दिल्ली डायरी : मायावती ‘मुलायम’ झाल्या, पुढे काय?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नीलेश कुलकर्णी, [email protected]

चोवीस वर्षांत एकमेकांची तोंडही न पाहणारे समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंग यादव आणि बसपाच्या सर्वेसर्वा मायावती हे नेते सध्या एकवटले आहेत. काही दशकांपूर्वी ‘मिले मुलायम-कांशीराम, हवा उड गये जय श्रीराम’ अशा घोषणा देत राममंदिर निर्माणाचा मार्ग रोखण्याचे पाप मुलायमसिंग यांनी बसपाचे दिवंगत अध्यक्ष कांशीराम यांना हाताशी धरून केले होते. हे महागठबंधन फार टिकले नव्हते. नंतर ‘राजकीय दुश्मनी’ हा नवा प्रकार मुलायम-मायावतींनी राजकारणात आणला. मात्र गेली 24 वर्षें ‘छत्तीसचा आकडा’ असलेली ही मंडळी केवळ नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होऊ नये या उद्देशाने एकत्र आली आहेत. मायावती सध्या समाजवादी पक्षाबाबत ‘मुलायम’ झाल्या असल्या तरी या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आणि जनता या महागठबंधनच्या बाबतीत कितपत ‘मुलायम’ ठरेल याबाबत साशंकताच आहे.

समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पक्ष यांचे सध्या लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशात ‘तुझ्या गळा, माझ्या गळा…’ असे सुरू आहे. या आघाडीची सुरुवात मुलायमसिंग यांचे धोरणी चिरंजीव अखिलेश यांनी मायावतींना ‘बुआजी’ म्हणत केली होती. ‘धर्मनिरपेक्ष’ मतांची फाटाफूट अशीच होत राहिल्यास आपले पक्ष केवळ कागदावर उरतील हे अखिलेश यांनी 2014च्या निवडणुकीनंतर ताडले होते. त्यातूनच कोणतीही विचारधारा, धोरण जुळत नसताना मुलायम आणि मायावती एकत्र आले आणि विशेष म्हणजे एकमेकांना पाण्यात पाहणारे हे दोघे सध्या एकमेकांचे गोडवे गाताना थकत नाहीत. या सर्व गलिच्छ राजकारणात मायावतींना ब्रह्मदत्त द्विवेदी यांचा विसर पडला. त्यांनाच वाचविण्यासाठी भाजपच्या ब्रह्मदत्त द्विवेदी यांनी चोवीस वर्षांपूर्वी छातीचा कोट करून समाजवादी कार्यकर्त्याचा हल्ला छातीवर झेलला आणि मरण पत्करले त्यांच्या आत्म्याला काय वाटत असेल?

कन्नौजमधील सभेत बोलताना मुलायमसिंग यांच्या साक्षीने मायावतींनी डिंपल यादव या आपल्या सूनबाई आहेत आणि त्यांना विजयी करण्याचे आवाहन केले. त्याच वेळी डिंपल यांनी चरणस्पर्श करून मायावतींचे आशीर्वाद वगैरे घेतले. यानिमित्ताने उत्तर प्रदेशच्या राजकारणातील एक वर्तुळ पूर्ण झाले. कालपरवापर्यंत एकमेकांची तोंडेही न पाहणारे मुलायम-मायावती आता देशाला स्थिर सरकार लाभू नये आणि खिचडी शिजलीच तर आपली पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा तडीस न्यावी या उद्देशाने डावपेच टाकत आहेत. सर्वाधिक खासदार देणारे राज्य म्हणून उत्तर प्रदेशचे राष्ट्रीय राजकारणात एक वेगळेच महत्त्व आहे. या राज्यातून किमान पन्नासेक खासदार एकत्रितपणे निवडून आणले तर पंतप्रधानपदाचा बाजार मांडता येईल किंवा सत्तेची सूत्रे हवी तशी आपल्या बाजूने फिरवता येतील अशा स्वप्नरंजनात सध्या मुलायम-मायावती ही जोडी आहे. गमतीचा भाग म्हणजे पंतप्रधानपदाचे ‘बाशिंग’ बांधून हे दोघेही आतापासूनच तयारीला लागले आहेत. तेव्हा निकालानंतर सत्तेसाठी हे दोघे दगलबाजी करणार नाहीत याचा भरवसा तो काय? अर्थात जाहीर सभांमधून ‘सूनबाई, आत्याबाई’ म्हणत एकमेकांवर कितीही स्तुतिसुमने उधळली तरी कार्यकर्त्यांच्या व जनतेच्या कितपत पचनी पडणार? हा प्रश्न आहेच. एकमेकांशी लढण्यात ज्या पक्षांतील काही पिढय़ा बरबाद झाल्या त्या कार्यकर्त्यांना आता ‘तुझ्या गळा माझ्या गळा करा’, असे सांगणे म्हणजे कार्यकर्ता व विचारधारेशीही प्रतारणाच आहे.

