
सामना ऑनलाईन। नवी दिल्ली
कोटय़वधी हिंदूंचे श्रद्धास्थान रामलल्लाचा जन्म अयोध्येतच झाला. राम याच जागेत विराजमान आहे. यावरील लोकांचा अढळ विश्वास हाच याचा भक्कम पुरावा आहे, असा दावा ‘रामलल्ला विराजमान’च्या वतीने बुधवारी सर्वोच्च न्यायालयापुढे करण्यात आला. कित्येक शतकानंतर रामजन्माचा पुरावा कसा काय दाखवू शकतो, असा प्रश्नही ज्येष्ठ वकील के. प्रसारण यांनी केला.
अयोध्ये प्रकरणी मंगळवारपासून नियमित सुनावणी सुरू झाली. बुधवारी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे दुसऱया दिवशीची सुनावणी पूर्ण झाली. या वेळी ‘रामलल्ला’च्या वतीने ऍड. प्रसारण यांनी जोरदार युक्तिवाद केला. वाल्मिकींनी अयोध्येतच रामलल्लाचा जन्म झाल्याचा तीन ठिकाणी उल्लेख केला आहे, असेही त्यांनी सांगितले. सुनावणी दरम्यान न्यायमूर्तींनी विचारले की, ज्या प्रकारे रामलल्लाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आले आहे. त्याप्रमाणे दुसऱया कोणत्या देवाचे प्रकरण न्यायालयात आले आहे का? येशू ख्रिस्त यांचा बेथलेहेममध्ये जन्म झाल्यावरून कोणत्या न्यायालयात प्रश्न उपस्थित झाला का, अशी विचारणा केली होती.
पूजा आणि मालकी दोन्ही भिन्न गोष्टी
रामजन्मभूमीवर अधिकार सांगणाऱया निर्मोही आखाडय़ाचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड यांनी विचारणा केली की, आपण कोणत्या आधारावर रामजन्मभूमीवर आपला हक्क सांगत आहात. आपण अधिकाराशिवाय मंदिरात पूजा-अर्चा करू शकत नाही. पूजा करणे आणि मालकी हक्क बजावणे या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत, असे न्यायमूर्तींनी या वेळी स्पष्ट केले.
निर्मोही आखाडय़ाकडे कोर्टाने पुरावे मागितले
निर्मोही आखाडय़ाच्या वकिलांनी मंगळवारी 2.77 एकर जागा आमच्याच मालकीची आहे. या जागेवर नियंत्रण आणि व्यवस्थापनाची आम्हाला परवानगी दिली पाहिजे, असा युक्तिवाद केला. त्यावर आपल्याकडे या वादग्रस्त जागेवरील ताब्याचे तोंडी वा कागदोपत्री पुरावे, महसुली नोंद वगैरे काही पुरावे आहेत का, अशी विचारणा न्यायालयाने केली. त्यावर 1982मध्ये आखाडय़ावर एक दरोडा पडला. त्यात सर्व पुरावे चोरीला गेले, असे म्हणणे आखाडय़ाचे वकील सुशील जैन यांनी मांडले.




























































