दिल्ली डायरी – तामीळनाडूतील राजकीय जत्रा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नीलेश कुलकर्णी  

तामीळनाडूमध्ये सध्या बऱ्य़ाच राजकीय गडबडी सुरू आहेत. तेथील आगामी विधानसभा निवडणूक राजकारणाचे पत्ते पिसले जात आहेत. भाजपही तेथील राजकीय स्पेस भरून काढण्याचा प्रयत्न करीत आहे. एकंदरीत तामीळनाडूत राजकीय जत्रा भरली आहे. त्यातून कुठला पर्याय तामीळ जनता निवडते हे दिसेलच.

तामीळनाडूची निवडणूक तोंडावर आहे. जयललिता आणि करुणानिधी या दोन सर्वात मोठय़ा नेत्यांच्या अनुपस्थितीत तमिळी जनता पहिल्यांदाच मतदानाचा कौल देईल. अम्मा आणि करुणानिधींच्या निधनामुळे तमिळी राजकारणात जी पोकळी निर्माण झाली आहे ती अजून भरून येण्यास वाव नाही. करुणानिधींचा द्रमुक हा कुटुंबकेंद्रित पक्ष असला तरी अंतर्गत मतभेदांनी तो बेजार आहे, तर अण्णा द्रमुकमध्ये कोणाचा पायपोस कोणाला राहिलेला नाही. मुख्यमंत्री पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री पनीरसेल्वम यांच्यातील ‘लठ्ठालठ्ठी’मुळे नाही म्हणायला तमिळी जनतेची लॉकडाऊनमध्ये फुकटात करमणूक होत आहे. तमिळी राजकारणातली ‘स्पेस’ लक्षात घेऊन रजनीकांत आणि कमल हसन या महानायकांनी राजकारणाच्या पडद्यावर ‘एंट्री’ घेतली खरी, मात्र दोघांनाही अद्याप आपला प्रभाव पाडता आलेला नाही. रजनीकांतच्या खांद्यावरून दिल्लीचे सत्ताधीश सत्तेचा ‘तीर’ चालवत असल्याचा संशय तमिळी जनतेच्या मनात बळावत असल्याने रजनीकांतचा ‘करिश्मा’ किमान राजकारणात तरी अजून दिसून आलेला नाही. या सगळ्या परिस्थितीत तामीळनाडूमध्ये हातपाय पसरण्याचा भाजपचा इरादा आहे.  कुख्यात चंदनतस्कर वीरप्पनची मुलगी भाजपमध्ये घेतल्यानंतर आता त्या पक्षाने सनदी सेवेचा राजीनामा दिलेल्या आणि ‘सिंघम’ म्हटल्या जाणाऱ्य़ा अन्नामलाई कुप्पूसामी यांच्या हाती भाजपचे कमळ दिले आहे.

जयललितांच्या निधनानंतर भाजपने अम्मांसोबतची राजकीय मैत्री विसरून अण्णा द्रमुकमध्ये अनागोंदी माजवून तो पक्षच ‘टेकओव्हर’ करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी अम्मांची मैत्रीण शशिकलाबाईंना तुरुंगवारी घडवून आणली. मात्र अण्णा द्रमुकला पूर्णपणे टेकओव्हर करणे दिल्लीश्वरांना जमले नाही. त्यामुळे आता सापडेल त्याला भाजपमध्ये आणण्याचा सपाटा सुरू आहे. अर्थात कुप्पूसामींसारखे माजी पोलीस अधिकारी भाजपमध्ये आल्यामुळे रातोरात भाजप तामीळनाडू जिंकेल आणि साऊथ इंडियन सिनेमासारखे काहीतरी ‘रापचिक’ घडेल या भ्रमात कोणी राहू नये. मुळातच द्रविडी आंदोलनाची पार्श्वभूमी असलेल्या तामीळनाडूमध्ये भाजपला विस्तारासाठी मर्यादा आहेत. त्यामुळेच कधी द्रमुक तर कधी अण्णा द्रमुक अशा ‘राजकीय कुबडय़ा’ बदलून भाजपने आजवर वाटचाल केली होती. सध्या दिल्लीश्वरांचे कश्मीर ते कन्याकुमारी असे पक्षविस्ताराचे मिशन असल्यामुळे आता तामीळनाडूवर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. द्रमुकने निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या मदतीने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे, तर अण्णा द्रमुक या पक्षात गोंधळाचे वातावरण असले तरी तो तयारीला लागलाच आहे. द्रमुकचे दादागिरीचे राजकारण पुन्हा नको, असा मतप्रवाह अजूनही तामीळनाडूत आहे ही बाब अण्णा द्रमुकचे बुडणारे गलबत वाचवू शकते.

टीम कधी जाहीर होणार?

