दिल्ली डायरी – विधानसभा पोटनिवडणुकांचे वारे आणि दिशा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नीलेश कुलकर्णी

गुजरात व हिमाचल प्रदेश या दोन्ही राज्यांत महत्त्वाची लढाई लढत असलेल्या काँग्रेससाठी सहा राज्यांत गेल्या आठवडय़ात झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीचे निकाल चिंतन करायला लावणारे आहेत. एकीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी ‘भारत जोडो’ यात्रेद्वारे काँग्रेसची पाळेमुळे मजबूत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र राज्याराज्यांतील काँग्रेसचे मनसबदार त्यांच्या मेहनतीवर पाणी ओतताना दिसत आहेत. काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाचे मताधिक्य झपाटय़ाने का कमी होते आहे? पोटनिवडणुकीच्या निर्णयाचा परिणाम सार्वत्रिक होत नसला तरी अलीकडेच झालेल्या सात विधानसभा पोटनिवडणुकांचे वारे कोणती दिशा दाखवतात हे भविष्यात कळेल.

ज्या तेलंगणातून राहुल गांधींची ‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रात आली. त्या तेलंगणातील मुनगोडे विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा दारुण पराभव झाला. 2018 मध्ये काँग्रेस उमेदवार राजगोपाल रेड्डी हे तब्बल 37 हजार मतांनी विजयी झाले होते. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून पोटनिवडणूक लढवली. त्यात टीआरएसच्या प्रभाकर रेड्डी यांनी मोठा विजय मिळवला. काँग्रेस उमेदवार तिसऱ्या स्थानावर फेकला गेला. ओडिशाच्या धामनगर मतदारसंघात भाजपचे सूर्यबंशी सूरज जिंकले. काँग्रेस उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाले. काँगेस उमेदवाराला अपक्ष उमेदवारापेक्षाही कमी, चौथ्या क्रमांकाची मते मिळाली. हरयाणातील ‘हाय व्होल्टेज’ लढाईत माजी मुख्यमंत्री भजनलाल यांचे दलबदलू चिरंजीव कुलदीप बिष्णोई यांनीच बाजी मारली. बिष्णोई यांच्या विरोधात काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुड्डा संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरले होते. भाजपमधले माजी केंद्रीय मंत्री वीरेंद्रसिंग व त्यांचे खासदार चिरंजीवदेखील बिष्णोईंच्या विरोधात होते. शिवाय उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटालाही बिष्णोईंना हरवण्यासाठी देव पाण्यात घालून बसले होते. तरीही बिष्णोई जिंकले. भजनलाल यांच्या कुटुंबाचा बालेकिल्ला ही जमेची बाजू असली तर जाट विरुद्ध बिगर जाट हा काँग्रेसने या निवडणुकीला दिलेला रंग काँग्रेसच्या नेत्यांवरच उलटला. काँग्रेसने झाडून सगळे आमदार आणि माजी आमदार या निवडणुकीसाठी कामाला लावले होते, मात्र तरीही एकटय़ा बिष्णोईंपुढे त्यांची डाळ शिजली नाही. प्रदेश पातळीवरील नेत्यांमध्ये असलेले मतभेद, नियोजनाचा अभाव आणि विस्कळीतपणा यामुळे काँग्रेसची ही
अवस्था झाली.

काँग्रेसचे पक्षाध्यक्षपद स्वीकारल्यानंतर मल्लिकार्जुन खरगे यांना काँग्रेस नेते विजयाची काही तरी भेट देतील अशी अपेक्षा होती, मात्र ती फोल ठरली. बिहारमधील गोपालगंजची जागा भाजपने जिंकली तर दुसरी राष्ट्रीय जनता दलाच्या पारडय़ात पडली. पोटनिवडणुकांना स्थानिक राजकारणाचे संदर्भ असतात हे मान्य केले तरी त्यामुळे काँग्रेससारख्या जुन्या राष्ट्रीय पक्षासाठी असे चित्र निर्माण होने योग्य नाही.

‘ऍण्टी इन्कम्बन्सी’चे काय?

