
दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ 10 नोव्हेंबरला झालेल्या कारमधील बॉम्बस्फोटाने संपूर्ण देश हादरला. या स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले असताना आता या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेला मोठं यश मिळाले आहे. दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणाशी संबंधित पश्चिम बंगालच्या उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील अल फलाह विद्यापीठातील पाचव्या डॉक्टरला एनआयएने अटक केली आहे. त्याचे पश्चिम बंगाल कनेक्शन समोर आले आहे, ज्यामुळे त्याची कसून चौकशी सुरू झाली आहे.
एजन्सीने फरीदाबादच्या अल फलाह विद्यापीठातून 2024 मध्ये एमबीबीएस पदवीधर झालेले डॉ. जानिशर आलम याला उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील दलखोला परिसरातून अटक केली आहे. या स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाला आणि 20 हून अधिक जण जखमी झाले. पश्चिम बंगाल कनेक्शन समोर आल्यामुळे तपासात प्रकरण आणखी गुंतागुंतीचे झाले आहे. एनआयएने दिल्ली पोलिसांसोबत शुक्रवारी जानीशरला डालखोलाच्या सूर्यपुर बाजारातून ताब्यात घेतले आहे. तो 12 नोव्हेंबरला आपल्या लग्नासाठी पैतृक गाव कोनाल येथे आला होता. चौकशीसाठी त्याला सिलिगुडी येथे नेण्यात आले. जानीशर आणि त्याचा पिता तौहीद आलम लुधियानामध्ये राहतात. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एनआए अधिकाऱ्यांनी आधी लुधियानात तौहीदशी संपर्क केला आणि त्याच्या मुलाच्या लोकेशनची माहिती मिळवली. त्यानंतर डालखोला पोहोचून अटक केली.
जानिशरचा इतक्या गंभीर प्रकरणात सहभागाबद्दल गावकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले. अल फलाह विद्यापीठातून अटक झालेला हा पाचवा डॉक्टर आहे. यापूर्वी, एनआयएने स्फोटात सहभागी असल्याच्या आरोपाखाली त्याच विद्यापीठातील चार डॉक्टरांना अटक केली होती. वैद्यकीय शिक्षण नियामक असलेल्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (एनएमसी) महिला डॉक्टर शाहीन शाहिदसह चार आरोपी डॉक्टरांची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. दहशतवादाशी संबंधित प्रकरणांमध्ये डॉक्टरांचा सहभाग लक्षात घेता हे पाऊल उचलण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. एनआयए पश्चिम बंगालसह इतर राज्यांमध्येही या प्रकरणाचा तपास करत आहे आणि संभाव्य संबंधांचा शोध घेत आहे.
























