जगतप्रकाश नड्डा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होऊन सात महिने झाले तरी नड्डांना अजून आपली कार्यकारिणी जाहीर करता आलेली नाही. याबाबतीत नड्डांनी माजी अध्यक्ष बंगारू लक्ष्मण यांचा तीन महिन्यांचा ‘विक्रम’ ही मोडीत काढला आहे. नड्डा हे कुशल संघटक असले तरी ते अध्यक्ष झाले तेच मुळात कोरोनाच्या शिरकावावेळी. अमित शहांची मुदत संपल्यामुळे तसेच ते केंद्रात गृहमंत्री झाल्यामुळे कार्यकारी अध्यक्ष असलेल्या नड्डांकडे पक्षाची सूत्रे आपसूकच आली, मात्र ही सूत्रे आली आणि त्याचबरोबर कोरोना आला आणि त्यानंतर पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या लॉकडाऊनमध्ये ‘टीम नड्डा’ चेही लॉकडाऊन झाले. सात महिन्यांनंतरही नड्डांना ‘टीम अमित शहा’ सोबतच काम करावे लागत आहे. भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार यांच्या तंगडय़ात तंगडय़ा अडकल्या असल्यामुळे कार्यकारिणीला मुहूर्त मिळत नाही. मंत्रिमंडळातील सुमार कामगिरी असलेल्या मंत्र्यांना ‘पक्षसेवे’त पाठवून पक्षसंघटनेतील काही होतकरू मंडळींना मंत्रिमंडळात घेण्याबाबत पंतप्रधान विचार करत आहेत. मात्र कोरोनाच्या प्रकोपात मंत्रिमंडळ विस्तार केला तर मोठय़ा टीकेला सामोरे जावे लागेल या भीतीपोटी मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त लांबणीवर पडत आहे. आता पितृपंधरवडा सुरू होत असल्याने तोपर्यंत तरी मंत्रिमंडळ विस्तार आणि भाजप कार्यकारिणीला मुहूर्त मिळण्याची चिन्हे नाहीत. जुन्या टीमबरोबर सात महिने अध्यक्षपदाची बॅटिंग करणारे आणि कोरोनाने राजकीयदृष्टय़ा सर्वाधिक त्रस्त झालेले पक्षाध्यक्ष म्हणून जे. पी. नड्डांची राजकीय इतिहासात नोंद होईल हे नक्की. कोरोना आणि पितृपंधरवडा कधी संपतो याकडे इच्छुकांची नजर लागली आहे.

‘क्लब 23’चा आनंदी ‘आनंद…’

काँग्रेस पक्षासाठी पूर्णवेळ अध्यक्ष नेमा, असा लेटरबॉम्ब टाकणाऱ्य़ा काँग्रेसच्या 23 नेत्यांच्या भूमिकेमुळे काँग्रेसचे राजकारण ढवळून निघाले असले तरी या पत्रासाठी जमलेल्या ‘क्लब 23’ मागेही वेगळेच राजकारण शिजल्याचे आता पुढे आले आहे. या पत्रकांडाचे कारस्थान राज्यसभेतले काँग्रेसचे उपनेते आनंद शर्मा यांच्या खोपडीतून आल्याचे मानले जात आहे. त्याचे कारण बनले आहे ते राज्यसभेतले विरोधी पक्षनेतेपद! लोकसभेत विरोधी पक्षनेतेपदाएवढे संख्याबळ नसल्याने काँग्रेससाठी राज्यसभेतले विरोधी पक्षनेतेपद महत्त्वाचे आहे. विद्यमान विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांची मुदत पुढील वर्षी संपत आहे. या पदावर कायम राहण्यासाठी गुलाम नबींनी इकडून तिकडून राज्यसभेवर येण्याच्या बऱ्य़ाच खटपटी केल्या, मात्र हायकमांडने त्यांना जम्मू-कश्मीरमध्ये जाऊन पक्षसंघटन बळकट करण्याच्या सूचना दिल्यामुळे गुलाम नबी काय ते समजून गेले. गुलाम नबींचा अडसर दूर झाल्यानंतर ही खुर्ची आपल्यालाच मिळेल हा ठाम विश्वास उपनेते आनंद शर्मा यांना होता. मात्र काँग्रेसने चार वेळा राज्यसभेची संधी दिल्यानंतर पुढे संधी देण्यास असमर्थता दर्शविल्यामुळे आणि त्याचवेळी कर्नाटकातून लोकसभेत पराभूत होऊनही मल्लिकार्जुन खरगे यांना राज्यसभेची संधी दिल्यामुळे शर्मा व्यथित झाले. खरगे आता लोकसभेपाठोपाठ राज्यसभेचे विरोधी पक्षनेते होणार हे जवळपास निश्चित झाल्यामुळे गुलाम नबी आणि आनंद शर्मा यांनी मिळून या ‘लेटरबॉम्ब’ला मूर्त रूप दिले. या दोघांच्या अस्वस्थतेचा अंदाज नसल्यामुळे या लेटरबॉम्बवर सल्ह्या केलेल्या इतर 21 जणांची मात्र चांगलीच गोची झाली आहे. या सर्व गडबडीत निष्पन्न काय होणार आणि आझाद व आनंद शर्मा यांची हीट विकेट जाईल का हे भविष्यात समजेल.