लेख : दिल्ली डायरी : ‘चावलवाले बाबां’ची ‘डाळ’ शिजणार का?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 >> नीलेश कुलकर्णी  

छत्तीसगढसारख्या नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल राज्यांमध्ये पाड्यापाड्यावर यशस्वी ‘रेशनिंग’द्वारे तांदूळ पोहोचवणारे आणि त्यामुळे देशभरात ‘चावलवाले बाबा’ म्हणून प्रसिद्धी पावलेले छत्तीसगढचे मुख्यमंत्री रमणसिंग सलग चौथ्यांदा भाजपची ‘सत्तेची खिचडी’ रायपुरात शिजवणार काय याकडे सध्या देशाचे लक्ष आहे. 15 वर्षांची ऍण्टीइन्कमबन्सी, भाजपच्याच वरिष्ठांची नाराजी आणि काँग्रेस उभे करत असलेले आव्हान रमणसिंग कशा पद्धतीने परतवून लावतात यावर बरीच गणिते अवलंबून आहेत.

मागील विधानसभा निवडणुकीत 90 पैकी 49 जागा जिंकून भाजप छत्तीसगढमध्ये सत्तेवर आला असला तरी त्यावेळी भाजप व काँग्रेसच्या मतांच्या टक्केवारीत फारसा फरक नव्हता. आता पाच वर्षांमध्ये पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. रमणसिंगांचे खासदार चिरंजीव अभिषेक यांना पनामा पेपर्सवरून घेरण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. त्यामुळे रमणसिंग यांच्या प्रतिमेला तडा गेला आहे. त्यातच दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींची भाची करुणा शुक्ला यांनी रमणसिंग यांना राजनंदगावातून आव्हान दिले आहे. अर्थात तिकडे काँग्रेसचे बंडखोर अजित जोगी यांनी बसपाच्या ‘अंबारी’त बसण्याचा निर्णय घेतल्यामुळे भाजपला त्याचा फायदा मिळण्याची दाट शक्यता आहे. सलग 15 वर्षे मुख्यमंत्री राहिलेले रमणसिंग हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याप्रमाणेच विद्यमान भाजप हायकमांडच्या नावडते आहेत. त्यामुळे छत्तीसगढ जिंकण्याबाबत भाजपचे दिल्लीश्वरच किती गंभीर आहेत, अशी एक शंका काही मंडळींना  वाटत आहे. दुसरीकडे छत्तीसगढ जिंकले तरी सुरुवातीच्या काही दिवसानंतर सरोज पांडेंच्या रूपाने तिथे पहिल्या महिला मुख्यमंत्री बसविण्याचा मोदी-शहा जोडीचा मानस असल्याचे दिल्लीच्या वर्तुळात बोलले जात आहे. त्यामुळे छत्तीसगढमध्ये नेमके काय होणार, हा औत्सुक्याचा विषय आहे.

नोटाबंदीच्या ऐतिहासिक वगैरे निर्णयामुळे देशातला दहशतवाद आणि नक्षलवाद सपंला अशी हाळी मारली गेली. मात्र सध्या विधानसभा निवडणुकीच्या ऐन रणधुमाळीत छत्तीसगढमध्ये फटाके फोडतात त्या सहजतेने नक्षलवादी सुरुंगस्फोट घडवत आहेत. त्यात छत्तीसगढ जिंकणे हा मुख्यमंत्री रमणसिंग यांच्या वैयक्तिक प्रतिष्ठेचा मुद्दा बनला आहे. अटलजींची भाची करुणा शुक्ला या स्वतः यावेळी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून रमणसिंग यांना आव्हान देत आहेत. साहजिकच या लढतीकडे देशाचे लक्ष आहे. आपल्या प्रचाराचा प्रारंभ रमणसिंग यांनी योगी आदित्यनाथ यांना बोलावून केला. त्यावेळी त्यांनी योगी यांना वाकून नमस्कार केला. त्यामुळे वाद निर्माण झाला आहे. ‘वयाने लहान असलेल्या योगींचे पाय धरलेच कसे’, असे विचारत करुणा शुक्ला यांनी रमणसिंग यांना भंडावून सोडले आहे. त्यांच्या प्रचारामुळे रमणसिंगांना मतदारसंघातच अडकून पडावे लागत असल्याचे चित्र आहे. या निवडणुकीत स्थानिक मुद्दे फारसे प्रभावी नसले तरी मुख्यमंत्री चिरंजीवांचे पनामा पेपर्समध्ये नाव आल्याने  रमणसिंगांच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. अर्थात त्याचे भांडवल करण्याची क्षमता गलितगात्र विरोधकांकडे नाही. पुन्हा काँग्रेसचे ‘कन्फ्युजड’ अध्यक्ष राहुल गांधी यांनी पनामा पेपर्ससंदर्भात रमणसिंग यांच्या चिरंजीवांऐवजी शिवराजसिंग चौहान यांच्या चिरंजीवांवर आरोप केले. त्यामुळे राहुल यांनी स्वतःच स्वतःचे हसे करून घेतले आहे. त्याचा परिणाम म्हणून हा मुद्दाही विरोधकांच्या हातून निसटला आहे. राज्यातील गटातटांत विभागलेली काँग्रेस आणि अजित जोगी व मायावतींच्या आघाडी यामुळे धर्मनिरपेक्ष मतांमध्ये होणारी फाटाफूट लक्षात घेता ‘चावलवाल्या बाबां’ची सत्तेची डाळ पुन्हा शिजेल अशी परिस्थिती आहे.

