दिल्ली डायरी : ममतादीदींचे ‘अमरा सबोई राजा’!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नीलेश कुलकर्णी 

भाजपविरोधात समविचारी आघाडी स्थापन करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा पं. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गेल्या आठवड्यात दिल्ली दौर्‍यात अनेक नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. पंतप्रधानपदाबद्दल विचारल्यावर त्यांनी, ‘अमरा सबोई राजा’ (आम्ही सगळेच राजे) या रवींद्रनाथ टागोरांच्या काव्यपंक्ती उद्धृत केल्या. सध्या लोकसभेत ३४ खासदार असलेल्या ममतादीदी आगामी निवडणुकीत सर्वच्या सर्व ४२ जागा जिंकून दिल्लीच्या राजकारणात बंगालच्या खाडीतून तृणमूलचे तुफान आणू पाहत आहेत. हे तुफान खरोखरच देशाच्या राजकारणात वादळ निर्माण करणार काय, हाच प्रश्न आहे. 

आगामी लोकसभा निवडणूक जवळ आली असल्याने विरोधी  पक्ष ‘मोदी हटाव’ या एका अजेंड्याच्या आधारे काँग्रेससह एकत्र येण्याचा जोरदार प्रयत्न करीत आहेत. त्यातही तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी याबाबतीत जोरात पुढाकार घेतला आहे. गेल्या आठवड्यात त्यांनी दिल्ली दौरा करत अनेकांच्या गाठीभेटी घेतल्या. अगदी हिंदुस्थानी राजकारणातील भीष्माचार्य म्हटले जाणारे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांचीही भेट घेऊन ‘पाय लागू’ केले. विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खरे म्हणजे आडवाणी यांचे शिष्योत्तम, पण त्यांच्याच विरोधात आशीर्वाद द्या असे साकडे ममतादीदींनी आडवाणींना घातले. आता आडवाणींनीं जे काही आशीर्वाद त्यांना दिले असतील ते कितपत फलद्रुप होता हे काळच सांगेल.

भाजप विरोधात आगामी लोकसभा निवडणुकीत महाआघाडी करण्याचे  प्रयत्न काँग्रेसच्या पुढाकाराने विरोधी पक्षांकडून होत आहेत. त्यात मित्रपक्षांना जास्तीत जास्त जागा सोडण्याचे धोरण काँगेसने अंगिकारले असल्यामुळे काँग्रेसचे संख्याबळ कितपत वाढेल याबाबत साशंकता आहे. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टी व काँग्रेस आघाडी झाल्यास बसपाच्या हत्तीला अंकुश लागू शकतो. त्यामुळे प. बंगालात काँग्रेस आणि डावे पक्ष मरणासन्न अवस्थेत असताना ममता यांना आपले राज्य जिंकत दिल्लीवर स्वारी करण्याची सुवर्णसंधी असल्याचे मानले जात आहे. अर्थात एनआरसीच्या अहवालामुळे राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत आहेत. किंबहुना ममतांची दिल्लीवरील ‘चाल’ लक्षात घेऊनच आसाममधील एनआरसी अहवालाचे ‘टायमिंग’ साधले गेले आहे. प. बंगालच्या खाडीत कमळ फुलविण्याचे भाजपाईंचे फार जुने स्वप्न आहे. मात्र सुरुवातीला डावे आणि आता ममतांमुळे ही स्वप्नपूर्ती झालेली नाही. त्यामुळेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ममतांच्या राज्यातून २२ जागा जिंकण्याची भीष्मप्रतिज्ञा वगैरे केलेली आहे. एनआरसीच्या अहवालावरून हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरण झाल्यास त्याचा मोठा फायदा भाजपला मिळू शकतो असा यामागचा होरा आहे. त्याचबरोबर ममतांना या ध्रुवीकरणाचा फटका कसा बसेल असे फासे टाकले जात आहेत. भाजपच्या या राजकारणाचा ममतादीदींना अंदाज असल्यामुळेच त्यांनीही सॉफ्ट हिंदुत्वाचा राग आळवायला सुरुवात केली आहे. मोठे ब्राह्मण संमेलन करून त्यांचा सध्या दोन्ही व्होटबँक खूश करण्याचा प्रयत्न आहे. सोळाव्या लोकसभेत असलेली ३४ खासदारांची ताकद जरी ममतादीदी १७ व्या लोकसभेत कायम राखू शकल्या तर दिल्लीतील मोठे सत्ताकेंद्र म्हणून त्या उदयास येऊ शकतात. नगण्य खासदार असलेल्या देवगौडांना पंतप्रधानपदाचा अचानक धनलाभ झाला तर आपल्याला का नाही, अशा विचारात विरोधी पक्षातील अनेक ‘बाशिंगधारी’ सध्या पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहात आहेत. त्यामुळेच ‘अमरा सबोई राजा’ असे ममतादीदींनी टागोरांचा हवाला देऊन केलेले वर्णनही सूचक आहे. ममतादीदी पंतप्रधान होतील की नाही ते येणारा काळच ठरवेल, मात्र आसाममध्ये ममतादीदींच्या खासदारांना जेरबंद करून भाजपने त्यांची धास्ती घेतली आहे हेच दाखवून दिले आहे. 

धपाटे की आशीर्वाद?

पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी कोणीही आपल्या ‘पाया पडू नये’ असे स्पष्ट बजावून एक चांगला पायंडा पाडलेला आहे. मात्र पंतप्रधानांचा आदेश बहुधा ‘मोदीजी के बाद योगीजी’ असा डंका वाजविले जाणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कानी पडला नसावा. योगींच्या दलितविरोधी धोरणाविरोधात आवाज उठविणारे इटावाचे खासदार अशोक दोहरे यांनी पंतप्रधान भाजप संसदीय बोर्डाच्या बैठकीला जात असताना त्यांना नमस्कार केला. मोदींनीही नमस्कार करत त्यांना प्रतिसाद दिला, मात्र काही कळायच्या आत दोहरेंनी मोदींचे ‘चरणस्पर्श’ केले. त्यामुळे मोदी संतप्त झाले. दोहरेंना उठवताना मोदींनी त्यांच्या पाठीवर मारलेल्या धपाट्याचा ‘आवाज’ संसदेच्या लॉबीमध्ये चांगलाच घुमला. मोदींनी एकीकडे अशा काही चांगल्या प्रथा सुरू केलेल्या असताना तिकडे गोरखपुरात मात्र मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या असंख्य भक्तांना ‘चरणस्पर्श’ देऊन आशीर्वाद दिले. भाजप पदाधिकारी दर्शन घेत होते तोवर ठीक होते. मात्र एका पोलीस अधिकार्‍यानेही बेल्ट आणि बूट उतरवून योगींची गुरुपौर्णिमेनिमित्त पाद्यपूजा केल्यामुळे खळबळ उडाली. या गुरुदर्शनाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने पाय लागूबाबत भाजपची नेमकी भूमिका काय यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. एकीकडे पाया पडले तर मोदी पाठीत धपाटे घालतात तर दुसरीकडे योगी आशीर्वाद देतात. आता धपाटे पाहिजेत की आशीर्वाद हे ज्याचे त्याने ठरवलेले बरे! 

अन्याय का?

सर्वोत्कृष्ट संसदपटूच्या पुरस्काराने नुकतेच बिजू जनता दलाच्या भृतहरी मेहताब, तृणमूल काँग्रेसचे दिनेश त्रिवेदी, भाजपचे हुकुमदेव नारायण यादव, विद्यमान राज्यपाल व भाजप नेत्या नजमा हेपतुल्ला, काँग्रेसचे गुलाम नबी आझाद या मान्यवरांचा २०१३ ते २०१७ चे पुरस्कार देऊन नुकताच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. संसद आता पहिल्यासारखी ‘ग्रेसफुल’ राहिलेली नाही. संसदेत पूर्वीसारखे वक्ते राहिले नाहीत. विशेषतः नुकत्याच झालेल्या अविश्वासदर्शक ठरावावेळी अभ्यासपूर्ण वक्त्यांची मोठी वानवा दिसून आली. अशा वेळी वरील मान्यवर खासदारांनी उमटवलेला ठसा अभिनंदनीय आहे. मात्र असे असले तरी या यादीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड सीताराम येचुरी यांचे नाव नसल्याने अनेकांना धक्का बसला आहे. युक्तिवाद करत अभ्यासपूर्ण मांडणीने राज्यसभेत आपला अमीट ठसा उमटविणार्‍या कॉम्रेड येचुरी यांचे नाव सर्वोत्कृष्ट संसदपटूच्या यादीत होते, मात्र ‘स्क्रीनिंग कमिटी’ने ‘डाव्या’ येचुरींचे नाव वगळून आपले ‘उजवेपण’ सिद्ध केल्याची चर्चा सुरू आहे. वास्तविक, येचुरींना तिसरी टर्म डाव्यांच्या पोथीनिष्ठ राजकारणामुळे मिळाली नाही. त्यावेळी राज्यसभेत भाजपसह अनेक खासदारांनी डाव्यांनी आपल्या नियमांत बदल करावा आणि येचुरींना तिसर्‍यांदा राज्यसभेत पाठवावे. कारण त्यांच्यासारख्या अभ्यासू व्यक्तीची संसदेला नितांत गरज असल्याचे सांगितले होते. तत्कालीन सभापती हमीद अन्सारींनी तर ‘सीतारामजी, उद्या मी सभागृहात आलो तर पॉइंट ऑफ ऑर्डर करत उभे राहत अभ्यासपूर्ण युक्तिवाद करणारे तुम्ही दिसणार नाहीत. मला तुमच्याकडून बरेच शिकता आले’, असा येचुरींचा गौरव केला होता. समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव यांना तर येचुरींच्या निरोप समारंभावेळी आपले अश्रू आवरता आले नव्हते. येचुरी भलेही कम्युनिस्ट असतील, त्यांच्या राजकीय विचारधारेशी भाजपच्या विचारधारेचा विरोध, संघर्ष आहे आणि तो असावादेखील. मात्र त्यासाठी एखाद्या व्यक्तीची वैयक्तिक पातळीवरील कामगिरी डावलता येणार नाही. डाव्या येचुरींचा सर्वोत्कृष्ट संसदपटू म्हणून उजव्या विचारांच्या सरकारने सन्मान केला असता तर जनतेच्या नजरेत सरकार अधिक ‘उजवे’ ठरले असते.

[email protected]