दिल्ली डायरी – उत्तर प्रदेशात ‘घडलंय-बिघडलंय!’

>> नीलेश कुलकर्णी, [email protected]

उत्तर प्रदेशात मतांच्या दृष्टीने निर्णायक असलेल्या ब्राह्मण समाजाच्या सर्वपक्षीय 42 आमदारांनी लखनऊच्या कडाक्याच्या थंडीत बैठक घेऊन ‘राजकीय पारा’ टिपेला पोहोचवला आहे. ब्राह्मणांच्या या बैठकीवर योगी व प्रदेशाध्यक्ष पंकज चौधरी यांनी नाराजीचा कटाक्ष टाकत डोळे वटारल्याने तेथील भाजपांतर्गत राजकारणात ‘घडलंय बिघडलंय’ अशी स्थिती निर्माण झाली आहे.

ब्राह्मण हा परंपरागत भाजपचा मतदार मानला जातो. मात्र देशात मोदी व उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकार सत्तेवर आल्यापासून आपली उपेक्षा होत आहे ही तेथील ब्राह्मण समाजाची मुख्य तक्रार आहे. गमतीचा भाग म्हणजे जनसंघ ते भाजप अशी जी पक्षाची उभारणी झाली, त्यात ब्राह्मण समाजातील पूर्णवेळ कार्यकर्त्यांचे मोलाचे योगदान आहे. मात्र ज्यांनी पक्षासाठी खस्ता खाल्ल्या त्यांना अडगळीत टाकून भ्रष्ट, भामटे, लुटारू लोकांना भाजपात घेऊन वॉशिंग मशीनमध्ये घालून ‘पवित्र’ करण्याचे काम देशभरात मोदी-शहा यांनी गेल्या अकरा वर्षांपासून आरंभले आहे. त्याचाच परिपाक म्हणून ज्या पक्षासाठी खस्ता खाल्ल्या त्या पक्षात ‘हेचि फल का मम तपाला?’ असा सवाल या नेत्यांना पडला आहे.

एकेकाळी संघाचे कार्यालय उखडून फेकून हिंदू युवा वाहिनीच्या रूपाने संघाच्या हिंदुत्वाला ‘चॅलेंज’ देणाऱ्या योगी आदित्यनाथांना भाजपने थेट मुख्यमंत्रीपदी नेमले. त्यानंतर ‘हिंदुत्वाचे पोस्टरबॉय’ म्हणून संघाने व भाजपने प्रोजेक्ट केलेले योगी प्रत्यक्षात फक्त ठाकुरांचे ‘पोस्टरबॉय’ बनले. केवळ ठाकूरधार्जिणे राजकारण योगींनी दहा वर्षांत केले तसेच ब्राह्मण समाजाचे हवे तिथे खच्चीकरण केले. योगींच्या या कारनाम्याकडे दिल्लीकरांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे गेली दहा वर्षे खदखदत असलेल्या ब्राह्मणांच्या नाराजीचा उत्तर प्रदेशात स्पह्ट झाला आहे. या स्पह्टात योगींचे सरकार खाक होईल काय? याचे उत्तर आगामी निवडणुकीतच मिळेल.

भाजपचे आमदार पंचानंद पाठक यांनी ब्राह्मण आमदारांची बैठक आपल्या घरी स्नेहभोजनासाठी आयोजित केल्यामुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या बैठकीनंतर ‘गेली दहा वर्षे उपेक्षा व अन्याय सहन करणाऱया ब्राह्मण बांधवांसाठी आमचे दरवाजे सदैव उघडे आहेत’, अशी ऑफर समाजवादी पार्टीने दिल्यानंतर पंतप्रधानांनी ब्राह्मण समाजाचे उपमुख्यमंत्री असलेल्या बृजेश पाठक यांना तातडीने दिल्लीत पाचारण केल्याने तर्कवितर्क लावले जात आहे. वास्तविक उत्तर प्रदेशातील ब्राह्मण हा काँग्रेसचा परंपरागत मतदार मानला जातो. उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक ब्राह्मण मुख्यमंत्री काँग्रेस पक्षानेच दिले. मात्र रामजन्मभूमी आंदोलनानंतर हा समाज भाजपच्या हिंदुत्वाकडे आकर्षित झाला आणि त्यानंतर दिशाहीन झाला. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल, हरयाणा या राज्यांमध्ये ब्राह्मण हे मोठय़ा संख्येने असतानाही या राज्यांत मोदी-शहा यांनी ब्राह्मण मुख्यमंत्री दिले नाहीत. उलटपक्षी मोदी-शहांच्या राज्यात या समाजावर अन्याय होत असल्याची भावना आहे. मोदींच्या वाराणसी या ब्राह्मणबहुल मतदारसंघात त्यांचे घटलेले मताधिक्य हे ब्राह्मणांच्या नाराजीचे प्रतीक मानले गेले. गोरखपूरच्या राजकारणात योगींचा मठ विरुद्ध हरिशंकर तिवारींचा ‘हाता’ यांच्यातील संघर्ष सर्वश्रुत आहे. योगींच्या ब्राह्मणविरोधी राजकारणाची मुहूर्तमेढच तिथे रोवली गेली होती. भगव्या वस्त्रामधील योगींना खरे तर जात, पात, धर्म, पंथ नसतो, नसावा. मात्र योगी आदित्यनाथ यांनी भगव्या वस्त्राआड व मठाच्या आडून ठाकुरांचे राजकारण केले, ते आता भाजपच्या अंगलट येण्याची चिन्हे आहेत. समाजवादी पक्ष व काँग्रेसने नाराज ब्राह्मणांकडे गांभीर्याने पाहिले तर मायावतींसारखा मोठा ‘चमत्कार’ हे पक्ष उत्तर प्रदेशमध्ये करू शकतात. काय होते ते भविष्यात दिसेलच!

