
आयपीएलचे अंतिम संघांचा फैसला लागलाय. आता गुणतालिकेतील पहिल्या दोन क्रमांकांसाठी चारही संघांची जबरदस्त रस्सीखेच सुरू झालीय. चारही संघांना अव्वल स्थान खुणावतेय. काहींना विजयासह ते स्थान मिळणार आहे, तर काहींचे स्थान दुसऱ्यांच्या जय-पराजयावर अवलंबून असेल. उद्या पंजाबला दिल्लीविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवून गुणतालिकेत पहिले किंवा दुसरे स्थान काबीज करणे शक्य आहे, तर दुसरीकडे मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर प्ले ऑफच्या आशा मावळल्याने दिल्लीचा संघ डोळ्यासमोर केवळ स्पर्धेचा शेवट गोड करण्याच्या ध्येयानेच मैदानात उतरणार आहे. मुंबईविरुद्धचा पराभव जिव्हारी लागल्याने घायाळ दिल्लीचा संघ पंजाबविरुद्ध तगडे आव्हान उभे करून त्यांच्या गुणतालिकेतील प्रथम क्रमांकावर विराजमान होण्याच्या स्वप्नावर पाणी फेरू शकतो.
सीमेवरील युद्धविरामानंतर सुरू झालेल्या आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये पंजाब, आरसीबी, मुंबई आणि गुजरात या चार संघांनी आपापले तिकीट पक्के केले आहे. आता चारही संघ गुणतालिकेत पहिले दोन स्थान मिळवण्यासाठी धडपडत आहेत. त्यामुळे चारही संघांना उर्वरीत सामन्यांमध्ये विजय मिळवणे अनिवार्य आहे. काल लखनौविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवून गुणतालिकेतील अव्वल स्थान पक्के करण्याची गुजरातला संधी होती, मात्र गुरुवारच्या पराभवनंतर गुजरातचे अव्वल स्थान धोक्यात आले आहे. हैदराबाद-बंगळुरू लढतीत बंगळुरू विजयानंतर अव्वल स्थानी पोहोचू शकतो. त्यामुळे उद्या पंजाबला त्याला मागेही टाकता येऊ शकते. मात्र दिल्लीने विजय मिळवला तर पंजाब तिसऱ्या स्थानावरच कायम राहील.
यंदाच्या आयपीएलमधील दिल्लीचे आव्हान मुंबईने संपुष्टात आणले आहे. उद्या दिल्लीचा पंजाबविरुद्धचा अखेरचा सामना आहे. त्यामुळे उद्याच्या सामन्यात विजय मिळवून स्पर्धेचा शेवट गोड करण्यासाठी दिल्ली मैदानात उतरेल, मात्र तुफान फॉर्मात असलेल्या पंजाबला नमवणे दिल्लीसाठी फार सोप्पे राहिलेले नाही. दिल्लीचा प्रमुख गोलंदाज मिचेल स्टार्क पुन्हा स्पर्धेत सहभागी झाला नसल्याने संघाला त्याचा जोरदार फटका बसला आहे. प्रियांश आर्या, प्रभसिमरन सिंग, श्रेयस अय्यर यांच्यावर पंजाबच्या फलंदाजीची मदार असेल, तर अर्शदीप सिंग, हरप्रीत ब्रार यांची गोलंदाजी दिल्लीच्या फलंदाजांपुढे तगडे आव्हान उभे करू शकते. त्यामुळे पंजाब विजय मिळवून दोन गुण मिळवत गुणतालिकेत नंबर वनची झेप घेतो की विजय मिळवून दिल्ली स्पर्धेचा शेवट गोड करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.