मेट्रो स्टेशनच्या पुलावरून उडी मारली! शिक्षकांच्या छळाला कंटाळून दिल्लीत विद्यार्थ्याने जीवन संपवले

राजधानी दिल्लीत हादरवून टाकणारी घटना घडली आहे. दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने शिक्षकांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे. मेट्रो स्टेशनच्या पुलावरून उडी मारून त्याने स्वतःला संपवले. या घटनेनंतर पालकांमध्ये भीतीचे वातावरण असून हजारोंच्या संख्येने लोक आज रस्त्यावर उतरले.

शौर्य पाटील (16) असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो सेंट कोलंबस शाळेत शिकत होता. शाळा सुटल्यानंतर शौर्य थेट राजेंद्र प्लेस मेट्रो स्टेशनवर गेला आणि दप्तरासह तिथल्या पुलावरून उडी घेतली. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. शौर्यच्या बॅगेत पोलिसांना हाताने लिहून ठेवलेली चिठ्ठी सापडली. शाळेतील छळाला कंटाळून हे पाऊल उचलत असल्याचे त्याने त्यात लिहिले असून त्यात तीन शिक्षकांची नावे लिहिल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिक्षकांबद्दल मी काय बोलू? माझ्यासारखी वेळ दुसऱ्या कुणावर येऊ नये. त्यासाठी मला त्रास देणाऱ्या शिक्षकांवर कारवाई व्हायला हवी. ही माझी शेवटची इच्छा आहे.

घटनेच्या दिवशी काय झाले?

वर्षभरापासून शाळेतील शिक्षक शौर्यला त्रास देत होते. सर्वांसमोर त्याचा अपमान करत होते, त्याची खिल्ली उडवत होते. त्याचे वडील प्रदीप पाटील यांनी शाळेत याबाबत तक्रारही केली होती. त्यानंतर हा त्रास जास्तच वाढला. मंगळवारी शाळेत त्याचा नृत्याचा सराव होता. सराव करता करता तो पडला. त्यावेळी त्याला सावरण्याऐवजी शिक्षकांनी दम भरला. कितीही रड, आम्हाला फरक पडत नाही, असे एक शिक्षक म्हणाला. त्यामुळे तो प्रचंड निराश झाला आणि त्याने स्वतःला संपवले.

माझे अवयव दान करा!

सर्वांनी माझ्यासाठी खूप केलं, पण मी त्यांना काही देऊ शकलो नाही. मी तुम्हाला बऱ्याचदा दुखावलं, आता शेवटचं दुःख देतोय, असे त्याने चिठ्ठीत म्हटले आहे. माझ्या शरीरातील काही अवयव चांगल्या स्थितीत असतील तर ते एखाद्या गरजू व्यक्तीला दान करा, अशी विनंती त्याने चिठ्ठीत केली आहे.