दिल्ली डायरी – मध्य प्रदेशात भाजपसाठी इकडे आड तिकडे विहीर

>> नीलेश कुलकर्णी 

काँग्रेसचे तालेवार नेते ज्योतिरादित्य शिंदे यांना गळाला लावून भाजपने मध्य प्रदेशातून काँग्रेसचे सरकार हद्दपार केले असले तरी शिवराजसिंग यांचे आसन अजूनही भाजपला स्थिरस्थावर करता आलेले नाही. ज्योतिरादित्य यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून भाजपवासी झालेल्या 22 काँग्रेस आमदारांनी आपल्या पदाचा त्याग केला आहे. या आमदारांना पुन्हा निवडून आणणे हे मुख्यमंत्री शिवराजसिंग ज्योतिरादित्य यांच्यापुढचे मोठे आव्हान आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांचे सर्वच समर्थक पुन्हा निवडून आले तर शिवराजमामांच्या खुर्चीसाठी ते आव्हान ठरेल आणि ते हरलेच तर भाजपला सत्ता गमवावी लागेल. ‘इकडे आड तिकडे विहीरअशी भाजपची स्थिती झाली आहे.

देशात कोरोनाचा प्रवेश आणि मध्य प्रदेशात भाजप सरकारचा  शिरकाव एकाचवेळी झाला होता. सर्व प्रकारचे फंडे वापरून भाजपने तेथे सत्ता स्थापन केली. ‘मास्क’ घालून मुख्यमंत्रीपदाची शपध घेणारे नेते म्हणून शिवराजसिंग चौहान यांची इतिहासात नोंद झाली. मात्र जसा कोरोनाचा धोका अजून सगळीकडेच आहे तसाच धोका मध्य प्रदेशातील भाजप सरकारलाही आहेच. त्यातच संसदेचे पावसाळी अधिवेशन आता सुरू होत आहे. यानिमित्ताने सत्तांतराच्या नाटय़ाचे एक अजब वर्तुळ पूर्ण झाले आहे. काँग्रेसचे तालेवार नेते ज्योतिरादित्य शिंदे यांना गळाला लावून भाजपने मध्य प्रदेशातून काँग्रेसचे सरकार हद्दपार केले असले तरी शिवराजसिंग यांचे आसन अजूनही भाजपला स्थिरस्थावर करता आलेले नाही. ज्योतिरादित्य यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून भाजपवासी झालेल्या 22 काँग्रेस आमदारांनी आपल्या पदाचा त्याग केला आहे. या आमदारांना आता विधानसभेवर पुन्हा निवडून जाण्याची गरज आहे. त्यामुळे या सर्व ठिकाणी पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे. हे सर्व आमदार निवडून येणे भाजपसाठी आवश्यक आहेच, पण त्याचवेळी हे जिंकून आलेले आमदार म्हणजे भाजपतील निष्ठावंतांना ‘सवत’ आणल्यासारखे वाटणार आहे. त्यामुळे 22 काँग्रेस बंडखोरांना पुन्हा निवडून आणणे हे मुख्यमंत्री शिवराजसिंग व ज्योतिरादित्य यांच्यापुढचे सर्वात मोठे आव्हान आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांचे सर्वच समर्थक पुन्हा निवडून आले तर शिवराजमामांच्या खुर्चीसाठी ते आव्हान ठरेल आणि हे आयतोबा हरलेच तर कोरोनाच्या नाकावर टिच्चून मिळवलेली सत्ता भाजपला गमवावी लागेल. अशा ‘इकडे आड तिकडे विहीर’ या विचित्र परिस्थितीत मध्य प्रदेशमधील भाजप सापडला आहे.