शिमोग्यातील ‘राजकीय शिमगा’ election11

लोकसभा निवडणुकीला काही महिने उरले आहेत. तरीही या औटघटकेच्या खासदारकीसाठी कर्नाटकातील शिमोगा पोटनिवडणुकीत तुंबळ राजकीय युद्ध झाले. शनिवारी येथील मतदान पार पडले. निकाल अद्याप बाकी आहे. पण प्रचार काळात तेथे काळ्या पैशाचा धूर निघाला. त्याचे कारणही तसेच आहे. एस. बंगरप्पा, येडियुरप्पा आणि जे. एच. पटेल या कर्नाटकाच्या माजी मुख्यमंत्र्यांचे वारसदार येथील उमेदवार आहेत. कर्नाटकात मुख्यमंत्री व्हायचे असल्याने येडियुरप्पांनी शिमोगाच्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. साहजिकच त्या जागेवर त्यांचे चिरंजीव राघवेंद्र भाजपकडून निवडणूक लढवली, काँग्रेस व धर्मनिरपेक्ष जनता दलाकडून माजी मुख्यमंत्री एस. बंगारप्पा यांचे चिरंजीव मधू तर संयुक्त जनता दलाकडून माजी मुख्यमंत्री जे. एच. पटेलांची कन्या महिमा रिंगणात आहे. या काही महिन्यांच्या खासदारकीसाठी कर्नाटकातील सर्वच धुरिणांनी प्रतिष्ठा पणाला लावली. मुख्यमंत्री कुमारस्वामींनी तळ ठोकला तर येडियुरप्पा यांनीही पुत्रप्रेमापोटी सर्वस्व पणाला लावले. इडिगा जातीच्या व्होटबँकेवर मधू बंगारप्पांची मदार आहे तर लिंगायत आणि उच्चवर्णीयांनी नेहमीप्रमाणे आपल्याला हात दिला असेल असा येडियुरप्पांना भरवसा आहे. येडियुरप्पांचे चिरंजीव पराभूत झाले तर येडियुरप्पा यांच्या भविष्यातील राजकारणाला ब्रेक लागेल. त्यामुळे राघवेंद्र पराभूत व्हावेत यासाठी काही भाजपाई आतून बंगारप्पांना रसद पुरवत आहेत. शिमोग्यातील राजकीय शिमग्यातून विजयाची हाळी कोण देतो, ते कळेलच.

दिल्ली का शेर madan-lal-khurana

‘दिल्ली का शेर’ असे ज्यांचे वर्णन केले जायचे ते दिल्लीचे माजी मुख्यमंत्री मदनलाल खुराणा नुकतेच कालवश झाले. दिल्लीसारख्या काँग्रेसचे प्राबल्य असलेल्या राज्यात भाजप आणि जनसंघ रुजविण्याचे श्रेय बलराज मधोक यांच्या बरोबरीने खुराणा यांच्यांकडे जाते. काँग्रेसची व्होट बँक असलेला दिल्लीतील पंजाबी समाज भाजपकडे वळविण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. खुराणा यांनी मुख्यमंत्री झाल्यावर ते पद खऱ्या अर्थाने गाजवले. दिल्लीच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा बिकट प्रश्न लक्षात घेऊन त्यांनी दूरदृष्टीने दिल्ली मेट्रोची पायाभरणी केली. नंतर हा प्रकल्प काँग्रेसच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्यामुळे पूर्णत्वास गेला. त्यामुळे दिल्लीकरांमध्ये खुराणा कायमच लोकप्रिय राहिले. मात्र भाजपच्या अंतर्गत राजकारणामुळे नंतरच्या काळात खुराणांचे पंख व्यवस्थित छाटले गेले. पुढे साहबसिंग वर्मा आणि सुषमा स्वराज यांच्या रूपाने भाजपने मुख्यमंत्रीपदाची संगीतखुर्ची खेळून पाहिली, मात्र दिल्लीकरांनी त्यांना साफ झिडकारले. खुराणांना बेदखल केल्यापासून भाजप आजवर दिल्लीच्या सत्तेचा सोपान चढू शकलेला नाही. त्यात खुराणांच्या निधनानंतर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दाखविललेली संवेदनशून्यता वादाचा विषय बनली आहे. खुराणा यांनी अखेरचा श्वास घेतला त्यावेळी पंतप्रधान मोदी जपानमध्ये त्या देशाचे पंतप्रधान शिंजो आबे यांची गळाभेट घेत होते. तथापि जपानवरून परतल्यानंतर तरी त्यांनी खुराणांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन पक्षासाठी निष्ठेने जगलेल्या कार्यकर्त्याला श्रद्धांजली वाहायला हवी होती. भाजपाचे राष्ट्रीय अमितभाई शहा हे तर सध्या प्रचारासाठी दिल्लीबाहेरच आहेत. त्यामुळे  बहुदा त्यांनाही खुराणा कुटुंबीयांचे सांत्वन करण्यास फुरसत मिळाली नसावी.

 [email protected]