दिल्लीचे CM केजरीवाल यांच्या घराबाहेर आंदोलन, ‘आप’चा भाजपवर तोडफोडीचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bjp-arvind-kejriwal

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानावर आज जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेरील सुरक्षा कठडे आणि सीसीटीव्ही कॅमेरे तोडण्यात आले आहेत. भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला करून तोडफोड केल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी ट्विट करून लिहिले की, ‘दिल्लीतील मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला करून असामाजिक तत्वांनी सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षा अडथळे तोडले आहेत. गेटवरील बूम बॅरिअरही तुटला आहे.’

दुसरीकडे, आप नेते संजय सिंह यांनी ट्विट केले की, ‘लोकप्रिय मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानावर भाजपच्या गुंडांनी हल्ला केला आणि त्यांना रोखण्याऐवजी दिल्ली पोलीस त्यांच्या पाठीशी उभे असल्याचे दिसत आहे. भाजपवाले लक्षात ठेवा, सर्वांचा हिशोब घेतला जाईल, ही लोकशाही आहे, इथे वेळ आल्यावर लोक तुम्हाला मतांच्या लाठ्या मारतील.’

अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात आज भाजप कार्यकर्त्यांनी निदर्शने केली आहेत. कश्मिरी फाईल्स चित्रपटाच्या मुद्द्यावरून पंडितांच्या हत्याकांडाची खिल्ली उडवल्याप्रकरणी हे प्रदर्शन करण्यात आले. मात्र या निदर्शनानंतर तोडफोडीची घटना समोर आली आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी जवळपास 70 जणांना ताब्यात घेतले आहे.