मध्य प्रदेशातल्या विधानसभा पोटनिवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगाने अद्याप जाहीर केलेल्या नाहीत. ही पोटनिवडणूक टाळण्याचा भाजपचा खटाटोप असल्याचा आरोप काँग्रेसने लावला आहे. कोरोनाच्या काळात ज्योतिरादित्य शिंदे यांचे मोठे वाजतगाजत स्वागत भाजपने केले होते. त्याचा रंग आता फिका पडत चालला आहे. मुळातच ज्योतिरादित्य हे काही संपूर्ण राज्याचे नेते वगैरे कधीच नव्हते. इतकेच नाही, तर शिंदे घराण्याला नेहमीच ग्वाल्हेर आणि गुणा या त्यांच्या बालेकिल्ल्यातही वारंवार मोठय़ा विरोधाला सामोरे जावे लागलेले आहे, मात्र मध्य प्रदेशात सत्तांतर करण्याएवढे आमदार गाठीशी असल्याने भाजपने केंद्रीय मंत्रीपदाचे ‘गाजर’ दाखवत ज्योतिरादित्य यांच्या हातात ‘कमळ’ दिले. मात्र त्यानंतर भाजपअंतर्गत राजकारण उसळय़ा मारू लागले आहे. ज्योतिरादित्य यांना तीव्र विरोध करत निष्ठावंत रस्त्यावर उतरले आहेत. 22 आयतोबांना पुन्हा आमदार बनवून ‘राजकीय हुतात्मा’ बनण्याची कोणाही निष्ठावंताची तयारी नाही. भाजपमध्ये आमची अवस्था या देशात जशी कश्मिरी पंडितांची आहे तशीच आहे, ही एका निष्ठावंत भाजप नेत्याची प्रतिक्रिया पुरेशी बोलकी आहे. निष्ठावंतांनी संपूर्ण असहकार पुकारला तर शिवराजमामांना सत्तेचे चंबूगबाळे आवरावे लागेल आणि पूर्ण ताकद लावून त्यांनी 22 आयतोबांना निवडून आणले तर ज्योतिरादित्य शिंदे यांचे हात बळकट केल्यासारखे होणार आहे. त्यामुळे एकीकडे शिवराज दुहेरी कात्रीत सापडले आहेत तर दुसरीकडे काँग्रेसमध्ये असताना हायकमांडच्या घरी कुटुंबातील सदस्याप्रमाणे वावर असणाऱ्य़ा ज्योतिरादित्य शिंदे यांना भाजप हायकमांडच्या अपॉइंटमेंटसाठी मिनतवाऱ्य़ा कराव्या लागत आहेत. त्यातच कोरोनामुळे केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार लांबल्याने शिंदे यांचा जीव टांगणीला लागला आहे. राजस्थानात सचिन पायलट यांचे ‘मन परिवर्तन’ करण्याची जबाबदारी शिंदेवर होती. त्यात ते अपयशी ठरले. तेव्हा आता पोटनिवडणुकीत त्यांनी करिश्मा दाखवला तरच त्यांचे बूड भाजपमध्ये स्थिर होईल, अन्यथा ‘ना घर का ना घाट का’ अशीच त्यांची अवस्था होण्याची भीती आहे.

दावा सोडून द्या!

