दिल्लीत सुरक्षा व्यवस्थेचे तीनतेरा, विधान भवनाचा दरवाजा तोडून घुसवली कार, विधानसभा अध्यक्षांच्या गाडीत ठेवला पुष्पगुच्छ आणि हार; तिघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीतील सुरक्षा व्यवस्थेचे कसे तीनतेरा वाजले आहेत, याची प्रचीती आज आली. विधान भवनाच्या परिसरात दुपारी सुरक्षा यंत्रणेला भेदून एक कार घुसवल्यामुळे मोठी खळबळ उडाली. ही कार चालवणाऱया मास्कधारी व्यक्तीने थेट विधानसभा अध्यक्ष विजेंद्र गुप्ता यांच्या कार्यालयाच्या दिशेने झेप घेतली. गुप्ता यांच्या शासकीय वाहनाच्या आत एक पुष्पगुच्छ आणि फुलांचा हार ठेवला आणि कारसह पळ काढला. पुष्पगुच्छामध्ये बॉम्बसारखी धोकादायक वस्तू आढळली नाही. पोलिसांनी शोधमोहीम राबवत या मास्कधारी चालकाला अटक केली असून कार ताब्यात घेण्यात आली आहे. याशिवाय आणखी दोघांनाही ताब्यात घेण्यात आले असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. आरोपींपैकी एकाची ओळख पटली असून सरबजीत असे त्याचे नाव आहे. तो उत्तर प्रदेशच्या पिलिभीत येथील रहिवाशी आहे.

सोमवारी दुपारी दिल्ली विधान भवनाच्या गेट क्रमांक 2चे लोखंडी प्रवेशद्वारातून टाटा सिएरा ही गाडी घेऊन एक जण विधान भवनाच्या परिसरात शिरला. अचानक घडलेल्या घटनेमुळे सुरक्षा यंत्रणा हादरून गेली. अतिशय वेगाने मास्कधारी चालकाने गाडी चालवत आत नेली आणि विधानसभा अध्यक्षांच्या वाहनात एक पुष्पगुच्छ आणि हार ठेवला. त्यानंतर तो तेवढय़ाच वेगाने तेथून गाडी घेऊन पसार झाला. अवघ्या पाच ते सात मिनिटांमध्ये हा संपूर्ण प्रकार घडला.

प्रवेशद्वार क्रमाक-2 हे व्हीआयपींसाठी राखून ठेवले आहे. अधिवेशन किंवा महत्त्वाच्या कार्यक्रमांवेळीच ते उघडले जाते. सुरक्षा यंत्रणांनी शोधमोहीम राबवून या चालकाला अटक केली असून टाटा सिएरा गाडी जप्त करण्यात आली आहे. या गाडीचा नोंदणी क्रमांक उत्तर प्रदेशचा आहे. आरोपीची ओळख उघड करण्यात आलेली नाही.

सुरक्षा व्यवस्थेचे तीनतेरा

या घटनेमुळे दिल्लीतील सुरक्षा व्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याचे उघड झाले आहे. एक वाहन लोखंडी प्रवेशद्वार तोडून विधान भवन परिसरात शिरते आणि सुरक्षा रक्षकांना कारवाई करताच आली नाही. पाच ते सात मिनिटांमध्ये आरोपीने तेथून पळ काढला. हे मुख्य प्रवेशद्वार नसल्यामुळे तसेच अधिवेशन सुरू नसल्यामुळे तेथे एकच जवान तैनात होता. हीच त्रुटी आरोपीने हेरली.