बळजबरीनं स्पर्श, घाणेरडे मेसेज अन्… स्वामी चैतन्यानंद सरस्वतींवर 17 विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याचा आरोप

राजधानी दिल्लीतील एका नामांकित आश्रमामध्ये 17 विद्यार्थिनींचा लैंगिक छळ झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वसंतु कुंज येथील ‘श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंट’चे माजी प्रमुख स्वामी चैतन्यानंद सरस्वती उर्फ ​​पार्थ सारथी यांच्यावर 17 विद्यार्थिनींनी लैंगिक छळ केल्याचा आरोप केला आहे. आरोपींनी बळजबरीने स्पर्श करत घाणेरडे मेसेच पाठवल्याचा आणि अश्लील भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी 4 ऑगस्ट 2025 रोजी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे.

कर्नाटकातील श्रुंगेरी येथील दक्षिणान्मय श्री शारदा पीठ ही दिल्लीतील संस्था चालवते. या संस्थेने एक परिपत्रक जारी करत स्वामी चैतन्यानंद सरस्वती यांना पदावरून काढून टाकण्यात आल्याची माहिती दिली. स्वामी चैत्यन्यानंद यांचे वर्तन आणि कृत्य हे बेकायदेशीर व पीठाच्या हिताविरुद्ध होते. त्यांचा आणि पीठाचा कोणताही संबंध नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

काय आहे प्रकरण?

स्वामी चैतन्यानंद सरस्वती हे ‘श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंट’चा माजी प्रमुख होते. ईडब्ल्यूएस शिष्यवृत्ती अंतर्गत संस्थेत पीजीडीएमचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींचा त्यांनी लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे. आरोपी विद्यार्थिनींच्या ग्रुपवर घाणेरडे मेसेज पाठवत होता. तसेच बळजबरीने स्पर्श करत त्यांच्याशी शारीरिक जवळीक साधण्याचाही प्रयत्न करत होता, असा आरोप करण्यात आला आहे.

4 ऑगस्ट 2025 रोजी श्री शृंगेरी मठाचे प्रशासक पी. ए. मुरली यांनी वसंत कुंज नॉर्थ पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर 9 ऑगस्ट रोजी स्वामी चैतन्यानंद यांना पदावरून काढण्यात आले. पोलिसांनी भादवि त्यांच्याविरुद्धकलम 75(2)/79/351(2) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सध्या ते फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी त्यांची व्होल्वो कार उत्तर प्रदेश येथून जप्त केली असून त्यावर संयुक्त राष्ट्रांची बनावट क्रमांकाची नंबर प्लेट (39 यूएन 1) आहे.