणे शिक्षक बनण्यासाठी बारावीनंतर शिक्षणशास्त्र विषय घेऊन किमान चार वर्षांचा बी.एड. अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे.

शिक्षक बनण्यासाठी बी.एड. अभ्यासक्रम नव्या रूपात येणार आहे. यात विस्तृत ज्ञान-आशय (थेअरी), स्पेशलायझेशन विषय आणि भरीव प्रात्यक्षिक कार्य (प्रत्यक्ष शाळेत जाऊन शिकविणे) यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर शेवटच्या सेमिस्टरला ज्या क्षेत्रात आवड आहे त्यास त्यासंबंधीची सहा महिने ऍप्रेंटायझेशन, इंटर्नशिप करावी लागेल. त्यानंतर विद्यार्थी शिक्षक म्हणून नोकरी करण्यासाठी पूर्णपणे तयार होतील.

बी.एड.ला 80-90 टक्के गुण मिळविलेल्या विद्यार्थ्याची शाळेत शिक्षकपदी रुजू झाल्यावर खरी गुणवत्ता समजते. पेपर सेट कसा करावा, गृहपाठ किती द्यावा, पालकांशी बोलण्याचे कसब, कमी वेळेत जास्तीत जास्त मुलांशी संवाद साधण्याचे कौशल्य ‘ऑन फिल्ड’ म्हणजेच एखाद्या शाळेत प्रत्यक्ष शिकविण्याच्या अनुभवातून विकसित होते. त्यामुळे शिक्षकी पेशात प्रात्यक्षिक कार्याला महत्त्व असून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात त्याचा प्राधान्याने विचार केला आहे.
– डॉ. मधुरा फडके, अभ्यासक

शिक्षकांसाठीचा सध्याचा अभ्यासक्रम
– जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षक होण्यासाठी बारावीनंतर दोन वर्षांचे डी.एड.
– माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांसाठी बी.एड. बंधनकारक.

अशी घेता येईल शिक्षणशास्त्र विषयाची पदवी
– बारावीनंतरचा चार वर्षांचा इंटिग्रेटेड बी.एड. पदवी अभ्यासक्रम
– तीन वर्षांची पदवी पूर्ण झालेल्या विद्यार्थ्याला दोन वर्षांच्या बी.एड. इंटिग्रेटेड अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येईल.
– चार वर्षांची पदवी पूर्ण झालेल्या किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्याला एक वर्षाचा बी.एड. इंटिग्रेटेड अभ्यासक्रम करता येईल.