रात्रीस खेळ चाले!

मध्यरात्रीपर्यंत संसदेचे कामकाज चालवायचे आणि आपण कसे तीर मारले, याची जाहिरातबाजी करायची, असा शिरस्ता सध्याच्या सरकारमध्ये सुरू आहे. जगदीप धनखड राज्यसभेचे सभापती असताना तर ओम बिर्ला व त्यांच्यात कथित विक्रमी कामकाजावरून स्पर्धा असायची. मात्र मध्यरात्रीपर्यंत संसदेचा स्टाफ वेठीस धरून मोदी सरकार असे काय राष्ट्रकार्य करू इच्छिते? असा सवाल प्रत्येकाच्या मनात आहे. रात्री-अपरात्री संसदेचे कामकाज चालविण्यामागची सरकारची भावना ही शुद्ध नाही हे आता स्पष्ट होत आहे. मुळातच संसदेचे अधिवेशन अगदी कमी कालावधीसाठी आयोजित करायचे. त्यात मोठय़ा प्रमाणावर विधेयके मंजूर करून घ्यायची. विरोधकांनाही गोंधळासाठी मुभा द्यायची. त्याच गोंधळात काही विधेयके मंजूर करायची. जी वादग्रस्त आहेत त्यावर चर्चा करण्यासाठी रात्री-अपरात्रीची वेळ मुक्रर करायची. जेणेकरून सभागृहात कोणी फारसे हजरच राहू नये आणि मग मध्यरात्री ही विधेयके मंजूर केल्याचा भीम पराक्रम जगाला ओरडून सांगायचा, अशा पद्धतीने कामकाज सुरू आहे. ‘मनरेगा’चे नाव बदलून ‘व्हीबी जी रामजी’ नावाचे विधेयक सरकारने असेच घाईघाईत पारित केले. यापूर्वीही वक्फ बोर्डाचे विधेयक, ट्रिपल तलाक, जीएसटी विधेयकावेळीही सरकारने मध्यरात्रीपर्यंत संसदेचे कामकाज सुरू ठेवले होते. 2014 पूर्वीही या देशात अनेक सरकारे आली गेली. त्यांनीही जनहिताचे अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले. मात्र अपवादात्मक परिस्थिती वगळता संसदेच्या घडय़ाळाने कामकाजाचा रात्रीचा बाराचा आकडा कधी पाहिला नाही. मात्र मोदींच्या राज्यात हे असे ‘रात्रीस खेळ चाले’चे प्रयोग सुरू आहेत,

बांगलादेशातील ‘हिंदू ‘खतरे में’

दीपू चंद्र दास या हिंदू युवकाची बांगलादेशात निर्घृण हत्या केल्यानंतर बांगलादेशातील वातावरण पेटले आहे. तब्बल 29 ठिकाणी हिंदूंवर हल्ले करण्यात आले आहेत. अनेक मंदिरांना लक्ष्य करण्यात आले. हिंदुस्थानात आश्रयास असलेल्या माजी पंतप्रधान शेख हसिना यांच्या चिरंजीवांनी हिंदुस्थानच्या ‘सेव्हन सिस्टर’ तोडण्याचा बांगलादेशचा प्रयत्न असल्याचा खळबळजनक गौप्यस्पह्ट केलेला आहे. इतके सगळे घडत असताना भक्तांचे विश्वगुरू नरेंद्र मोदी कुठे आहेत? असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. बांगलादेशात हिंदूंवर जे काही अनन्वित अत्याचार होत आहेत, त्याबद्दल मोदी का काही बोलत नाहीत? असा प्रश्न जगभरातल्या हिंदूंना पडला आहे. देशाच्या परराष्ट्र खात्याचे प्रवत्ते मात्र बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराची आम्ही गांभीर्याने दखल घेतली आहे, अशी भाषा वापरत आहेत. मोदींचे ‘जेम्स बॉण्ड’ अजित डोवलदेखील यावर व्यक्त होताना दिसत नाहीत. स्वयंघोषित विद्वान परराष्ट्रमंत्री जयशंकरही कुठे काही बोलताना दिसत नाहीत. बांगलादेशसारखा एक टिकलीएवढा देश आपल्याला धूप घालत नाही. अशा देशाला आपण साधे खडसावू शकत नाही, इतके आपले सरकार व धोरण पळपुटे आहे.