
>> नीलेश कुलकर्णी n [email protected]
काँग्रेसमधील ‘चाणक्य’ अहमद पटेल यांच्या निधनामुळे राष्ट्रीय राजकारणात काँग्रेसची हानी झालेली असतानाच काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोईंच्या निधनामुळे तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे काय होणार? हा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. केंद्र सरकारच्या नागरिकता संशोधन विधेयकाने अशांत झालेल्या आसाममध्ये गोगोई यांच्या नेतृत्वात काँग्रेसला संधी निर्माण झाली होती. दुर्दैवाने त्यांच्या इतका मोठा नेता आसाम काँग्रेसमध्ये नाही. त्यामुळे आसाममध्ये तरुण गोगोई यांचा वारस कोण, या प्रश्नाचे उत्तर आधी काँग्रेस पक्षाला शोधावे लागणार आहे.
आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाला ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दुर्दैवी धक्का बसला आहे. सलग पंधरा वर्षे मुख्यमंत्री राहिलेले तरुण गोगोई एका अर्थाने आसामी राजकारणातले ‘भीष्माचार्य’ होते. त्यांच्या इतक्या उंचीचा नेता आसाममध्ये झाला नाही. बांगलादेशी घुसखोर, बोडोलॅण्डची चळवळ, बद्रुद्दीन अजमलसारख्या नेत्याला हाताळण्याची कसरत करून त्यांनी नेहमीच धगधगत असलेला आसाम शांत ठेवण्यात यश मिळवले होते. आसाममध्ये सत्तांतर होऊन भाजपच्या सर्वानंद सोनोवाल यांचे सरकार स्थानापन्न झाले. या सरकारनेही जनतेत ‘गुडविल’ निर्माण केले होते. मात्र, मोदी सरकारच्या नागरिकता संशोधन विधेयकाने शांत असलेल्या आसाममध्ये संघर्षाची नवी ठिणगी टाकली आहे. आसाममध्ये या कायद्याला टोकाचा विरोध होत आहे, अशा स्थितीत विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे पारडे जड वाटत असतानाच तरुण गोगोईंच्या निधनामुळे हे पारडे उलटे फिरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तरुण गोगोईंसारख्या नेत्यानंतर आता कोणाच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवायच्या, हा यक्षप्रश्न काँग्रेस नेतृत्वापुढे उभा आहे.
बिहारची निवडणूक संपल्यानंतर भाजप लगेच पश्चिम बंगाल व आसामच्या विधानसभा निवडणूक तयारीला लागला आहे. आसामपुरता विचार केला तर काँग्रेसची संपूर्ण भिस्त तरुण गोगोईंवर होती. मात्र सहा महिन्यांपासून गोगोई गंभीर आजारी होते. त्यातच त्यांचे देहावसान झाल्यानंतर तरी आता काँग्रेसने जागे होण्याची गरज आहे. रुग्णालयात असतानादेखील तरुण गोगोईंनी नागरिकता संशोधन विधेयकाविरोधात उभ्या राहिलेल्या वेगवेगळय़ा आंदोलकांना एकत्रित करून काँग्रेसशी जोडण्याचा प्रयत्न केला होता. एआययूडीएफच्या बद्रुद्दीन अजमल यांच्याशी आघाडीच्या वाटाघाटी सुरू होत्या. अजमल यांच्याशी आघाडी न झाल्यास मुस्लिम मतांची मोठी फाटाफूट होऊन त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो याचा धोरणी हिशेब गोगोईंकडे होता. सत्तारूढ भाजपप्रणीत आघाडीतील बोडोलॅण्ड पीपल्स फ्रंटमध्ये मतभेद उफाळून आले. त्याचाही अचूक फायदा गोगोई उचलत होते. दुर्दैवाने त्यांचे निधन झाल्यानंतर आता काँगेसचे कोण नेतृत्व करणार हा मोठा प्रश्न आहे. गोगोईंचे चिरंजीव या पुण्याईवर खासदार गौरव गोगोई यांना ‘प्रोजेक्ट’ केले जात असले तरी पुण्यात शिकलेल्या गौरव यांना आसामपेक्षा राष्ट्रीय राजकारणात अधिक रस आहे. संर्प्णू आसामात त्यांचे नेतृत्व स्वीकारले जाईल अशी परिस्थिती नाही. त्यामुळे काँग्रेसने आसामबाबतीत तातडीने पावले टाकणे गरजेचे आहे. गोगोईंच्या जाण्याने अवघड वाटणारी विधानसभा निवडणूक भाजपसाठी सोपी बनली आहे. मुख्यमंत्री सोनोवाल व तिथले पॉवरफूल मंत्री हेमंत बिस्वा सरमा यांच्यात मतभेद असले तरी भाजपची एक पक्ष म्हणून चांगली तयारी आहे. बिहारच्या पार्श्वभूमीवर आसामात कामगिरी उंचावून दाखविण्याचे आव्हान काँग्रेसपुढे आहे. तरुण गोगोईंसारख्या मोठय़ा नेत्याच्या जाण्याने आसाममध्ये काँग्रेसपुढील आव्हान अधिकच गहिरे झाले आहे.
