
>> नीलेश कुलकर्णी
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अनुपस्थितीत रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प सादर केला. हा अंतरिम अर्थसंकल्प असला तरी त्याचे स्वरूप सत्ताधारी पक्षाने पूर्ण अर्थसंकल्पासारखेच ठेवल्याचे दिसून येते. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत ज्या समाजघटकांनी मोदी सरकारचे ‘होश’ उडवले त्या सर्व घटकांना, म्हणजे शेतकरी, कष्टकरी आणि मध्यम वर्ग, अशा सर्वांना मोदी सरकारने खूश करण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पात केला आहे. पाच राज्यांत ‘होश’ उडाला नसता, लोकसभा निवडणूक तोंडावर नसती तर अर्थसंकल्पातील ‘जोश’ दिसला असता का?
मोदी सरकारने आपला शेवटचा अर्थसंकल्प सादर केला. तो अंतरिम असल्याने काही संकेत आणि निकष पाळले जातील अशी अपेक्षा होती. मात्र या अंतरिम अर्थसंकल्पात शेतकरी, कामगार आणि मध्यम वर्ग यांच्यावर मेहेरबान होत सरकारने सवलतींचा अक्षरशः वर्षाव केला. हा सरळ सरळ निवडणुकीसाठीचा जुमला म्हणता येईल. ज्या ‘मोदीनॉमिक्स’ची चर्चा 2014 मध्ये बहुमताने सत्तेत आल्यापासून केली जात होती त्या मोदीनॉमिक्सचा हा अर्थसंकल्प म्हणजे पराभव मानायचा का? कारण अनुदाने, सबसिडी, ऑनलाइन व्यवहार वगैरे गोष्टींचे नगारे मोदी सरकारने आणि त्यांच्या भक्तांनी नेहमीच वाजवले. मग आज अंतरिम अर्थसंकल्पात जनतेचा एवढा कळवळा सरकारला का आला? सवलतींचा एवढा वर्षाव करण्याची गरज का भासली? आदी प्रश्न या अर्थसंकल्पाने उपस्थित केले आहेत. या अर्थसंकल्पाद्वारे मोदी सरकारची सगळ्यांवर ‘कामधेनू कृपा’ झाली आहे, पण त्याची परतफेड मतदारांकडून होणार का? अर्थसंकल्पाची कामधेनू सत्ताधारी पक्षावर प्रसन्न होणार का, या प्रश्नांची उत्तरे एप्रिलमध्येच मिळू शकतील.
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांत भाजपचा दणदणीत विजय झाला असता तर मोदी सरकारच्या ‘कामधेनू’ची कृपा शेतकरी आणि मध्यमवर्गावर झाली असती काय, असा प्रश्न सध्या विचारला जात आहे. स्वतःच निर्माण केलेल्या चक्रव्यूहातून बाहेर पडणे विद्यमान सरकारला दुरापास्त झाले होते. त्यात नोटाबंदी आणि जीएसटीमुळे देशभरातील जनमत सरकारविरोधात गेले होते. त्यामुळे सवलतींची बरसात करणारा अर्थसंकल्प मोदी सरकारला मांडावा लागला. यातून सरकारचे अपयशच ठळकपणे समोर येते. किंबहुना शेतकर्यांना खूश करण्यासाठी ज्या ‘रयतू योजने’ने तेलंगणात चंद्रशेखरराव यांना दणदणीत बहुमताने पुन्हा सत्तेवर बसवले आणि ज्या ‘कालिया’ योजनेमुळे ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक पंधराएक वर्षांनंतरही लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत त्याची ‘कॉपी’च करण्याची कामगिरी मोदी सरकारने अर्थसंकल्पात केली आहे. शेतकर्यांचे उत्पन्न दीडपट केले ही तोंडाची वाफ सत्ताधारी नेहमीच सोडत असतात, मात्र पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत शेतकर्यांनी हरवल्यानंतर मोदी सरकारचे उशिरा का होईना डोळे उघडले हेही नसे थोडके! ‘हाऊ इज द जोश’ असे अर्थसंकल्पानंतर सत्ताधारी सध्या प्रत्येकाला विचारत आहेत. तथापि पाच राज्यांतील जनतेने ‘होश’ उडविल्यामुळेच हा अर्थसंकल्पातील ‘जोश’ दाखविणे सत्ताधार्यांना भाग पडले आहे.
