
नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करण्यासाठी दिल्ली, नोएडा आणि गुडगाव येथे गुरुवारी मोठय़ा प्रमाणात आंदोलने झाली. हजारो लोक रस्त्यावर उतरल्याने वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा वाजले. त्यामुळे दिल्ली- एनआरसी आणि दिल्ली- गुडगाव मार्गावर न भूतो न भविष्यति अशी वाहतूककोंडी झाली. सकाळपासून हजारो वाहनचालक तीन ते चार तास वाहनांमध्ये अडकून पडले. त्यामुळे दिल्ली अक्षरशः ठप्प झाली.
दिल्ली- गुडगाव रोडवर तीन ते चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. महामाया उड्डाणपूल आणि गुडगावच्या सरहौल टोल नाक्यावरही वाहनांच्या रांगाच रांगा लागल्याने मोठी कोंडी झाली. दिल्ली वाहतूक पोलिसांनी ट्विट करून वाहतूक कोंडीची माहिती नागरिकांना दिली. गुडगाववरून दिल्लीला येणाऱया वाहनांची तपासणी सुरू असून त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले. दिल्ली गेट ते जीपीओ, सुभाष मार्ग, पीली कोठी, श्यामा प्रसाद मुखर्जी मार्ग, लाल किल्ला आणि जुनी दिल्ली रेल्वे स्टेशन मार्ग विस्कळीत झाले. ऍम्ब्युलन्सही अकडून पडल्या.
मेट्रो स्थानके बंद, विमान उड्डाणे रद्द
पोलिसांच्या आदेशाने दिल्ली मेट्रोने गुरुवारी सकाळी 19 मेट्रो स्थानकांची प्रवेशद्वारे बंद केली होती. विशेष म्हणजे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8 वर वाहतूककोंडी झाल्यामुळे 16 विमानांची उड्डाणे विलंबाने झाली. इंडिगो कंपनीने 19 फ्लाईट्स रद्द केल्या. क्रू मेंबर्स शहरातील वाहतूककोंडीमध्ये अडकल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर विस्तारा एयरलाइन्सने प्रवाशांना दिलासा देणारा निर्णय घेतला. विस्तारा एयरलाइन्सने वाहतूककोंडीमुळे ज्यांचे विमान चुकले त्यांना पुढच्या विमानात बसायची मुभा दिली. कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता आणि तिकीट रद्दचे कोणतेही शुल्क न कापता ही सोय करण्यात येत असल्याचे विस्ताराने जाहीर केले.
मोबाईल, इंटरनेट बंद
राजधानी दिल्लीत कलम 144 लागू करण्यात आले आहे. तर काही ठिकाणी मोबाईल इंटरनेट, एसएमएस आणि व्हॉइस कॉल सेवाही बंद करण्यात आली आहे. भारती एअरटेल कंपनीची मोबाईल नेटवर्क सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. राजधानीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
12 राज्यांत भडका उडाला
सुधारित नागरिकत्व कायदा विधेयक संसदेत मंजूर झाल्यापासून देशाच्या अनेक भागांत तणाव वाढत आहे. ईशान्य भागातील सुरू झालेल्या आंदोलनाचा भडका रविवारी दिल्लीत जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात उडाला. पोलिसांनी विद्यापीठाच्या लायब्ररीत घुसून विद्यार्थ्यांवर लाठीहल्ला केला आणि देशभरात संतापाची लाट उसळली. आता हे लोण किमान 12 राज्यांत पसरले आहे.
संयुक्त राष्ट्राच्या देखरेखीत जनमताचा कौल घ्या
केंद्रातील सत्ताधारी भाजपमध्ये हिंमत असेल तर संयुक्त राष्ट्र संघ आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगासारख्या निष्पक्ष संस्थांच्या देखरेखीत नागरिकत्व कायदा आणि ‘एनआरसी’बाबत जनमताचा कौल घ्यावा. या कायद्याच्या बाजूने किती आणि विरोधात किती लोक आहेत हे जाणून घ्या, असे आवाहन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले आहे.
जामियाच्या जखमी विद्यार्थ्याला 5 लाखांसह नोकरी ‘आप’च्या आमदाराची घोषणा
नागरिकता दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात आंदोलन करताना डोळ्याला इजा झालेल्या जामियाच्या विद्यार्थ्याला आम आदमी पार्टीचे आमदार अमानतुल्लाह खान यांनी गुरुवारी 5 लाख रुपये मदत जाहीर केली. याशिवाय त्याला दिल्ली वक्फ बोर्डात नोकरीही देण्यात येणार आहे. अमानतुल्लाह हे ओखला येथील आमदार आहेत आणि दिल्ली वक्फ बोर्डाचे अध्यक्षही आहेत. जामियामधील एलएलएमचा विद्यार्थी मिन्हाजुद्दीन याची अमानतुल्लाह यांनी गुरुवारी भेट घेऊन त्याला मदतनिधी आणि नियुक्तीपत्र प्रदान केले. रविवारी 15 डिसेंबर रोजी पोलिसांनी केलेल्या जबर लाठीमाऱयात मिन्हाजुद्दीन या विद्यार्थ्याच्या डोळ्याला जबर मार लागला. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

























