गुजरात व हिमाचलच्या निवडणुकीत भाजपला राजकीय प्रतिस्पर्ध्यापेक्षाही ‘ऍण्टी इन्कम्बन्सी’ची अधिक धास्ती वाटू लागली आहे. गुजरातमध्ये तर तब्बल 27 वर्षांची ‘ऍण्टी इन्कबन्सी’ आहे. त्यामुळेच गुजरातची पहिली 160 उमेदवारांची यादी जाहीर करताना भाजप नेतृत्वाने तब्बल 38 विद्यमान आमदारांना उमेदवारी नाकारली आहे. विजय रुपाणी, नितीन पटेल वगैरे माजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी आम्ही ‘स्वइच्छेने निवडणूक लढविणार नाही,’ असा पत्राचार पक्षनेतृत्वाशी केला आहे. विद्यमान मुख्यमंत्री भूपेश पटेल आपली उमेदवारी वाचविण्यात यशस्वी ठरले आहेत. ‘राजकारणात कोणी कोणाचा मित्र किंवा शत्रू असत नाही, तर कायमचे असतात ते फक्त आणि फक्त हितसंबंध’ याचा दाखला देत भाजपने एकेकाळी भाजपविरोधात पाटीदार आरक्षणाचे रण पेटवलेल्या हार्दिक पटेल यांना विरमगाम तर क्रिकेटपटू रवींद्र जडेजा यांच्या सुविद्य पत्नी रिवाबा जडेजा यांना जामनगर उत्तरमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. भाजपने ‘ऍण्टी इन्कम्बन्सी’चा धोका म्हणून अनेक मातब्बरांना घरी बसवले असले तरी काँग्रेसमधून भाजपमध्ये ऐनवेळी उडी मारणाऱ्यांचा मात्र यथायोग्य पाहुणचार करीत उमेदवारी जाहीर केली आहे. गुजरातच्या प्रत्येक जागेवर मोदी-शहा जोडीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे स्वाभाविकच उमेदवारांची निवड करताना ताक फुंकून पिण्याची वेळ भाजपवर आली आहे. ‘इलेक्टिव्ह मेरिट’ हाच एकमेव निकष यामागे दिसतो आहे.

‘आप’चा दुटप्पीपणा

2014 पासून प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य धोक्यात आले. माध्यमांचे महत्त्व संपविण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी टीका सर्रास ऐकायला येत असताना एरव्ही माध्यमांच्या गळचेपीच्या नावाने गळा काढण्यात अग्रेसर असलेल्या आम आदमी पार्टीनेही सत्ताधाऱ्यांचाच कित्ता गिरविल्याने आपचा ढोंगी आणि दुटप्पीपणा उघड झाला आहे. दिल्ली सरकारच्या मद्य धोरणाविरोधात आणि हवाला घोटाळय़ावर जोरदार बातम्या चालविणाऱ्या दोन माध्यम समूहांच्या फोटोग्राफरला ‘आप’च्या संयोजकांनी अपमानास्पद वागणूक दिली. झाले असे की, दिल्लीत वाढत असलेल्या प्रदूषणासंदर्भात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व पंजाबचे मुख्यमंत्री भगवंतसिंग मान यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेसाठी दोन नामांकित माध्यम समूहांचे कॅमेरामन पत्रकार परिषदेच्या ठिकाणी येत असतानाच सुरक्षा रक्षकांनी त्यांच्याशी हुज्जत घालून त्यांचा प्रवेश रोखला. या दोन्ही माध्यम समूहांनी हवाला घोटाळा आणि मद्य धोरणाविरोधात बातम्या छापल्या होत्या. त्याचा राग आणि रोष या फोटोग्राफरांवर निघाला. ‘आमचे काम फोटो काढणे आहे. आम्ही पोटार्थी कर्मचारी आहोत. कोणते फोटो छापायचे कोणते नाहीत याचा निर्णय संपादकीय मंडळ करते. त्यामुळे आम्हाला आत सोडा,’ असे आर्जव हे फोटोग्राफर करत होते, मात्र त्यांना शेवटपर्यंत आतमध्ये सोडण्यात आले नाही. नरेंद्र मोदी आणि भाजपवर हुकूमशाहीचा आरोप करणाऱ्या अरविंद केजरीवाल यांना तो नैतिक अधिकार आहे काय, असा सवाल यानिमित्ताने निर्माण झाला आहे. राजकारणात खायचे आणि दाखवायचे दात हे वेगवेगळे असतात हेच खरे.

[email protected]