दीपिका पडुकोण आता होणार स्पेस क्वीन …

सामना ऑनलाइन | मुंबई

बॉलीवूड मधील कायमच चर्चेत असणारी अभिनेत्री दीपिका पडुकोण आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. बॉलीवूड क्वीन दीपिका आता स्पेस मधील क्वीन होणार आहे. दीपिका पडुकोण सॅटेलाइट लॉन्च करण्यात एक प्रमुख भूमिका बजावणार आहे.

बॉलीवूडचे अनेक कलाकार हे अभिनयाखेरीज इतर व्यवसायात देखील गुंतवणूक करतात. त्याप्रमाणे दीपिकाने देखील अनेक व्यवसायात गुंतवणूक केली आहे. दीपिकाने बंगळुरू येथील एका स्पेस कंपनीत गुंतवणूक केली आहे. बंगळुरू येथील बॅलाट्रिक्स एरोस्पेस या कंपनीने बाजारात 30 लाख डॉलर इतकी रक्कम  गुतंवली असून त्यात दीपिकाचा देखील समावेश आहे. मात्र यात दीपिकाने एकूण किती गुंतवणूक  केली आहे याचा खुलासा अजून झालेला नाही. असे असले तरी देखील ही एक मोठी रक्कम असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

बंगळुरूची ही कंपनी अंतराळात पाठवण्यात येणाऱ्या उपग्रहांमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. अंतराळ मोहिमेवरील खर्च कमी करण्याचा प्रयत्न देखील करण्यात येत आहे. बॅलाट्रिक्स एयरोस्पेस ही कंपनी विद्युत रसायनाचा वापर करून उपग्रह अंतराळात पाठवणार आहेत; तसेच यामुळे वायु प्रदुषण कमी होण्यास मदत होणार आहे. येणारा काळ हा अंतराळ तंत्रज्ञानातील स्पर्धेचा काळ असून तज्ज्ञांच्या माहितीनुसार तीन वर्षात जगभरातून 17 हजार लहान उपग्रह अंतराळात पाठवण्यात येणार आहेत.