‘पार्टी विथ डिफरन्स’ आणि चाल, चरित्र और चेहरा याची जपमाळ भाजप दिवसरात्र ओढत असतो, मात्र सोयीनुसार ही जपमाळ भाजपाई व्यवस्थितपणे खुंटीलाही टांगून ठेवतात. इतिहासात याची अनेक उदाहरणे आणि दाखले आहेत. आता तामीळनाडूमध्ये घडलेला प्रसंग भाजपच्या साधनशुचितेची पोलखोल करणारा आहे. तामीळनाडूमध्ये काहीही करून हातपाय पसरायचे हा चंग भाजपने बांधला आहे. त्यात वावगे असेही काही नाही. प्रत्येक राजकीय पक्षाला विस्ताराची महत्त्वाकांक्षा असतेच. मात्र त्यासाठी चाल-चरित्राचे दाखले देणाऱ्य़ा भाजपने जो मार्ग अनुसरला आहे त्यावरून टीकेची झोड उठली आहे. द्रविडी चळवळीची पार्श्वभूमी असलेल्या तामीळनाडूत भाजपच्या पक्षविस्ताराला अगोदरच मर्यादा आहेत. त्यामुळे अगोदर अण्णा द्रमुकच हायजॅक करण्याचा प्रयत्न भाजपने केला तो सपशेल फसला. सुपरस्टार रजनीकांत यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून पाहिली, पण त्यातही म्हणावे असे यश आले नाही. कुख्यात चंदनतस्कर वीरप्पनच्या मुलीला भाजपमध्ये घेतले गेले. मध्यंतरी एका पोलीस अधिकाऱ्य़ानेही नोकरीचा राजीनामा देऊन हाती कमळ घेतले. हे सगळे खटाटोप कमी होते म्हणून की काय, सूर्या नावाच्या एका नामचीन गुंडावर भाजपने गोमूत्र शिंपडण्याचा प्रयत्न केला. सहा खून आणि 50 हून अधिक गुह्यांमध्ये ‘वॉण्टेड’ असलेल्या सूर्या नावाच्या हिस्ट्रीशीटरच्या पक्षप्रवेशासाठी मंडप सजला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष मुरगन यांच्या उपस्थितीत सूर्या याचे भाजपमध्ये वाजतगाजत आगमन होत असतानाच चेंगालपट्टूचे पोलीस ऐनवेळी सूर्या याला बेड्या ठोकण्यास पोहोचले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. हे सर्व पाहता ‘पार्टी विथ डिफरन्स’चा दावा भाजपने सोडून दिलेलाच बरा!

संकटमोचक

‘कठीण समय येता कोण कामास येतो’ याचे उत्तर दिल्लीच्या राजकीय वर्तुळात तरी संकटमोचक प्रणब मुखर्जी असेच होते. सरकार कोणत्याही पक्षाचे असो, त्याचे कान पिरगळण्याचा आणि प्रसंगी खडे बोल सुनावण्याचा अधिकार प्रणबदांना मिळाला होता तो त्यांच्या विद्वत्तेमुळे. यूपीए सरकार सत्तेवर असताना अण्णा हजारे यांचे ‘लोकपाल’चे आंदोलन असो की इतर कोणतीही समस्या, त्यावरचे रामबाण औषध हे प्रणब मुखर्जी होते. अत्यंत धूर्त, मुत्सद्दी असलेल्या प्रणबदांना एनसायक्लोपीडिया म्हणायचे ते उगाच नाही. राष्ट्रीय व आंतराराष्ट्रीय घटना आणि संदर्भांची ते टांकसाळ होते. कठोर व कर्तव्यदक्ष प्रशासकही होते. सध्या भाजप सरकारमध्ये मंत्री असणारे व्ही. के. सिंग लष्करप्रमुख असताना लष्कराची ‘वेगळी’च हालचाल सुरू असल्याचा सुगावा लागताच प्रणबदांनी तत्काळ लक्ष घालून मोठी घडामोड पूर्णतः रोखली होती याचा दाखला दिला जातो. 2014 मध्ये प्रचंड बहुमताने सत्तेवर आलेल्या भाजप सरकारच्या कार्यकाळाचेही ते साक्षीदार राहिले. नोटाबंदी आणि इतर फसलेल्या सरकारच्या निर्णयावर प्रणबदांनी नव्या सरकारचेही कान टोचले होते. पश्चिम बंगालमधील छोटय़ा गावातून येऊन दिल्लीचे राजकीय वर्तुळ आपल्याभोवती अर्धशतकभर फिरविणाऱ्य़ा प्रणबदांनी नुकताच जगाचा निरोप घेतला. पंतप्रधानपदासाठी सर्वार्थाने योग्य असतानाही त्यांना ते पद मिळाले नाही. प्रणबदांना राष्ट्रपती बनवून काँग्रेसने भूतकाळात केलेली चूक थोडीफार सुधारली होती.

आपली प्रतिक्रिया द्या