दिल्ली डायरी : जंबुरी, शिवराजमामा आणि राजकीय भवितव्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
shivraj

>> नीलेश कुलकर्णी   

लोकसभेच्या सेमीफायनल मानल्या जाणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये मध्य प्रदेश हा सर्वांचा आकर्षणबिंदू आहे. सलग तीन टर्म मुख्यमंत्री राहिलेल्या शिवराजसिंग यांचे गलबत व्यवस्थित सत्तेपर्यंत पोहचते की, सौम्य हिंदुत्वाचा पंचा खांद्यावर टाकलेले ‘जनऊधारी’ राहुल गांधी ‘हर हर नर्मदे’ करत भाजपाला सत्तेतून बेदखल करतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. भोपाळजवळचे जंबुरीचे मैदान हे शिवराजमामांसाठी लकी मानले जाते. कोणत्याही निवडणुकीचे बिगुल शिवराजसिंग येथूनच फुंकत असतात. नुकताच पंतप्रधानांच्या उपस्थितीत तिथे कार्यकर्ता कुंभ घेण्यात आला होता. त्यामुळे जंबुरी हे शिवराजसिंग यांना पुन्हा लकी ठरणार का, हा  प्रश्न आहे.

भाजपच्या शिवराजसिंग चौहान यांनी मध्य प्रदेशची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्या राज्याची अवस्था भुकेकंगाल अशीच होती. दिग्विजय सिंगांनी पुरते बिमारू बनवलेल्या राज्याला शिवराजमामांनी विकासाचे टॉनिक दिले. मध्य प्रदेशच्या कृषी विकासाचा दर आणि ‘लक्ष्मी लाडली’सारख्या योजनांनी शिवराज यांची सत्तेवरची मांड पक्की केली. मात्र गुजरात मॉडेलप्रमाणे त्यांना आपल्या कामाचे मार्केटिंग करता आले नाही. त्यातच गेल्या 15 वर्षांतील ऍण्टी इन्कमबन्सी, मंदसौरमध्ये शेतकऱ्यांवर झालेला गोळीबार आणि व्यापम घोटाळ्यातील आरोपांचे पडलेले डाग यामुळे शिवराजमामांना यावेळी संघर्ष करावा लागत आहे. अर्थात विरोधकांसोबतच स्वकीयांशीही त्यांना झगडावे लागत आहे. शिवराज चौथ्यांदा मुख्यमंत्री झाले तर ते आपसूकच पंतप्रधानपदाच्या शर्यतीत येऊ शकतील. 2019 मध्ये भाजपला स्वबळावर सत्ता मिळणे अशक्य आहे. त्यामुळे अहंकारी नसलेले शिवराज हे सहमतीचे उमदेवार म्हणून पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार ठरू शकतात. त्यामुळे शिवराज यांचा पत्ता विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून साफ करण्याचे मनसुबे दिल्लीश्वरांच्या मनात असल्याचे बोलले जात आहे.

मोदी सरकारविरोधात जनतेमध्ये असलेला रोष लक्षात घेऊन मध्य प्रदेश विधानसभेची निवडणूक ‘नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी’ अशी न होता ‘शिवराजसिंग विरुद्ध कमलनाथ’ अशी व्हावी, असा शिवराजसिंग चौहान यांचा कसोशीने प्रयत्न सुरू आहे. मात्र मोदी व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मध्य प्रदेशात तळच ठोकल्यामुळे सध्या तरी काँग्रेसला अप्पर हॅण्ड दिसत आहे. शिवराज यांच्याइतका लोकप्रिय नेता मध्य प्रदेशात काँग्रेसकडे नाही. त्यातच त्यांची प्रतिमा जनतेत अजूनही उजवी आहे. मात्र मोदी व शहा यांच्यामुळे भाजपची मते जातील, अशी धास्ती शिवराज यांच्या मनात आहे. विशेषतः मोदी सरकारने ऍट्रॉसिटी कायद्यात बदल केल्याने त्याचे तीव्र पडसाद सवर्ण समाजात उमटले आहेत. काँग्रेसने हुशारी करून मायावतींसोबतची युती तोडल्याने सवर्ण काँग्रेसकडे जातील अशी भीती शिवराज यांना वाटत आहे. त्यातच ‘सपाक्स’ नावाची एक राजकीय छत्री ऍट्रॉसिटीविरोधात राजकीय मैदानावर उगवली आहे. त्यामुळे भाजपचा व्होटबँक असलेला सवर्ण विखुरला गेला तर त्याचा फटका बसू शकतो याची जाणीव शिवराजसिंग यांना आहे. बिहारमध्ये प्रचाराचा अतिरेक मोदी-शहा जोडीने केल्यामुळे जनतेने भाजपचा पराभव केला होता. मध्य प्रदेशात बिहारची पुनरावृत्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मध्य प्रदेशसारखे राज्य हातून गेल्याने मोदी-शहा यांचे राजकीय नुकसान काहीच होणार नाही, मात्र पंतप्रधानपदाच्या स्पर्धकाला ‘चेकमेट’ देणे शक्य होणार आहे. शिवराजमामा जिंकले तर ते अनेकार्थांनी ‘जायंट किलर’ ठरतील. प्रत्यक्षात काय होते ते दिसेलच!

