दिल्ली, मुंबई उच्च न्यायालयात बॉम्बची धमकी, तपासानंतर अफवा असल्याचे उघड

देशात सार्वजनिक स्थळे असो अथवा महत्त्वाची ठिकाणे असोत, समाजकंटकांकडून प्रसिद्ध आणि वर्दळीच्या ठिकाणी बॉम्बस्पह्ट घडवून आणण्याच्या धमकीच्या प्रमाणात गेले काही दिवस वाढ झाली आहे. असे असतानाच न्यायालयांना टार्गेट करत दिल्ली व मुंबई हायकोर्ट बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ईमेल अज्ञातांकडून आज धाडण्यात आला. या धमकीनंतर दोन्ही न्यायालये तातडीने रिकामी करण्यात आली. तपास यंत्रणांनी शोधमोहीम हाती घेत संपूर्ण न्यायालय पिंजून काढले, मात्र ही अफवा असल्याचे अखेर उघड झाले.

नियमित कोर्टाचे कामकाज सुरू असतानाच दिल्ली आणि मुंबई उच्च न्यायालयाला बॉम्बस्पह्टाच्या धमक्यांचा ईमेल पाठवण्यात आला. या ईमेलमध्ये दुपारी दोन वाजेपर्यंत कोर्ट रिकामे करण्यास सांगण्यात आले होते. या ईमेलनंतर दुपारी 12.20 च्या सुमारास कोर्टाचे कामकाज तातडीने थांबवण्यात आले व संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली. कोर्टाबाहेर याचिकाकर्ते, वकील तसेच कर्मचाऱयांची प्रचंड गर्दी झाली होती. पोलीस आणि बॉम्बशोधक पथकाने श्वानांच्या सहाय्याने दोन तास संपूर्ण न्यायालय व परिसर पिंजून काढला; मात्र त्यांना हाती काहीच सापडले नाही. सखोल चौकशीअंती ही अफवा असल्याचे लक्षात आले त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात नियमित कामकाजास पुन्हा सुरुवात करण्यात आली, मात्र न्यायालयात सोडताना पोलिसांकडून प्रत्येकाची कसून तपासणी करण्यात येत होती.

सुनावणी स्थगित

कोर्टाचे नियमित कामकाज सुरू असतानाच धमकीचा ईमेल मिळाल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली. नेमके काय झाले याबाबत कोणाला काहीच कळत नव्हते. पोलीस यंत्रणा प्रत्येक कोर्ट रूम रिकामी करण्यासाठी धावपळ करत होते. त्यामुळे उपस्थितांमध्ये घबराट पसरली होती. या घटनेनंतर न्यायालयातील सुनावण्या तातडीने स्थगित करण्यात आल्या.

न्यायाधीशांचे चेंबर, कोर्ट रूम टार्गेट

या धमकीच्या ईमेलमध्ये न्यायाधीशांच्या चेंबर आणि कोर्टरूममध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याचा इशारा देण्यात आला होता. त्यात नमूद केले होते की, एक नमुना म्हणून दिल्ली उच्च न्यायालयात नमाजानंतर काही वेळातच न्यायाधीशांच्या चेंबरमध्ये स्फोट होतील, असे धमकीच्या ईमेलमध्ये नमूद करण्यात आले होते.

बार असोसिएशनची नोटीस

या धमकीच्या ईमेलनंतर बॉम्बे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. नौशाद इंजिनीअर यांनी मुंबई उच्च न्यायालयाची इमारत तातडीने रिकामी करण्याची नोटीस काढली. या नोटीसनंतर बार असोसिएशनच्या सदस्यांनी कोर्ट रूम रिकामी करत बाहेरचा रस्ता गाठला.