योगींचे जानवे आणि कुंभातली डुबकी…
‘कौलदत्तात्रय’ गोत्र सांगून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सौम्य हिंदुत्वाचा पंचा खांद्यावर टाकल्यापासून तथाकथित सेक्युलर काँग्रेसवाल्यांपेक्षा भाजपवाल्यांनाच आपल्या जानव्याची चिंता लागलेली दिसून येते. मात्र आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथच जानवे न घातल्याने सध्या काँग्रेसच्या रडारवर आले आहेत. हनुमानाची जात काढल्याचे पापक्षालन म्हणा किंवा श्रद्धेपोटी म्हणा प्रयागराजमधील पवित्र कुंभात योगींनी डुबकी मारली, मात्र त्यावेळी स्नान करताना योगींच्या गळ्यात जानवे नसल्याने प्रखर हिंदुत्ववादी योगी काँग्रेसच्या ‘ट्रोळधाडी’त सापडले आहेत. योगींची डुबकी वादाच्या भोवर्यात सापडली आहे. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजपने रामाचे राजस्थानातले आजोळ, हनुमानाची जात आणि सीताराम केसरींची जात असले नसते मुद्दे उपस्थित केले होते. त्याच वेळी राहुल यांची कुचेष्टा करत ‘आप का गोत्र कौनसा है’ अशी विचारणा भाजपची मंडळी करत होती. त्यात योगी आघाडीवर होते, मात्र आता खुद्द योगी आदित्यनाथच ‘बिनजानव्याचे’ स्नान करताना दिसल्यामुळे काँग्रेसला आयतीच संधी मिळाली आहे. एकीकडे काँग्रेसने योगींवर टीकेची झोड उठवलेली असताना दुसरीकडे योगींचेच मंत्री ओमप्रकाश राजभर यांनी पाप धुण्यासाठी योगींनी आपल्या मंत्रिमंडळासह पवित्र त्रिवेणी संगमावर ‘डुबकी’ मारल्याचा टोला लगावला आहे.
गोयलांचे ‘चरणस्पर्श’ आणि आठवलेंचा ‘कविताग्रह’
अंतरिम अर्थसंकल्प हंगामी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी मोठ्या जोशात मांडला असला तरी अर्थसंकल्पावेळी अनेक गमतीजमती सभागृहात घडल्या. हरयाणा हे आपले मूळ राज्य असल्याने तिथे ‘एम्स’ची भेट देत असल्याचे सांगणार्या गोयलांनी बजेटच्या उत्तरार्धात मी मूळचा महाराष्ट्राचा असे सांगितले. त्यामुळे गोयल नेमके कुठले हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचवेळी बजेट मांडण्यापूर्वी गोयलांनी नितीन गडकरी, उमा भारती, सुषमा स्वराज या वरिष्ठ मंडळींचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतले. गडकरींना तर त्यांनी दोनदा नमस्कार केला. अर्थात त्याचवेळी भाजपचे भीष्माचार्य लालकृष्ण आडवाणी यांच्या नशिबी मात्र गोयल यांचा ‘चरणस्पर्श’ काही आला नाही. गोयल आडवाणींना सोयिस्कर विसरले की अनवधानाने असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे. गोयल इकडे चरणस्पर्श करीत असताना शीघ्रकवी म्हणून प्रसिद्ध असलेले केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची काव्यप्रतिभा आवरता आवरता सत्ताधारी पक्षाच्या नाकीनऊ आले. अर्थंसंकल्पात शेरोशायरी वगैरे नेहमीच असते, मात्र पीयूष गोयल कॉर्पोरेट कल्चरचे असल्यामुळे त्यांना काही कविता, शेरोशायरी धडपणे म्हणता येईना. त्यांची ही अवघडलेली अवस्था पाहून आठवलेंमधला कवी जागा झाला. मैं करता हूं कविता… असे म्हणत ते आपल्या आसनावरून उठले. सुरुवातीला त्यांना आजूबाजूच्या खासदारांनी बळे बळे समजावून खाली बसवले, मात्र आठवलेंना कवितेची उबळ काही केल्या बसू देईना. ‘राहुलजी सुनो सुनो…’ असे म्हणत आठवले कविता म्हणतात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र संसदीय कामकाजमंत्री नरेंद्र तोमर यांनी कसेबसे त्यांना इशारा करून खाली बसवले. एक वेळ गोयल यांचा अंतरिम अर्थसंकल्प परवडला, पण आठवले यांच्या कविता नकोत अशीच भावना उपस्थित खासदारांनी बोलून दाखविली. आठवलेंनी किमान ‘वेळप्रसंग’ लक्षात घेऊन आपल्या कवितांना मुरड घातलेलीच बरी !




























































