
सामना ऑनलाईन । परभणी
गंगाखेडचे राष्ट्रवादी काँग्रसचे विद्यमान आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे यांच्या विरोधात गंगाखेड न्यायालयात ५० कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल झाला आहे. न्यायालयाने या प्रकरणी आमदार डॉ. केंद्रे यांना नोटीसाही बजावल्या आहेत. गंगाखेडच्या जवळच असलेल्या माखणी येथे उभारण्यात आलेल्या गंगाखेड शुगर्स या खासगी कारखान्याचे चेअरमन तथा सुप्रसिद्ध उद्योजक डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी हा दावा दाखल केला. या प्रकरणावरुन राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे यांनी नुकतीच परभणी येथे राष्ट्रवादी भवनात पत्रकार परिषद घेऊन १९ जून रोजी डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या विरोधात आरोप करुन प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला. या पत्रकार परिषदेतील वृत्त २० जून रोजी विविध वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाले. त्यात रत्नाकर गुट्टे यांच्या कर्जामुळे शेतकर्यांना नोटीसा, हे तर महाराष्ट्राचे निरव मोदी, कोट्यावधीशी बेकादेशीर कर्ज घेणार्या गुट्टेंची चौकशी करा, ४० कोटींची संपत्ती असणार्या गुट्टेंना ५ हजार ४०० कोटींची वैयक्तीक कर्ज अशा मथळ्याखाली बातम्या प्रसिद्ध झाल्याने रत्नाकर गुट्टे यांची समाजात बदमानी झाली. गुट्टे यांनी वकीलामार्फत २९ जून रोजी रजिस्टर पोस्टाने डॉ. मधुसूदन केंद्रे यांना कायदेशीर नोटीस पाठवून बदनामी झाल्याचे आणि सर्व उद्योगांमध्ये नुकसान झाल्याबाबत कळविले होते. या नोटीसद्वारे डॉ. गुट्टे यांनी डॉ. मधुसूदन केंद्रे यांना या कृत्याबद्दल क्षमा मागण्यांची संधी दिली होती. परंतु डॉ. केंद्रे यांनी ही नोटीस प्राप्त होऊनही कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. तसेच माफी मागीतली नाही.
यामुळे डॉ. गुट्टे यांनी दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर गंगाखेड यांच्या न्यायालयात धाव घेऊन डॉ. मधुसूदन केंद्रे यांच्याविरोधात ५० कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला. दरम्यान, न्यायालयाने प्रतिवादींना कारणे दाखवा नोटीसा आदेशीत केल्या आहेत. या प्रकरणी ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. राजेंद्र सराफ हे काम पाहत असून त्यांना अॅड. सुनील कांगणे, अॅड. मिलींद क्षीरसागर व अॅड. यादव हे काम पाहत आहेत. या प्रकरणाची सुनावणी २७ सप्टेंबर रोजी होणार असून न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहेत.

































