चामलिंग नावाचा ‘चमत्कार..’ pawan-kumar-chamling-sikkim

सिक्कीमचे मुख्यमंत्री पवनकुमार चामलिंग एक धडाकेबाज लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातात. देशात सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदावर राहण्याचा दिवंगत कॉम्रेड ज्योती बसूंचा विक्रम मोडीत काढत पवनकुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची सलग 23 वर्षे पूर्ण केली आहेत. 1992 मध्ये ‘किरण’ या टोपणनावाने कविता करणारा हा माणूस मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसला. गेल्या 23 वर्षांत आपल्या राज्याचा त्यांनी कायापालट केला. मात्र भक्तमंडळ पाठीशी नसल्याने आणि त्याचे मार्केटिंग चामलिंग यांनी न केल्यामुळे पवनकुमार जनतेला फारसे माहिती झालेच नाहीत. मात्र नुकताच अमेरिकेतील ‘ऑस्कर ऑफ पॉलिसी’ असा मोठा लौकिक असलेला ‘फूड ऍण्ड ऍग्रीकल्चर आर्गनायझेशन’चा ‘फ्युचर पॉलिसी गोल्ड ऍवॉर्ड’ चामलिंग यांना मिळाला आहे. सिक्कीम हे संपूर्णपणे ऑर्गेनिक राज्य बनविल्याबद्दल चामलिंग यांचा या सोहळ्यात विशेष सन्मान करण्यात आला. जगभरातील 51 देशांच्या दावेदारीला धोबपछाड देत पवनकुमारांनी सिक्कीमचा आणि पर्यायाने हिंदुस्थानचा डंका जागतिक पातळीवर वाजवला आहे. निरलसपणे समाजाची सेवा करत शांतपणे काम करत विकास करता येतो, हे पवनकुमारांनी दाखवून दिले आहे.

 nd-tiwariएन. डी. तिवारी यांची ‘दुसरी गोष्ट’

उत्तर प्रदेश व उत्तराखंड या दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्रीपद भूषविलेल्या एन. डी तिवारींचे त्यांच्या जन्मदिनीच निधन व्हावे हा निव्वळ दैवदुर्विलास! अनेकांनी त्यांचे स्मरण एक रंगेल राजकारणी म्हणून केलेही असेल. मात्र तिवारींच्या व्यक्तिमत्त्वाची दुसरी गोष्ट जबरदस्तच होती. लहानपणी  म्हशी सांभाळणारा, इंग्रजांच्या बंगल्यात काम करत असताना आपल्या वडिलांना इंग्रजीतून वर्तमानपत्र वाचून दाखविणारा मुलगा, पुढे यांच इंग्रजीशी यारदोस्ती करणारा, उत्तर प्रदेशमध्ये आमदार झाल्यानंतर स्वीडनचे पंतप्रधान ओलोफ पाम यांच्याशी दोस्ती करणारा ‘नरेन’ अशी तिवारींची अनेकविध रूपे आहेत. उत्तर प्रदेशसारख्या महाकाय राज्याचे तीनवेळा मुख्यमंत्री होणे ही सोपी गोष्ट नाही. मात्र विलक्षण राजकीय आणि बुद्धिचातुर्याच्या जोरावर तिवारींनी ही जबाबदारी व्यवस्थित सांभाळली. त्यांच्या क्षमतेचा अंदाज असल्याने उत्तराखंड अस्तित्वात आल्यानंतर त्या राज्याची सूत्रे आपसूकच तिवारींकडे गेली. काँग्रेसच्या राजकारणात ‘ओल्ड स्कूल’चे विद्यार्थी म्हणून ओळखले जाणारे एन. डी. हे देशाला न लाभलेल्या पंतप्रधानांपैकी एक! गमतीचा भाग म्हणजे राजीव गांधींविरोधात बोफोर्सप्रकरणी आरोपांची राळ उडत असताना स्वतः राजीव गांधीनी पंतप्रधान पदाची पेशकेश तिवारी यांना केली होती. मात्र त्यांनी ही ऑफर नाकारली. पंतप्रधानपद नाकारणारे एन.डी त्यामुळेच वेगळे ठरतात. 1991 च्या लोकसभा निवडणुकीत केवळ पाच हजार मतांनी पराभूत झाल्यामुळे तिवारीच्या पंतप्रधानपदाची संधी दुसऱ्यांदा हुकली. ती परत त्यांना कधीच मिळाली नाही. मात्र प्रचंड वाचन आणि जबरदस्त स्मरणशक्तींचे तिवारींचे किस्से ऐकण्याजोगे आहेत. सभेतील एखाद्या कार्यकर्त्याला ते नावानिशी बोलावून स्टेजवर बोलवत. तिवारी गाजले ते वेगळ्या कारणांसाठी. मात्र त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ही दुसरी बाजूही आहे.

 [email protected]