राहुल गांधींचा ‘विक्रम’
गुजरात विधानसभा निवडणुकीवेळी ‘सौम्य हिंदुत्वा’चा पंचा खांद्यावर टाकून व नंतरच्या काळात ‘कौल दत्तात्रेय’ गोत्राचा उच्चार करून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आश्वासक राजकारणास सुरुवात केली होती खरी, मात्र आता राहुल यांची गाडी पुन्हा ‘ट्रक’वरून खाली उतरताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रत्येक जाहीर सभेत राहुल हे पंतप्रधान मोदींवर शेलक्या भाषेत टीका करत आहेत. विरोधी पक्षाचे नेते म्हणून त्यांना टीका करण्याचा अधिकार जरूर आहे, मात्र जोशात ते भलतेसलते आरोप करत असल्याने त्यांच्या विरोधात भाजपकडून मोठय़ा प्रमाणात गुन्हे दाखल केले जात आहेत. ‘चौकीदार चोर हैं’ ही राहुल यांनी दिलेली घोषणा खरे तर भलतीच लोकप्रिय ठरली होती. किंबहुना ती ‘कॅचलाइन’ बनली होती, मात्र त्याच्या अवाजवी व नको तिथे केलेल्या वापरामुळे न्यायालयापुढे राहुल यांना दिलगिरी व्यक्त करावी लागली. आता तर राहुल पंतप्रधानांवर वाटेल ते आरोप करत असल्याने असा एकही दिवस उजाडत नाही की, राहुल गांधींवर गुन्हा दाखल होत नाही. आगामी निवडणुकीनंतर काँग्रेसची केंद्रात सत्ता येण्याची सुतराम शक्यता नाही. मात्र राहुल यांना गुह्याच्या निमित्ताने देशभर पुढची पाच वर्षे भ्रमंती करावी लागेल हे निश्चित. एकीकडे राहुल यांनी तोंडाचा दांडपट्टा चालवलेला असताना त्या पक्षाचे वाचाळवीर नेते दिग्विजय सिंग आणि त्यांचे गुरू मध्य प्रदेशचे दिवंगत मुख्यमंत्री अर्जुन सिंग यांचे चिरंजीव अजय सिंग यांनी प्रतिस्पर्धी महिला उमेदवारांविरोधात टिप्पणी केली आहे. दिग्विजय यांनी साध्वी प्रज्ञासिंह यांच्याविरोधात बेताल विधान केले तर सिधीच्या खासदार रिती पाठक यांच्याविरोधात अजय सिंग यांनी हिणकस टिपणी केली. त्यामुळे त्यांच्याविरोधात जनमानस प्रक्षुब्ध झाले आहे. रिती पाठक या लोकप्रिय खासदार आहेत. त्यांच्या व प्रज्ञासिंह याच्यांविरोधातील टिपणी मध्य प्रदेशातील समस्त महिलांचा अवमान आहे अशी वातावरणनिर्मिती करायला भाजपने सुरुवात केली आहे.

किरण बेदींवर ताशेरे
पुद्दुचेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी सध्या ‘चर्चे’त आहेत. तसेही चर्चेत राहणे त्यांना नेहमीच आवडते. वेगवेगळय़ा फुशारक्यांच्या जोरावर त्यांनी आपली इमेज बिल्डिंग केली होती. पोलीस सेवा सोडल्यानंतर त्या काही काळ ‘अण्णा मंडळा’च्या अविभाज्य घटक होत्या. तिथे देशातील तमाम नेतेमंडळींना शिव्यांची लाखोली वाहण्यात या आघाडीवर असत. लोकपालच्या उपोषणावेळी अण्णा हजारेंच्या समक्ष त्यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे व अनंत कुमार यांचा जाहीर अपमान केला होता. अर्थात पुढे याच किरण बेदींना भाजपने ‘पावन’ करून पक्षात घेतले. कोणतेही योगदान नसताना त्यांनी भाजपकडून अल्पावधीत नायब राज्यपालपद मिळवले. त्यानंतर ‘सासूरवास’ सुरू झाला तो नारायण सामींना! नारायणसामी हे पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री. त्यापूर्वी ते यूपीए सरकारमध्ये पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्रीही होते. दिल्लीच्या राजकारणाची खडान्खडा माहिती असलेल्या नारायण सामींनी ‘‘या नायब राज्यपाल मला ‘खाष्ट सासू’सारख्या छळतात, त्यांचा काहीतरी बंदोबस्त करा’’ अशी विनंती अनेक वेळा पंतप्रधानांकडे करून पाहिली, मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही. गमतीचा भाग म्हणजे अण्णा मंडळातून बाहेर पडलेल्या दोन ‘प्रसिद्धी रत्नां’पैकी एक अरविंद केजरीवाल हे नायब राज्यपालांच्या त्रासाला कंटाळलेले आहेत तर दुसऱया किरण बेदी नायब राज्यपाल म्हणून त्रास देण्यात आघाडीवर आहेत. किरण बेदींचा त्रास थांबविण्यासाठी नारायण सामींनी एका काँग्रेस आमदाराला नायब राज्यपालांविरोधात न्यायालयात जायला लावले. आता चेन्नई उच्च न्यायालयाने ‘नायब राज्यपाल म्हणून तुम्ही रोजच्या कारभारात विनाकारण लुडबूड करू शकत नाहीत’, असे सांगत बेदी बाईंवर कडक ताशेरे ओढले आहेत. दिल्लीतही सत्तापक्षाने नायब राज्यपालांकडून लोकनियुक्त मुख्यमंत्र्यांना सळो की पळो करून सोडले होते. पुद्दुचेरीतही ते घडले. चेन्नई उच्च न्यायालयाचा निर्णय त्यामुळेच महत्त्वपूर्ण आहे.