सांबराने बदला घेतला, शिकार करता करता शिकारीच मेला.

अमेरिकेमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. एका बंदूकधारी शिकाऱ्याचा सांबराने जीव घेतला आहे. हातात बंदूक असूनही शिकाऱ्याचा मृत्यू झाल्याने अनेकांना आश्चर्य वाटलं होतं. मात्र जेव्हा त्याच्या मृत्यूमागचे सत्य उझेडात आले तेव्हा सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. थॉमस अलेक्झांडर असे या शिकाऱ्याचे नाव असून तो 66 वर्षांचा होता.

अमेरिकेतील वर्तमानपत्रांनी दिलेल्या बातम्यांमध्ये म्हटले आहे की थॉमस शिकारीसाठी ओझार्कच्या डोंगराळ परिसरात गेला होता. त्याने एका सांबरावर नेम धरला आणि गोळी झाडली. हे सांबर खाली पडल्याचं त्याने बघितलं. थॉमसने सांबराच्या जवळ जाऊन पाहायचं ठरवलं. हरिणाच्या जवळ तो पोहोचला आणि त्याने सांबराच्या छातीजवळचा भाग पाहायला सुरूवाच केली. अचानक सांबर उठले आणि त्याने थॉमसवर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये थॉमस गंभीर जखमी झाला होता.

थॉमनसे जखमी अवस्थेत कसाबसा त्याच्या बायकोला फोन केला. त्याच्या बायकोने आपत्कालीन विभागाला या घटनेबाबत कळवलं. त्यांचं एक पथक घटनास्थळी दाखल झालं आणि त्यांनी थॉमसला रुग्णालयात दाखल केलं, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. आपल्या 20 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये आपण कधीही अशी घटना पाहिली अथवा ऐकली नव्हती असं स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. थॉमसच्या मृत्यूचे नेमके कारण काय आहे हे शवविच्छेदन अहवालामध्ये कळेल. मात्र डॉक्टरांनी त्याच्या अंगावर धारदार वस्तूने खुपसल्याच्या खुणा असल्याचं म्हटलं आहे. सांबराच्या शिंगामुळे या जखमा झाल्या असाव्यात असा प्राथमिक अंदाज आहे.

आपली प्रतिक्रिया द्या