नितीशबाबूंचे ‘चूकभूल देणे घेणे…!’
जनतेने साफ नाकारलेले असताना केवळ राजकीय अपघाताने नितीशकुमार बिहारचे मुख्यमंत्री बनले आहेत. मात्र भाजपच्या ‘रिमोट’वर चालणारी त्यांची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची ही ‘संगीत खुर्ची’ ठरू शकते याची झलक नितीशबाबू मुख्यमंत्री झाल्याझाल्याच पाहायला मिळाली आहे. मेवालाल चौधरी नावाच्या एका मंत्रीमहोदयांना मंत्रीपदाच्या स्वाक्षरीची शाई वाळत नाही तोच राजीनाम्यावर सही करावी लागली होती. नितीशबाबूंना हा नमनालाच घडाभर तेल घातल्यासारखा प्रकार असला तरी नमनाला खरे घडाभर तेल दस्तरखुद्द नितीशबाबूंनीच घातले होते. त्याची रंजक माहिती आता समोर आली आहे. तब्बल सातवेळा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे नितीशबाबू यावेळच्या शपथविधीवेळी पुरते गांगरून गेले होते. त्यांची बॉडी लँग्वेजही बरेच काही सांगत होती. बळजबरीने मारून मुटपून मुख्यमंत्री केल्यासारखी त्यांची देहबोली होती. साहजिकच नितीशबाबूंच्या शपथग्रहण सोहळय़ाचा रंग फिका होता. कोणताही जोश, उत्साह नव्हता. त्यात शपथ घेताना नितीशबाबूंनी मोठीच चूक केली. राज्यपाल फागू चौहान यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली खरी, मात्र नितीशबाबूंनी केवळ मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि गोपनीयतेची शपथ घ्यायचीच ते चक्क विसरून गेले. शपथेच्या दोन कागदांपैकी केवळ एकच आपण वाचला आहे हे लक्षात आल्यानंतर स्वाक्षरी करण्यापूर्वी राज्यपालांनी ही तांत्रिक चूक लक्षात आणून दिल्यानंतर नितीशबाबूंनी पुन्हा रीतसर शपथ घेतली. सहावेळा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या माणसाकडून अशी चूक होणे हे न समजण्यापलीकडे आहे. मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसण्यापूर्वीच नितीशबाबू दबावात आहेत. हा कसला दबाव आहे हे यथावकाश कळेलच.
दरभंगा, महानगरी… मजूर ते मंत्री…
राजकारणात कधी कोणाचे नशीब फळफळेल हे सांगता येत नाही. अनिश्चिततेचा हा खेळ असतो. राजकारणात जसा रावाचा रंक व्हायला वेळ लागत नाही, तसाच रंकाचा राव व्हायलादेखील वेळ लागत नाही. अशी अनेक उदाहरणे आपण सभोवताली पाहत असतो. मात्र बिहारचे नवे मंत्री मुकेश सहानी यांची स्टोरी थोडी हटके आहे. बिहारमधून पोटापाण्यासाठी होणारे स्थलांतर हे काही नवे नाही. विकास आणि सुशासन केवळ कागदावरच असल्याने आजही अनेक बिहारी तरुण मिळेल त्या गाडीने मुंबई, दिल्ली गाठतात आणि पोटाची खळगी भरतात. अशीच पोटाची खळगी भरण्यासाठी मुकेश सहानी नावाचा एक बेरोजगार तरुण दरभंगा स्टेशनवरून पवन एक्स्प्रेस पकडून महानगरी मुंबईत आला. तिथे मजुरी करीत असताना मुंबानगरीच्या फिल्मी दुनियेचे आकर्षण त्याला वाटू लागले. नितीन देसाई यांनी ‘देवदास’ सिनेमाचा सेट तयार करण्याचे काम सहानी यांना दिले. त्यानंतर त्यांनी मागे वळून बघितले नाही. मुंबईत पैसा आणि प्रसिद्धी मिळवल्यानंतर सहानी यांनी 2018 मध्ये ‘विकसनशील इन्सा पार्टी’ नावाचा पक्षच स्थापन केला. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपने या पक्षासाठी 11 जागा सोडल्या. त्यापैकी चार जागा सहानींच्या पक्षाने जिंकल्या. स्वतः सहानी यांना निसटता पराभव स्वीकारावा लागला असला तरी नितीशकुमारांच्या मंत्रिमंडळात त्यांचा समावेश झाला. पोटापाण्यासाठी बिहारचा एक मुलगा मुंबईत सेल्समनची नोकरी पत्करतो, फिल्मी दुनियेत हातपाय मारतो, परत बिहारात जाऊन स्वतःचा राजकीय पक्ष काढतो आणि मंत्रीही होतो ही कहाणी कोणत्याही फिल्मी कहानीपेक्षा वेगळी नाही. त्यामुळेच मुकेश सहानी सध्या बिहारच्या राजकारणातले ‘सेलिब्रिटी’ बनले आहेत!




























































