
अयोध्येतील भव्य राममंदिर उभारणीचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाने मोकळा केल्यानंतर केंद्र सरकारने आता मंदिर उभारणीसाठी ट्रस्ट स्थापण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. न्यायालयाने तीन महिन्यांच्या आत ही ट्रस्ट स्थापण्याचा आदेश शनिवारी दिला होता. त्यालाच अनुसरून गृहमंत्रालयाने ट्रस्टच्या प्रक्रियेला गती दिली आहे.
अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीवर भव्य राममंदिर कशाप्रकारे उभारायचे याची आखणी ट्रस्टकडून केली जाणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर ट्रस्टच्या स्थापनेबाबत कायदे मंत्रालय आणि ऍटर्नी जनरल यांची कायदेविषयक मते जाणून घेतली जाणार आहेत. सध्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निकालाचा सखोल अभ्यास करण्याची जबाबदारी काही अधिकाऱयांच्या पथकावर सोपवण्यात आली आहे. जेणेकरून न्यायालयाला अपेक्षित असलेली मंदिर ट्रस्ट स्थापन केली जाऊ शकते. ट्रस्टवर गृह की सांस्कृतिक मंत्रालयाचे नियंत्रण राहणार याचा मात्र अजून उलगडा झालेला नाही.
अयोध्येप्रकरणी मी सुचवलेला पर्यायच योग्य ठरला
अयोध्येप्रकरणी मी 2003 पासून जो पर्याय सुचवत आलो तोच पर्याय योग्य ठरला. न्यायालयाने त्याच पर्यायावर आधारित निकाल दिला अशी प्रतिक्रिया आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे देशातील प्रत्येक नागरिकाने स्वागत केले म्हणूनच नागरिकांनी निकालाला शांततेत प्रतिसाद दिला असे ते म्हणाले.
























































